पायरसीला विरोध करण्याचे अभिनेता स्वप्नील जोशीचे आवाहन
चित्रपटगृहामध्ये जाऊनच चित्रपट पाहा आणि पायरसीला विरोध करा, असे आवाहन अभिनेता स्वप्नील जोशी याने केले.
‘लाल इश्क’ या आगामी चित्रपटाच्या अनुषंगाने स्वप्नील जोशी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंजना सुखानी यांनी सिंहगड रस्त्यावरील अनलिमिटेड फॅशन स्टोअरला भेट दिली. त्या वेळी या दोन्ही कलाकारांनी आपापल्या भूमिकेविषयी आणि चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवांविषयी मोकळेपणाने गप्पा मारल्या.
स्वप्नील जोशी म्हणाला, सध्या मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत आहे. केवळ चित्रपट चांगले होऊन उपयोग नाही. तर, तिकिट खिडकीवर चालला तर तो यशस्वी चित्रपट असे मानले जाते. त्यासाठी सर्वानी पायरसीला विरोध केला पाहिजे. चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून चित्रपटगृहामध्येच गेले पाहिजे.
मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. सेटवर सगळे जण सांभाळून घ्यायचे. अभिनय करताना खूप काही शिकता आले. त्यामुळे मराठी कलाकारांविषयी माझ्या मनातील आदर आणखी वाढल्याची भावना अंजना सुखानी व्यक्त केली.