अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच ‘मुन्ना मायकल’ Munna Michael या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या अनोख्या नृत्यशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता आता पुन्हा एकदा अॅक्शन पॅक्ड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे पोस्टर बरेच चर्चेत आहेत. या पोस्टरवरील पिळदार शरीरयष्टीमध्ये असलेला टायगर सर्वांचं लक्ष वेधत आहेच. पण, त्याच्यासोबत असलेली नवोदित अभिनेत्री निधी अग्रवालसुद्धा चर्चेत आली आहे.

निधीच्या अदा आणि तिच्या चेहऱ्यावरी भाव पाहता टायगरची लिडिंग लेडी म्हणून ती चांगलीच शोभून दिसत आहे. निधीचा हा पहिलाच चित्रपट असून तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पाहता ती परफेक्ट बॉलिवूड मटेरियल असल्याचं लक्षात येत. मॉडेलिंग विश्व आणि नृत्यकलेत पारंगत असणारी निधी मुळची बंगळुरूची आहे. तिने बॅले, कथ्थक आणि बेली डान्स या नृत्यप्रकारांचं रितसर शिक्षण घेतलं आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवीधारक असलेली निधी विविध सौंदर्यस्पर्धांमधूनही समोर आली होती. करिअरच्या सुरुवातीलाच एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळालेली निधी या संधीचं सोनं करणार यात शंका नाही. शब्बीर खान दिग्दर्शित ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा झळकणार आहे.

दरम्यान, निधी काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. एका हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या निधीला तिच्या घरमालकाने अपार्टमेंट सोडून जाण्यास सांगितलं होतं. याबद्दल प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत निधी म्हणाली, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मी माझ्या मैत्रिणींसोबत राहतेय. घर शोधणं हे खरंच खूप कठीण काम आहे. होतकरू कलाकारांना या सोसायटीत राहू दिलं जात नाही. मॉडेल्स किंवा कलाकार चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात असा त्यांचा गैरसमज असल्यामुळे ते भाड्याने घर देण्यास घाबरतात. माझं लग्न झालेलं नाही आणि केवळ मी एक कलाकार आहे म्हणून मला घर देण्यास नकार दिला जातोय.’