करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या करोनाचा प्रसार अगदी नाट्यमय पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. असेच काहीसे नाट्य डिस्ने स्टुडिओच्या ‘टँगल्ड’ या कार्टूनपटात दाखवण्यात आले आहे. करोना विषाणूमुळे १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘टँगल्ड’ हा कार्टूनपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काय आहे या चित्रपटात?

टँगल्ड हा 3D अॅनिमेशनपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. खरं तर या चित्रपटात कुठलाही व्हायरस वगैरे दाखवण्यात आलेला नाही. परंतु आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे या चित्रपटाचे कथानक ज्या राज्यात घडते त्याचे नाव ‘करोना’ असे आहे. करोना राज्याची राजकुमारी रपुन्झेल हिचे अपहरण केले जाते. रपुन्झेलला ज्या इमारतीत ठेवले जाते त्याचे नाव क्वारंटाईन असे आहे. जवळपास १८ वर्ष या राजकुमारीचा शोध सुरु असतो. दरम्यान राजकुमारीला शोधण्यासाठी झालेल्या युद्धांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.

खरं तर ही एक काल्पनिक परीकथा आहे. डिस्नेने लहान मुलांसाठी रपुन्झेल नामक एक परीकथांचा संच देखील प्रकाशित केला होता. या पुस्तकांमधील सर्व कथा ‘करोना’ राज्याभोवतीच घडतात. सध्या जगभरातील लोक करोनामुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर ‘टँगल्ड’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी ‘टँगल्ड’ आणि करोनाचा संबंध जोडून अनोख्या फॅन थिअरीज तयार केल्या आहेत.