वास्तव आणि काल्पनिकता यांचे अभूतपूर्व मिश्रण याआधी आपण हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, पायरेट्स ऑफ द कॅरेबियन, स्टार वॉर्स यांसारख्या अनेक चित्रपट – मालिकांमधून अनुभवले आहे. परंतु, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या महामालिकेची मजा काही औरच आहे. जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘अ साँग्स ऑफ आइस अँड फायर’ या कादंबरीवर आधारलेली ही मालिका म्हणजे छोटय़ा पडद्यावर घडलेला एक चमत्कारच म्हणता येईल. २०११ साली सुरू झालेला हा चमत्कार नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सध्या या मालिकेचे आठवे पर्व सुरू असून शेवटचा भाग येत्या काही तासांत प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे कोरा करकरीत आणि निर्दयी सत्तासंघर्षांचा खेळ. या खेळातील प्रत्येक खेळाडू फक्त जिंकण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतो. कारण पराभव या शब्दाचा समानार्थी शब्द येथे मृत्यू असा आहे. इतिहासातील प्रत्येक सत्तासंघर्ष हा आपल्याला हिंसेनेच बरबटलेला दिसतो. या हिंसेचे दाखले कलिंगचे युद्ध, पहिले व दुसरे महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध यांसारख्या अनेक सत्तासंघर्षांतून आपल्याला पहायला मिळतात. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ देखील याला अपवाद नाही. इथे आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाऊ  बहिणीला विकतो, मुलगा वडिलांचा खून करतो, बहीण बहिणीला फसवते व मैत्री म्हणजे इथे अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. परंतु तरीही ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेचे आठवे पर्व १७० देशांमधून १० दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी अनधिकृत पद्धतीने इंटरनेटवरून डाउनलोड केले आहे. यावरून आपल्याला ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. ‘अवतार’, ‘टायटॅनिक’, ‘अ‍ॅव्हेंजर्स : एण्डगेम’, ‘इन्सेप्शन’ यांसारख्या अनेक भव्यदिव्य हॉलीवूडपटांनाही अवाक करणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सध्या अखेरचे पर्व सुरू आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही वेस्टोरॉस या साम्राज्याची कथा आहे. वेस्टोरॉसचे सर्वसाधारणपणे दोन भागांत विभाजन करता येते. उत्तरेकडे स्टार्क ऑफ विंटरफेल (रुल्स ऑफ नॉर्थ), टूली ऑफ रिव्हरन (रुल्स ऑफ रिव्हरलँड), अ‍ॅरेन ऑफ द एरी (रुल्स ऑफ व्हेल) आणि दक्षिणेकडे लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक (रुल्स ऑफ द वेस्टरलँड), ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड (रुल्स ऑफ द स्टॉर्मलँड), ट्रेल ऑफ हायगार्डन (रुल्स ऑफ द रिच), मार्टेल ऑफ सन्सस्पेअर (रुल्स ऑफ ड्रोन) या सात राज्यांची मिळून ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची निर्मिती झाली आहे. किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी असून या सात लहान राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ असे म्हटले जाते. आणि या राज सिंहासनाभोवती ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचे कथानक फिरते.

पहिल्या सात पर्वात आपण वरीलपैकी प्रत्येक राजघराण्याचा इतिहास, संस्कृती आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याची महत्त्वाकांक्षा पाहिली. परंतु प्रत्येक पर्वागणिक कथानक पुढे सरकत गेले आणि कमकुवत राजघराण्यांचे अस्तित्व हळूहळू नष्ट झाले. या संपूर्ण प्रवासात फक्त लँनिस्टर, स्टार्क आणि टारगेरीयन ही तीनच घराणी तग धरून राहतात. यातील लँनिस्टर घराण्याकडे विंटरफेल साम्राज्याची सत्ता असते. तर स्टार्क व टारगेरीयन प्रदीर्घ लढाई करून आपले अस्तित्व शाबूत ठेवतात. परिणामी गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या पर्वाचे कथानक या तीनच घराण्यांभोवती फिरताना दिसते.

या मालिकेत शेकडो व्यक्तिरेखा आहेत. परंतु यातील कोणीच हिरो अथवा खलनायक म्हणता येणार नाही. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा तत्कालीन परिस्थितीनुसार क्रिया करते आणि त्या क्रियेच्या परिणामांवर त्या व्यक्तिरेखेचे नायकत्व सिद्ध होते. परंतु त्यातल्या त्यात स्टार्क घराण्यातील मंडळी आपल्याला काहीशी नायकाच्या भूमिकेत दिसतात. स्टार्क घराण्यात राजा-राणी आणि त्यांची सहा मुले होती. स्टार्क घराण्याचा राजा एडवर्ड स्टार्क हा किंग्स लँडिंगचा बादशाह रॉबर्ट बॅरेथीअनचा खास मित्र होता. एडवर्ड स्टार्कच्या मदतीनेच त्याने वेस्टरॉसचे साम्राज्य मिळवले होते. परंतु पुढे बादशाहाचा मृत्यृ होतो आणि स्टार्क घराण्याचे दिवस फिरतात. रॉबर्ट बॅरेथीअनची बायको सर्सी लँनिस्टर सत्तेवर येते आणि स्टार्क कुटुंबाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करते. यात राजा राणी आणि त्यांची दोन मुले मारली

जातात. उरलेली सँसा स्टार्क, आर्या स्टार्क, ब्रायन स्टार्क, आणि जॉन स्नो ही चार मुले चार दिशांना पळतात. प्रचंड संघर्ष करून हे चौघे स्टार्क घराण्याची ओळख जिवंत ठेवतात. आणि आज हे चौघे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे खरे आकर्षण ठरत आहेत. स्टार्कव्यतिरिक्त दुसरे महत्त्वाचे घराणे आहे लॅनिस्टरचे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील सर्वात श्रीमंत घराणे म्हणून ते ओळखले जातात. पहिल्या सात पर्वात पैशांचा वारेमाप वापर करून या घराण्याने आपली सत्ता टिकवली. परंतु सातत्याने होणाऱ्या आक्रमणांमुळे आता यांचीही अवस्था खिळखिळी झाली आहे. या घराण्यातील सर्सी लॅनिस्टर वेस्टोरोसची राणी आहे, परंतु टिरीयन व जीमी या तिच्या दोन्ही भावांनी तिची साथ सोडल्यामुळे आठव्या पर्वात तिचीही अवस्था बिकटच आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या युद्धपटावरील तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे घराणे आहे ते टारगेरीयन यांचे. या घराण्यातील डेनेरिअस टारगेरीयन ही राजकन्या मोठमोठय़ा योद्धय़ांवर एकटीच भारी पडते आहे. तिच्याकडे आग ओकणारे ड्रॅगन्स आहेत त्यामुळे युद्धभूमीत तिला नामोहरम करणे जवळपास अशक्य आहे. ‘मदर ऑफ ड्रॅगन’ या टोपणनावाने ओळखली जाणारी डेनेरिअस आयर्न थ्रोनवरील सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ओळखली जाते आहे.

या तीन घराण्यांव्यतिरिक्त व्हाईट वॉकर नावाचा एक अमानवी प्रकार आपण या मालिकेत पाहू शकतो. ही मंडळी एक प्रकारचे झोम्बी आहेत. या झोम्बींचाही एक राजा आहे त्याला आपण ‘द नाईट किंग’ या नावाने ओळखतो. प्रत्येक १०० वर्षांनंतर व्हाइट वॉकर वेस्टरॉसवर हल्ला करतात. परंतु यावेळी वेस्टरॉसमधील सर्व घराणी एकत्र येऊ न त्यांचा नायनाट करतात. मालिकेच्या पहिल्या पर्वापासूनच ‘विंटर इज कमिंग’ या वाक्याखाली त्यांची जाहिरात केली गेली असली तरी आठव्या पर्वात त्यांना फारसे महत्त्व दिले गेलेले नाही. सध्या संपूर्ण कथानक वेस्टरॉसच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार यावरच केंद्रित झाले आहे.

२०११ ते २०१९ या नऊ  वर्षांत ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सत्तासंघर्षांत आपण अनेक राजकीय खेळ पाहिले. हे सर्व खेळ आयर्न थ्रोनची ताकद मिळवण्यासाठी खेळले जात होते. या खेळात अनेक रथीमहारथींनी आपले प्राण गमावले. आणि या खेळाचा शेवटचा भाग आता काही तासांवर येऊ न ठेपला आहे. येत्या काही तासात आयर्न थ्रोन्सचा खरा दावेदार आपल्या डोळ्यांसमोर असेल. इतकी वर्ष सिंहासनाचे हे रहस्य लपवून ठेवत लोकांच्या मनावर गारूड करणारी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका म्हणूनच चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will win game of thrones
First published on: 19-05-2019 at 00:09 IST