रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील हजेरी लावलेली होती. शाहरुख खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि शाहरुख खान स्टेजवर असताना, शाहरुखने अनंतचा बालपणीचा एक किस्सा उपस्थितांना सांगितला.

‘धीरुभाई अंबानी यांच्यासोबत अनंत मरीन ड्राईव्ह येथून जात होता. त्यावेळी तो सहा वर्षांचा होता. तेथून जात असताना अनंतने धीरुभाईंना फुगे घेऊन देण्याचा हट्ट केला होता. त्यांनी १५ रुपयांचे दहा-बारा फुगे घेऊन दिले. मात्र हे १५ रुपयांचे फुगे महाग असल्याचे अनंतला जाणवले. घरी जाताना त्याने २ रुपयांचे फुग्यांचे पाकिट विकत घेतले. नंतर ते फुगे फुगवून अनंतने विकले’, असे शाहरुखने सांगितले. यावर अनंत म्हणाला की, ‘फुग्यात भरण्यासाठी हवा तर मोफतच आहे. म्हणून ते फुगे फुगवून मी विकले.’

यावेळी शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटातील ‘कोई भी धंदा छोटा नही होता’ हा संवाददेखील त्याने गमतीत म्हणून दाखवला. त्यावर शाहरुखनेही आपण रिलायन्सकडूनच ही गोष्ट शिकून चित्रपटात संवादरुपाने वापरल्याचे म्हटले. हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही हसू अनावर झाले.