कारागृहातून सुटल्यानंतर अभिनेता संजय दत्तने ‘भूमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटाचे शूटिंग जेव्हा संपले तेव्हाच दिग्दर्शक ओमंग कुमारने त्याच्या ‘द गुड महाराजा’ या दुसऱ्या चित्रपटातही संजय दत्त असल्याची घोषणा केली होती. मात्र, संजयनेच नंतर या चित्रपटातून काढता पाय घेतला. तेव्हापासूनच संजूबाबा एका दमदार चित्रपटाच्या शोधात होता. नुकतीच त्याने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची भेट घेतली.

मुंबईतील खार येथील गोवारीकर यांच्या कार्यालयाबाहेर संजूबाबाला पाहिलं गेलं. त्यामुळे आता संजूबाबा गोवारीकांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. ‘भूमी’ने अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे चाहत्यांसोबत संजयचीही निराशा झाली. यामुळेच तो आता एका मोठ्या प्रोजेक्टच्या शोधात आहे.

वाचा : ‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’

गोवारीकर यांनी ‘लगान’, ‘स्वदेस’, आणि ‘जोधा अकबर’ यांसारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आमिर खान, शाहरूख खान आणि हृतिक रोशन यांच्यासाठी हे चित्रपट महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे आता संजूबाबाला घेऊन आशुतोष गोवारीकर चित्रपट करणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.