बॉलीवूड दिग्दर्शक मोहित सुरी याच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकर हिच्या बायोपिकवर काम करत आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्यावर आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर हसीनाची भूमिका साकारत आहे. हसीनाची प्रमुख भूमिका साकारण्यासाठी आणि तिच्यासारखा हुबेहूब लूक मिळवण्यासाठी श्रद्धा स्वतःवर बरीच मेहनत घेत आहे. तिची भूमिका अधिक सशक्त व्हावी याकरिता श्रद्धा काहीच कसर ठेवत नाहीये. हसीनाने तिचे संपूर्ण आयुष्य ज्या भागात घालवले त्या डोंगरी परिसरातील मुलींचीही श्रद्धा भेट घेणार आहे. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात श्रद्धा चार विविध लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात हसीना पारकरचा १७ ते ४० या वयातील जीवनप्रवास दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणपणातील हसीनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धा त्या वयोगटातील मुलींचे बारकाईने निरीक्षण करत आहे. त्याचसोबत डोंगरी परिसरात राहत असलेल्या लहान मुलींचीही ती भेट घेणार आहे.
श्रद्धा कपूरने हसीनाची भूमिका साकारण्यासाठी स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून दिले आहे. लहानपणापासून ते आई होण्यापर्यंतचा हसीनाचा जीवनप्रवास यात दाखविण्यात येणार असल्याने श्रद्धा प्रेग्नेंसी व्हिडिओदेखील पाहत आहे. जेणेकरून, तिला भूमिकेतील बारकावे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होईल. सध्या ट्रॉम्बे स्टुडिओमध्ये श्रद्धा चित्रीकरण करत आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून विविध भूमिका साकारण्याची आणि प्रत्येक चित्रपटाद्वारे एक वेगळा प्रवास करण्याची संधी मला मिळते. प्रत्येक प्रवासात वेगवेगळी तयारी करणे आवश्यक असते. यातच खरे आव्हान आहे. फक्त हा चित्रपट करताना श्रद्धाच्या मनात एकच खंत आहे. ती म्हणजे, हसीना पारकरचा मृत्यू २०१४ साली झाला आणि श्रद्धाला कधीच तिला भेटण्याची संधी मिळालेली नाही.
नुकतीच श्रद्धा ही मनी रत्नमच्या ‘ओके कनमानी’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘ओके जानू’ या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील भूमिकेविषयी श्रद्धा म्हणाली की, सदर भूमिकेबदद्ल मी उत्सुक आहे, पण मी अधिक चिंताग्रस्तदेखील आहे. कारण, मला यात मला १७ पासून ते ४३ वर्षांपर्यंतच्या स्त्रिची भूमिका साकारायची आहे. तिचा पूर्ण जीवनप्रवास यात आहे. ही व्यक्तिरेखा खूप कठीण आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ मध्ये श्रद्धाचा भाऊ सिद्धांत हादेखील आहे. तो यात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या १४ जुलैला प्रदर्शित होईल.