१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर आजही कायम आहे. या चित्रपटाचं नाव घेताच सलमान खान, रंभा आणि करिष्मा कपूर यांची केमिस्ट्री आपल्या डोळ्यांसमोर येते. सलमानने साकारलेला डबल रोल, कॉमेडी आणि अॅक्शन यामुळे हा चित्रपट गाजलाच. मात्र, ‘जुडवा’मधील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. सध्या ‘जुडवा २’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटप्रेमींमध्ये या गाण्यांचा फिव्हर संचारलेला पाहायला मिळत आहे. ‘जुडवा २’ मध्ये ‘ऊंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन’ ही गाणी नव्या व्हर्जनमध्ये ऐकायला आणि पाहायला मिळतील.

यापैकी अन्नू मलिक आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं ‘ऊंची है बिल्डिंग’ हे गाणं अनेकांना पुन्हा ठेका धरायला भाग पाडतंय. नुकत्याच या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी झालेल्या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली या गाण्यावर थिरकताना दिसला.
कोलकातामध्ये ‘जुडवा २’च्या प्रमोशनसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे चित्रपटातील मुख्य कलाकार वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांची भेट गांगुलीशी झाली. या कार्यक्रमाअखेर वरुणसोबत दादानेही ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्यावर ठेका धरला. डान्सचा हा व्हिडिओ वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘कोलकातामध्ये सौरव गांगुली #dada यांनाही ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्याने ठेका धरण्यास भाग पाडलं.’

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या बॉस्को मार्टिसनेच ‘ऊंची है बिल्डिंग’ या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. या चित्रपटात वरुण धवन ‘प्रेम’ आणि ‘राजा’ या व्यक्तिरेखा साकारणार आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.