प्रेमाच्या त्रिकोणाच्या प्रेमात पडलेले यशस्वी निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा डेंगू तापाचे निमित्त होऊन २१ ऑक्टोबरला अचानक काळाच्या पडद्याआड गेले. ‘वीर-झारा’नंतर आठ वर्षांनी ‘जब तक है जान’ या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले होते. हा आपला शेवटचा चित्रपट, असं त्यांनी जाहीरही केलं होतं. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या बहुतांश चित्रपटांतील प्रेमकथा तर्कविसंगत होत्या, तरीही अवीट गोडीची गाणी आणि नयनरम्य छायाचित्रण ही त्यांच्या चित्रपटांची ओळख होती. त्यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी सारेगम इं. लि.ने ‘ए ट्रिब्यूट टू लिजेंडरी प्रोडय़ूसर अँड डायरेक्टर यश चोप्रा’ हा अल्बम रसिकांपुढे ठेवला आहे.
दोन सीडींच्या या संचाच्या पहिल्या सीडीत १५ तर दुसऱ्यात १३ गाणी आहेत. ‘धूल का फूल’ या चित्रपटातील ‘धडकने लगे बेकरारों की दुनिया’ या सदाबहार गीताने या अल्बमची सुरुवात होते. तुम्हारी आँखे (धरमपुत्र), ए मेरी जोहरजबीं (वक्त), अब चाहे माँ रुठे या बाबा (दाग), कभी कभी (शीर्षक गीत), क्या मौसम है (दुसरा आदमी), मोहब्बत बडे काम की (त्रिशूल), देखा एक ख्वाब (सिलसिला) या गाण्यांचा समावेश आहे. दुसऱ्या सीडीमध्ये बदलत्या काळातील बदलत्या संगीताचं प्रतिबिंब उमटलं आहे. आजा रे (नूरी), जिंदगी आ रहा हू मै (मशाल), मेरे हाथोंमे नौ नौ चुडियाँ है (चांदनी), तुझे देखा तो ये (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे), जादू तेरी नजर (डर), दिल तो पागल है (शीर्षक गीत), हम को हमीसे चुरा लो (मोहोब्बतें) आदी गाणी यात ऐकण्यास मिळतात.
यश चोप्रा यांना गाण्याचा कान आणि काव्याची जाण असल्याने (लता मंगेशकर व साहिर लुधियानवी ही त्यांची श्रद्धास्थानं, तसंच पहाडी हा त्यांचा आवडता राग) प्रस्थापित संगीतकारांपेक्षा नेहमीच वेगळ्या संगीतकारांना त्यांनी प्राधान्य-प्रोत्साहन दिलं. खय्याम यांच्या कारकीर्दीची दुसरी खेळी ‘कभी-कभी’मुळे सुरू झाली, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. याशिवाय शिव-हरी ही जोडी जमवण्याची कल्पकताही यश चोप्रांनी दाखवली. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून आधुनिक धाटणीचे संगीत (मशाल) मिळवण्याची किमयाही त्यांनी साधली. अनेक दिग्गज संगीतकारांकडे साहाय्यक संगीतकार या नात्याने काम करताना असंख्य गाजलेल्या गाण्यांमध्ये सिंहाचा वाटा असलेले उत्तम सिंग यांनाही त्यांनीच पहिला मोठा ब्रेक (दिल तो पागल है) दिला. यश चोप्रांमुळे हिंदी चित्रपट संगीत अधिक संपन्न झालं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yash chopra feature
First published on: 11-11-2012 at 12:15 IST