५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील ‘याही वळणावर’ हे नाटक पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात रविवारी, १० जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे. मुकुंद कुलकर्णी लिखित आणि हेमंत देशपांडे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती लोकहितवादी मंडळ, नाशिकच्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे. मिलिंद भणगे, नरेंद्र दाते, रसिका पुंड, हेमंत पवार, राजेंद्र सोनजे, स्वाती शेळके, शिरीष काळे, प्रशांत देशपांडे, डॉ. राजेश आहेर, पूजा चांदवडकर, गीतांजली घोरपडे यांनी या नाटकात भूमिका साकारल्या आहेत.

पुराणकाळापासून मानवाची स्वप्ने आणि प्रारब्ध यांच्याशी संघर्ष चालू आहे. स्वप्नांना जर प्राक्तनाची साथ असेल तरच यश मिळू शकते का? किंवा स्वप्नांच्या यशस्वितेसाठी पराकोटीचे प्रयत्न केले, तर प्रारब्ध बदलू शकते का? याचे उत्तर मनुष्य अनुभवाने असे दिलेय की, जे बरे वाईट घडले ते तुमच्या पूर्वसंचितावर आधारित प्रारब्धात असेल तरच अन्यथा नाही.