अभिनय आणि चित्रपट निर्मिती या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारी अनुष्का शर्मा लवकरच एका नव्या आणि चौकटीबाहेरील भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, श्री नारायण सिंग यांच्या चित्रपटात ‘सरोगेट मदर’ची भूमिका साकारण्यासाठी अनुष्काला विचारणा करण्यात आली आहे.

सध्या या चित्रपटासाठी जुळवाजुळव सुरू असून त्यासाठी कलाकारांची निवड केली जात आहे. त्यामुळे अनुष्का या चित्रपटातील ‘सरोगेट मदर’ची भूमिका स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी अनुष्काच्याच नावाला पहिली पसंती देण्यात आली होती. राजस्थान आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

‘जॅस्मिन: स्टोरी ऑफ अ लीस्ड वोम्ब’ Jasmine: Story Of A Leased Womb हा महिलाप्रधान चित्रपट असून, एका मुलीचा आई होण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. याशिवाय आई आणि मुलाच्या नात्यातील बंध या चित्रपटातून पाहता येतील, असे श्री नारायण सिंग यांनी स्पष्ट केले. चित्रपटाचे लेखक असलेल्या सिद्धार्थ आणि गरिमा यांनी कथेवर बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता अनुष्का या चित्रपटात काम करायला तयार होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २०१८च्या सुरुवातीलाच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणाऱ्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने…

या चित्रपटाच्या निमित्ताने ‘क्रिअर्ज एण्टरटेन्मेंट’ या निर्मिती संस्थेमुळे नावारुपास आलेली प्रेरणा अरोरा या चित्रपटाच्या निमित्ताने श्री नारायण सिंग यांच्यासोबत तिसऱ्यांदा काम करणार असल्याचे चिन्हं असल्याचे कळतेय. यापूर्वी तिने ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काम केले होते.