महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी अठरा र्वष पूर्ण केली. अठरा र्वष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. त्यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊ न ‘झी मराठी अ‍ॅवॉर्डस’चा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. ‘झी मराठी’वरील मालिकेतील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, ‘चला हवा येऊ  द्या’ च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ आणि ‘झी मराठी एचडी’ वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.

‘झी अ‍ॅवॉर्ड्स’मध्ये कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक-नायिका कोण?, लोकप्रिय मालिका कोणती असेल, याविषयी कायम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. यावर्षी तर दोन मालिकांमध्ये चुरसही तशीच होती. ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये यावेळी चुरशीची स्पर्धा रंगली. त्यात ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट साहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावत या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कारासाठी तर या दोन मालिकांमध्ये एवढी स्पर्धा रंगली की प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. यावर्षीच्या सोहळ्याची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युँ ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शीतल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नूपुर या जोडय़ांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिका-शनाया, भानू-शोभामधील टशन दाखवणाऱ्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ  द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने या सोहळ्याला अधिकच रंगत आणली.