डॉ. श्यामला वनारसे
‘शब्दवेध’ची निर्मिती असलेला ‘बिंदूनादकलातीत’ हा नवीन प्रयोग रसिकांसमोर सादर झाला. ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या संहितेवर आधारित ‘बिंदुनादकलातीत’ या प्रयोगाचे सादरीकरण ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे आणि हर्षद राजपाठक या तरुण रंगकर्मीनी मिळून केले आहे.
‘शब्दवेध’ या वर्षी ऑगस्टमध्ये पस्तिसाव्या वर्षांत पदार्पण करेल. गेल्या काही वर्षांत संस्थेने ‘अमृतगाथा’, ‘प्रीतरंग’, ‘साजणवेळा’, ‘आख्यान तुकोबाराय’, ‘अपरिचित पुलं’, ‘आज या देशामध्ये’ इत्यादी कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि त्यांनी आपल्या प्रयोगशीलतेच्या वाटा सिद्ध केलेल्या आहेतच. कार्यक्रमाच्या संकल्पनेपासून आपले वेगळेपण शब्दवेधच्या उपक्रमातून ठसलेले असल्यामुळे, जी संहिता वाचल्यावर याचे सादरीकरण कसे असेल? हा प्रश्न पडावा अशा संहितेची त्यांनी कार्यक्रमासाठी निवड केल्याचे आश्चर्य वाटत नाही; पण एकीकडे अत्यंत आत्ममग्न अशी ‘बिंदूनादकलातीत’ ही संहिता मौनातले एक विलक्षण नाटय़ वाचकापुढे आणते. ते उचलण्याचा हा प्रयोग एक शिवधनुष्य उचलण्यासारखा आहे. यातले मला सर्वात अधोरेखित करावेसे वाटते ते अंग म्हणजे चंद्रकांत काळे यांनी लावलेला वाचिक अभिनयाचा स्वर. लेखकाची झुंज आशयासाठी योग्य शब्द शोधाची असते तर नटाची त्या शब्दाला व्यक्त करणाऱ्या स्वराची. हा शोध अगदी कसून घेतला असल्याचे जाणवते. नेहमी नाटकातला शब्द समोर पोहोचवायचा असतो.
इथे तेही करायचे आणि आत्मस्वराचे खासगीपण अबाधित ठेवायचे ही मोठी आव्हानात्मक बाब होती. हा प्रयोग खिळवून ठेवतो तो त्यांच्या या प्रयत्नाने.एरवी काळे यांचा आवाज उत्तम फेक आणि शब्दोच्चार यासाठी प्रशंसा मिळवून गेलेला आहे. या प्रयोगात त्यांनी लावलेला आवाज आणि बोलण्याची धाटणी ही ‘पोहोचते’ तरीही अंतर्मुख प्रकृती सोडत नाही. हे मला मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते. यात घसरून जाण्याची शक्यता आहे, कारण त्यातील कथन ‘ईश्वराला पत्र’ असे आहे. संवाद तर आहे, पण एका अर्थी ते स्वगत आहे. आठवण आहे, त्यातही संवाद आहेत. काही वेळा तर कळलेले किंवा जाणवलेले शब्द आहेत. ही या संहितेतील आव्हाने आहेत आणि ती काळे यांनी नीट पेलली आहेत. आपण ऐकता ऐकता श्वास रोखून ठेवतो आणि अंतर्मुख होत जातो. अगदी शेवटी जेव्हा साहित्यातून ल्युसिफर हे पात्र येते, तेव्हा दुसरी व्यक्ती (हर्षद राजपाठक) येते आणि आपण जरा श्वास टाकतो! हर्षद राजपाठक या तरुण रंगकर्मीने ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली; पण हा संवादही एकीकडे स्वसमर्थन आणि दुसरीकडे वेगळे आणि बोचक भान अशा वाटेवर पोहोचतो. स्वातंत्र्याचा अबाधित ठेवलेला स्वर एकीकडे मात केल्याचा आनंद देतो, तर दुसरीकडे आपलेच तट आणि भिंती कोसळत गेल्याची तिखट जाणीव करून देतात.
महेश एलकुंचवार यांचे हे लेखन अतिशय निर्मम प्रकारे स्वत:ची तपासणी करते. एक लिहायचे थांबलेला लेखक ईश्वराला पत्र लिहितो आहे. तो कलावंत म्हणून स्वत:ला तपासतो आहे- आणि आपण कलावंत नसल्याचा निर्वाळा देऊन खरा आत्मशोध कोठे आणि कसा अवतार घेतो याची छाननी करतो आहे. हा सारा तपासच एकाच वेळी विस्मयकारक आणि वेदनादायी आहे, त्यात मौन हेच एक गूढ म्हणून जाणवते आहे, तो एक मार्ग आहे तो एक अर्थ आहे, त्यात एक अनाकलनीय गंतव्य आहे. आयुष्यातले अनुभव आणि आपल्या भूमिका आपली मानसिक आंदोलने आणि हताशा, न संपलेली प्रतीक्षा असे किती तरी सूक्ष्म कण या लेखनात आलेले आहेत. त्याची काव्यमय आत्मपरता टिकवून ते इतरांपर्यंत पोहोचवणे हे काम या प्रयोगाने अतिशय समर्थपणे केले आहे हे मात्र नक्की.