अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीने ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या कार्यक्रमामध्ये सावळ्या रंगावरुन आपली खिल्ली उडवली गेल्याची बाब उघड केली आणि सोशल मीडियापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत सर्वांनीच या बाबतीत आपली मते मांडायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमे आणि नेटिझन्सनीही तनिष्ठाचा मुद्दा उचलून धरला होता. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता ‘कलर्स’ वाहिनीने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन या अभिनेत्रीची माफी मागितली आहे. या कार्यक्रमादरम्यान तनिष्ठाला आलेल्या वाईट अनुभवाविषयी ‘कलर्स’ वाहिनीद्वारे माफी मागण्यात आली आहे.

फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या या मॅसेजमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ‘आम्ही नेहमी अर्थपूर्ण गोष्टींनाच प्राधान्य देतो आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ च्या भागात वर्णभेदावरुन करण्यात आलेल्या विनोदांना मुळीच प्राधान्य देत नाही’. ‘कलर्स’ वाहिनीने व्यक्त केलेल्या दिलगिरीने तनिष्ठाचा संताप मात्र मावळलेला नाही असेच दिसत आहे. तनिष्ठाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘त्यांनी माझी खिल्ली उडवली पाहिजे होती’, असे ट्विट केले आहे. त्यामुळे आता ‘कलर्स’ वाहिनीने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून मागितलेल्या माफीवर तनिष्ठाने दिलेले मत पाहता ती या प्रकरणाला इतक्या सहजासहजी विसरणार नाही असेच दिसत आहे. सदर प्रकरणाशी संबंधित चर्चांना सोशल मीडियावर मात्र उधाण आले आहे.

दरम्यान ‘पार्श’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने तनिष्ठा चॅटर्जी आणि चित्रपटातील सहअभिनेत्रींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’च्या टिमने या कार्यक्रमामध्ये तनिष्ठाची तिच्या सावळ्या वर्णावरुन ‘काली कलूटी’, ‘तू जास्त ‘ब्लॅकबेरी’ खाल्ल्या असशील’, ‘मू काला है’ असे म्हणत खिल्ली उडवली होती.