नाटक सुरू असताना प्रेक्षकांचा मोबाइल फोन वाजून नाटकात व्यत्यत येऊ नये यासाठी आता डोअरकीपरचं काम करणार, असा निर्णय अभिनेता सुबोध भावेनं घेतला आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकादरम्यान प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंगटोन वाजल्यानंतर सुबोधने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रयोगादरम्यान फोन वाजल्यास यापुढे नाटकात काम करणार नाही, अशी टोकाची भूमिकाही त्याने घेतली होती. ”पण रंगभूमीने कलाकाराला इतक्या लवकर हार मानण्यास शिकवले नाही. त्यामुळे आता प्रयोग सुरू होण्यापूर्वी सहकलाकारांसोबत मिळून स्वत: डोअरकीपरचं काम करणार,” असं सुबोध म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोधने प्रेक्षकांना आवाहन केलं की, ”नाटक हे फक्त नटांचं नसतं. नाटकातून मिळणारा आनंद हा तुमचा हक्क असतो. तो आनंद घेताना तुम्हाला मोबाइल फोन काही तासांकरिता बंद किंवा साइलेंटवर ठेवता आलं पाहिजे.” आजपासून सुबोध नाटक सुरू होण्यापूर्वी डोअरकीपर म्हणून रसिकांचे मोबाइल फोन बंद किंवा साइलेंट आहेत का हे तपासणार आणि मग नाटकाला सुरुवात करणार आहे.

मूठभर प्रेक्षकांमुळे रसभंग होत असल्याचा राग सुबोधने व्यक्त केला. ”आपल्या खासगी समस्या विसरून संपूर्ण एकाग्रतेने कलाकार रसिकांना नाटकातून आनंद देण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी जर मोबाइल फोन वाजला तर तो त्या कलाकाराची अपमान आहे,” असं तो म्हणाला. याआधीही ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकारांनी नाटकादरम्यान मोबाइल फोन वाजण्यावर नाराजी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will work as a doorkeeper before drama says subodh bhave to stop mobile ring during play ssv
First published on: 29-07-2019 at 16:50 IST