‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक गौरी शिंदे तिच्या आगामी चित्रपटासह रुपेरा पडद्यावर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ‘डिअर जिंदगी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून गौरी अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूड बादशाहा शाहरुख खान यांची जोडी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे अशी चर्चा होती. त्यानंतर या चित्रपटामध्ये किंग खान फक्त पाहुणा कलाकार म्हणूनच झळकणार असल्याची माहितीसुद्धा सुत्रांमार्फत मिळाली. पण, अभिनेत्री आलिया भट्टने केलेल्या वक्तव्यानुसार शाहरुख शिवाय हा चित्रपट होणे शक्यच नाही असे स्पष्ट झाले आहे. ‘या चित्रपटातून जर शाहरुख खानचे पात्र वगळले तर, हा चित्रपटच राहणार नाही. त्यामुळे या चित्रपटातील शाहरुखची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे’ असे आलिया एका मुलाखतीदरम्यान म्हणाली आहे.
या चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त करताना ‘एसआरके सोबत या वर्षाअखेरीस येणारा हा चित्रपट म्हणजे ‘चेरी ऑन द टॉप’ आहे असेही आलिया म्हणाली. ‘मी या चित्रपटाबाबत अतिशय उत्सुक असून माझ्या उत्सुकतेची दोन कारणे आहेत. त्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, मला पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करायला मिळालेली संधी. माझे हे स्वप्न सत्यात उतरेल याचा मी विचारही केला नव्हता. दुसरे कारण म्हणजे अतिशय सरळ, सोपे पण तितकेच वेगळे या चित्रपटाचे कथानक’, असे मतही आलियाने मांडले. आतापर्यंत अशा प्रकारचे कथानक याआधी सांगितले गेले नव्हते असे सांगत आलियाने दिग्दर्शक गौरी शिंदेचेही कौतुक केले आहे. या चित्रपटासाठी आम्ही सर्व कलाकार आणि संपूर्ण टीम फारच आशावादी आहोत, अशी प्रतक्रिया दिल्यामुळे अनेकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2016 रोजी प्रकाशित
‘डिअर जिंदगी’ मध्ये शाहरुखचा कॅमिओ नाही…
'एसआरके' सोबतचा हा चित्रपट म्हणजे 'चेरी ऑन द टॉप'
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-08-2016 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without shah rukh khan there is no dear zindagi alia bhatt