‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावत या पुरस्कार सोहळ्याची रंगत वाढविली होती. जागतिक चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या पुरस्कारांमध्ये ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराचे नाव प्रामुख्याने घेण्यात येते. अशा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राही हजेरी लावणार अशी चर्चा होती. आणि झालंही तसंच. प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत अनेकांचीच मनं जिंकली. सोनेरी रंगाच्या लांबसडक गाऊनमध्ये प्रियांका या पुरस्कार सोहळ्यामध्ये आली होती. तर बी टाऊनच्या मस्तानीने म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोनही या पुरस्कार सोहळ्यामध्ये आली होती. दीपिका एका पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आली होती.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मनोरंजनासाठी एका धम्माल कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टाईल ऑफ कॅमेरा’ या सेशनदरम्यान सर्वच सेलिब्रिटींना लिफ्टचे दरवाजे उघडताच काही हटके पोझ देण्याचे चॅलेंज देण्यात आले होते. हॉलिवूडच्या कलाकारांसोबतच बॉलिवूडच्या प्रियांका आणि दीपिकानेही या चॅलेंजमध्ये सहभागी होत हे आवाहन चांगलेच पेलवून नेले. त्यामुळे आता या दोन्ही अभिनेत्रीपैकी तुम्हाला नेमका कोणाचा अंदाज आवडतोय हे व्हिडिओ पाहूनच ठरवा.
दरम्यान, ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांमध्ये बिली बॉब थ्राँटन या अभिनेत्याला प्रियांकाने त्याच्या एका टेलिव्हिजन सिरिजसाठी पुरस्कार दिला. ७४ व्या ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यामध्ये जे. डी. मॉर्गनच्या साथीने प्रियांकाने बिलीला हा पुरस्कार दिला. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रासोबत या पुरस्कार सोहळ्यात ड्रयू बैरीमोर, मेट डेमन, वियोला डेविस, लॉरा डेर्न, गोल्डी हॉन, निकोल किडमॅन, सिएना मिलर, क्रिस पाइन यांसारखे नावाजलेले कलाकारही सहभागी झाले होते.