‘मेरा साया’, ‘आरजू’, ‘एक फूल दो माली’, ‘लव इन शिमला’, ‘वक्त’ आणि ‘वो कौन थी’सारखे हीट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे साधना. साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ साली झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यावेळी साधना या हेअरस्टाईलसाठी विशेष लोकप्रिय होत्या.
भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी साधना या कराची येथे राहत होत्या. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नंतर त्या स्वप्नांची मायनगरी मुंबईमध्ये स्थायिक झाल्या. साधना या वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. त्यांची अभिनायाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबईत आल्यावर खूप प्रयत्न केले. अखेर ‘420’ चित्रपटामधील एका गाण्यामध्ये साधना यांना काम करण्याची संधी मिळाली. या गाण्यामध्ये साधना यांना छोटा रोल करावा लागला.
साधना यांनी वयाच्या १५ वर्षांपासून कॉलेजमध्ये नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. साधना यांनी सिंधी चित्रपट ‘अबाना’ मधून अभिनयाच्या दुनियेना सुरुवात केली. या चित्रपटासाठी चित्रपट निर्मात्याने साधना यांना १ रुपयाचे टोकण दिले होते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांचा फोटो एका मासिकामध्ये छापून आला होता. तो फोटोपाहून चित्रपट निर्माते शशिधर मुखर्जी यांची नजर साधना यांच्यावर गेली. त्यांनी त्यांचा मुलगा जॉय मुखर्जीसोबत साधन यांना ‘लव इन शिमला’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटातून साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दरम्यान त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर साधन यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
‘420’ या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि अभिनेते राज कपूर यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर साधना राज कपूर यांचा तिरस्कार करत होत्या. साधना चित्रीकरणादरम्यान त्यांच्या हेअर स्टाईलवर जास्त लक्ष केंद्रीत करत असत आणि राज कपूर यांना ते आवडत नसे. एक दिवस अचानक राज कपूर यांनी साधना यांना अभिनय सोडून लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर साधना यांना राज कपूर यांचा राग आला आणि त्या चित्रीकरण सोडून घरी निघून गेल्या होत्या. परंतू त्यांचा अबोला फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी ‘दुल्हा- दुल्हन’ चित्रपटात एकत्र काम केले.