करोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज या लॉकडाउनचा नववा दिवस आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक सध्या घरीच आहे. या काळात घरात राहून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी टॉकीज प्रीमिअर लीगची घोषणा केली आहे. येत्या पाच तारखेपासून म्हणजेच रविवारपासून दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या दोन वेळांमध्ये प्रेक्षकांना एक नवीन दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
टॉकीज प्रीमिअर लीगमध्ये प्रेक्षकांना घरबसल्या९ उत्कृष्ट मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ५ एप्रिल ते ३१ मे दरम्यान पार पडणार असलेल्या ‘टॉकीज प्रीमियर लीग’मध्ये विनोदी, थरारक, रोमॅण्टिक, हॉरर इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम व नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. एक गूढ रहस्य उलगडणाऱ्या ‘तुंबाड’ या चित्रपटापासून ‘टॉकीज प्रीमिअर लीग’ची सुरुवात होईल. नवनाथांची महती सांगणारा भक्तीपट ‘बोला अलख निरंजन’ आणि प्रेक्षकांना एका सुंदर ठिकाणाची सैर घडवणारा ‘हंपी’, एवढेच नाही तर, एका ‘टॉकीज ओरिजिनल’ चित्रपटाचा सुद्धा या लीगमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ‘झी टॉकीज’ची निर्मिती असलेला ‘आलटून पालटून’ हा हॉरर विनोदीपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. बहीण-भावाची जोडगोळी असलेला ‘खारी-बिस्कीट’ आणि त्यानंतर ‘टकाटक’ ही रोमॅण्टिक कॉमेडी ‘झी टॉकीज’वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘दाह’ हा चित्रपट त्यापुढील रविवारी पाहता येईल. या सर्व उत्तम चित्रपटांनंतर, ‘फत्तेशिकस्त’ हा सुपरहिट चित्रपट पाहण्याची संधी ‘झी टॉकीज’च्या प्रेक्षकांना मिळणार आहे.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या काळात अशोक सराफ, भाऊ कदम, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनिता दाते, सोहम शाह, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री असे सारे कलाकार, ‘झी टॉकीज’वर आपल्या भेटीला येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, ‘झी टॉकीज’ वाहिनीवर प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत हे चित्रपट पाहून टॉकीज प्रीमिअर लीगचा आनंद घेऊ शकतात.
“शासनाकडून आपल्या हितासाठी, लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ‘टॉकीज प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून, तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत, हा वेळ आनंदाने घालवू शकता. लोकांच्या मनोरंजनात अडथळा येऊ नये, याची काळजी ‘झी टॉकीज’ घेत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील दर रविवारी एक दर्जेदार मराठी चित्रपट, ‘टॉकीज प्रीमियर लीग’मध्ये बघता येणार आहे. हे सर्व चित्रपट उत्तम दर्जाचे आणि विविध धाटणीचे असतील. प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन व्हायला हवे, यासाठी, त्यांच्या आवडीचे उत्कृष्ट चित्रपट ‘झी टॉकीज’ वाहिनी त्यांच्यासाठी घेऊन येत आहे,” असं ‘झी टॉकीज’चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलं.