15 August 2020

News Flash

अखेर.. अनुभव आणि आठवणी

वाटचालीतील अनुभव आणि आठवणी समाधानकारक असल्या की निरोप घेणेही समाधानकारक ठरू शकते.

वाटचालीतील अनुभव आणि आठवणी समाधानकारक असल्या की निरोप घेणेही समाधानकारक ठरू शकते. आठवणी आणि अनुभव आपले जीवन समृद्ध करतात. अनुभव व आठवणी या शब्दांआधी ‘गोड’, ‘सुखद’ जोडले  जाते की ‘कटू’, ‘दु:खद’ हे कधी आपण, तर कधी परिस्थिती ठरवत असते. अनुभव व आठवणी एकमेकांत गुंतलेल्या असतात. आपल्याला एखादा अनुभव येतो, मनावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर आठवणीत होते. आठवण आपल्याला कधी सुखद, तर कधी विचलित झाल्याचा अनुभव देते. त्यामुळे आपण जीवनात कोणते अनुभव घेतो आणि आठवणी तयार करतो- स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल- याला विलक्षण महत्त्व आहे. विशिष्ट स्थळं, व्यक्ती, संवेदना, सहली, छंद, खाद्यपदार्थ, उपक्रम, सवयी, निवडी या व इतर कित्येक घटक आणि घडामोडींवर आपले अनुभव आणि आठवणी उभारलेल्या असतात. त्या आपले दैनंदिनच नव्हे, तर एकंदर जीवन व्यापून टाकतात.

आपले विचार, भावना, आचारचक्र यात विशेष महत्त्वाचे ठरते. ‘अनुभव जसा, आठवण तशी’ हे समीकरण ध्यानात ठेवले तर आपल्या लक्षात येईल, की आपल्याला मुळात अनुभव घेतानाच किती दक्ष, डोळस, सक्रिय आणि विचारीपणाने वागण्याची गरज आहे. स्वत:शी संवाद साधताना वा कुटुंबात गप्पांचे फड रंगताना आठवणींना उजाळा दिला जातो. स्वाभाविकच या आठवणींचे स्वरूप तसे- जसे  त्यामागील अनुभव! म्हणजेच आठवणींची उजळणी आल्हाददायी आणि समाधानकारक हवी असल्यास आपण अनुभव घेण्याच्या टप्प्यावर ‘बौद्धिक- भावनिक’ कसरत करणे क्रमप्राप्त ठरते.

आता कसरत म्हटली की तिचा सकारात्मक प्रभाव दिसून यावा म्हणून त्यात विचारपूर्वक योजना, नीती, नियमितता आणि परिणामांवर बारीक नजर अपेक्षित असणार. शारीरिक कसरत करत असताना आपला आहारही त्याजोगा हवा असे तज्ज्ञ मानतात. अगदी तसेच बौद्धिक-भावनिक कसरत करताना आपला मानसिक आहार किती पोषक आहे याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक प्रदेशाची जशी खाद्यसंस्कृती भिन्न, तशीच प्रत्येक कुटुंबाची आणि त्यातील व्यक्तींची मानसिक खाद्यसंस्कृतीही वेगवेगळी. स्वत:च्या मानसिक क्षमतेनुसार, शैलीनुसार आणि आजूबाजूच्या गत किंवा सद्य:परिस्थितीनुसार प्रत्येक व्यक्तीचा वैचारिक आहार घडत असतो. विचारांमध्ये जितकी सुज्ञता, प्रगल्भता, वस्तुनिष्ठता- भावनिक वर्तनात्मक यष्टी तितकीच धष्टपुष्ट! काही लोक आपल्याला अति नकारात्मक वा अवास्तवरीत्या सकारात्मक भासतात. या दोन्ही प्रवृत्तींमध्ये प्रक्रिया अशी घडते : एखादा अनुभव येतो, आपण त्यावर सवयीचा- स्वाभाविक विचार जोडतो आणि त्याजोगी साधारण आठवण संचयात जागा करते. पुन्हा त्या आठवणीची उजळणी करतो आणि त्या उजळणीचा परिणामही तसाच समाधानकारक वा असमाधानकारक ठरतो.

गोम ही, की ही प्रक्रिया वर्षांनुवर्षे अशीच राबवल्यावर एक ‘पॅटर्न’ तयार होतो. हा पॅटर्न जर आत्मोन्नती रोखणारा असला तर पंचाईत! आपण हा पॅटर्न मग स्वीकारतो, आपल्याला तो सुसह्य़ होतो व आपण निष्ठेने तो राबवतो. ही पहिल्या पायरीवरील वैचारिक कसरत जर आपण सुयोग्यरीत्या योजली, राबवली तर हा पॅटर्न आपोआप निर्माण होऊन आपले अधिराज्य गाजवण्याचा संभव नाहीसा होईल आणि आपले नियंत्रण प्रस्थापित करता येईल.

आपल्याला जाणवले नाही तरीही आपल्या प्रत्येकाकडे एक वैचारिक ‘फिल्टर’ असतो. किंबहुना तो असावा. अनुभव आणि त्यातून येणारे विचार आपल्या मानसिकतेवर येऊन आदळत असतात. क्षणोक्षणी हे अनुभव काय असतील, ते कसे असावेत याचे अंदाज आपण बांधू शकू कदाचित; परंतु त्यांचे आठवणींमध्ये रूपांतर होण्याआधी हा वैचारिक ‘फिल्टर’ उपयोगात आणावा. एखाद्या परिस्थितीला सामोरे गेल्यावर प्रथम आपल्या मनात येणाऱ्या स्वाभाविक विचार, भावनांचा स्वीकार करावा. दोन्हींचे मग मूल्यमापन करावे, त्यांची गुणवत्ता जोखावी. कोणत्याही अनुभवाबद्दल विचार करताना आपण गतानुभव वा आपल्या ज्ञानाशी, आठवणींशी त्याची सांगड घालतो, तुलना करतो. अनुभवाचा सखोल अभ्यास करण्यास हे उपयुक्त ठरेलही कदाचित; परंतु जर आपण प्रत्येक नवा अनुभव जुन्या कटू आठवणींच्या संदर्भाने पाहत राहिलो तर प्रत्येक अनुभव ही कटू आठवणच बनेल. म्हणजे प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावताना आठवणींचा संदर्भ जरूर घ्यावा; परंतु त्यावर पूर्णपणे विसंबणे टाळावे. याने पूर्वग्रह टाळून नव्या दृष्टिकोनातून नव्या अनुभवाकडे पाहता येईल. आपल्या वैचारिक ‘फिल्टर’चे हेच काम आहे. पोषक विचारच केवळ आठवणी बनण्याच्या मार्गापर्यंत पोहोचवणे आणि इजा पोहोचवणारे विचार गाळ म्हणून बाजूला सारणे.

दैनंदिन आयुष्यात आजूबाजूच्या आणि स्वत:च्या परिस्थितीकडे आपण सजगपणे पाहिले, अभ्यासले, समजून घेतले, आत्मसात केले तर एकंदर जीवनातील आठवणींचा संचय समृद्ध होऊ शकेल. तसेच त्यांची उजळणी करताना चेहऱ्यावर हसू उमटेल.

विचारवंत मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन यांनी मानवाच्या मनो-सामाजिक विकासाचे व संघर्षांचे काही निकष अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. वय सरते त्याप्रमाणे हे संघर्ष आणि त्यांचे स्वरूप बदलत जाते. बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत हे विकास-संघर्ष स्तर व्यापून आहेत. प्रत्येक स्तर यशस्वीरीत्या पार करून पुढच्या स्तरावर जाणे अपेक्षित असते. प्रत्येक स्तरातील यशस्वी वाटचाल ही त्या व्यक्तीला विशिष्ट सद्गुण-मूल्य बहाल करते. उदा. तान्ह्य बाळाच्या वयोगटातील संघर्ष म्हणजे मूलभूत विश्वास विरुद्ध अविश्वास. हा स्तर विश्वसनीय पालनकर्त्यांच्या सान्निध्यात त्या बाळाने पार केला तर आशावादाचा सद्गुण त्याच्या व्यक्तित्वाला जोडला जातो. एरिकसन यांनी प्रत्येक स्तरास एक वयोगट जोडला आहे. स्व-प्रयत्नाने व परिस्थितीच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्ती यशस्वीरीत्या त्या, त्या गटातील संघर्षांला सामोरी जाते व तो स्तर पार करते. किंबहुना तसे अपेक्षित आहे. यांतून यशस्वीरीत्या मार्गक्रमण केल्यास आयुष्याच्या उत्तरार्धात येणारा संघर्षस्तर म्हणजे एकरूपता, अखंडत्व विरुद्ध आशाभंग, निराशासदृश स्तर. हा स्तर यशस्वीरीत्या पार केल्यास तो शहाणपण, चातुर्य, उमज, प्रगल्भता ही मूल्ये बहाल करतो. गतायुष्याचा आढावा घेण्याचा हा स्तर. आपण आयुष्य कसे जगलो, किती गुणमय जीवन अवलंबिले, काय कमावले/ गमावले, काय निर्णय घेतले, ते किती प्रमाणात योग्य-अयोग्य ठरले, त्यांच्या परिणामांचा स्वीकार कसा केला, नातेसंबंध कसे प्रस्थापित केले, जपले, बहरवले, स्वत:च्या व इतरांच्या गरजा, अपेक्षा, आकांक्षा, इच्छा कशा सांभाळल्या, त्यांची पूर्तता केली का, वेळोवेळी आत्मपरीक्षण केले का, इतरांच्या कार्याची, मदतीची, कला-कौशल्याची प्रकट प्रशंसा केली का, किमान नोंद तरी घेतली का, राग, द्वेष, तिरस्कार, निराशा यांसारख्या नकारात्मक भावनांचा स्वीकार व त्यांचे व्यवस्थापन कसे केले, जबाबदारी न टाळता ती शिरावर घेऊन प्रगल्भतेने, वस्तुनिष्ठपणे किती प्रमाणात वागलो, दया, करुणा, सहअनुभूती, प्रेम, जिव्हाळा, अटरहित स्वीकार करता आला का, भेद व भिन्नतेकडे उच्च-नीच वा चांगले- वाईट अशा चष्म्यातून पाहण्यापेक्षा विविधतेच्या नजरेतून, सहिष्णुतेने किती प्रसंगांत पाहिले.. टोकाचा विचार (सुवर्णमध्याचा विसर पडून वा दुर्लक्षित) करून पुराव्याविना हलगर्जीपणाने निष्कर्षांस आलो का, इतरांच्या सद्हेतूप्रति गैरसमज करून घेतला का, इतरांवर अविश्वास दाखवला का, अपमान/ टीका केली का,  गुणांचा आदर करण्यापेक्षा न्यूनगंडांवरच बोट ठेवले का, नातेसंबंधातील आपल्या भूमिका कर्तव्यदक्षतेने पार पाडल्या का.. या व यांसारख्या प्रश्नांनी हा स्तर ग्रासलेला असतो. आपण सूक्ष्मात जाऊन या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवली वा त्यासाठी प्रयत्न केल्यास आपल्या लक्षात येईल की, हे प्रश्न आपण स्वत:स वृद्धत्वात विचारणे पुरेसे नाही. काही चुकले, राहून गेले तर ते दुरुस्त करण्याच्या, पुन्हा स्थिरस्थावर स्वरूपात आणण्याच्या संधी तेव्हा थोडक्या असतात.

स्वैर वा बेसावध जीवन हे केवळ आपल्याला इतरांपासूनच नव्हे, तर स्वत्वापासूनही दूर नेते. स्वत्व ढळले की त्याचा विपरीत परिणाम आपल्या विचार- भावना-वर्तनचक्रावर होतो. प्रत्येक परिस्थितीत प्रवेश करताना, त्यात वावरताना आपण वस्तुनिष्ठ, प्रगल्भ, वाजवी विचार (rational thought) उराशी बाळगण्याचा संकल्प करावा. त्याने आपले भावविश्व सशक्त बनेल आणि त्या अनुषंगाने आपला आचार व निर्णयही! थोडक्यात, स्वत:च्या व इतरांच्या मानसिकतेचा आढावा नित्य घ्यावा. योग्य-अयोग्य प्रवृत्तींचे अवलोकन करावे. बदल लाभदायी वा अपरिहार्य असल्यास त्यांचा स्वीकार करावा व आव्हानास सामोरे जायची मानसिक तयारी करावी. सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक बांधिलकी ढळू देऊ नये.

अनुभवांचे गाठोडे बांधताना या गोष्टी जरूर स्मरणात ठेवाव्यात, आचरणात आणाव्यात. विचार, भावना, आचार या चक्राची डागडुजी वेळोवेळी करावी. बौद्धिक-भावनिक कसरतीचा आराखडा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन आखावा, म्हणजे जीवन जगताना गोळा केलेल्या अनुभवांच्या गाठोडय़ाची गाठ सोडली की सामोऱ्या येतील सुखद, गोड आठवणी!

इथवरचा हा वार्षिक प्रवास हा अनुभव साठा तयार करण्याच्या दिशेने योजलेला होता. हा साठा आपणास उत्तम, उपयुक्त आणि ऊर्जाउन्नती बहाल करणाऱ्या आठवणी देत राहो, ही सदिच्छा!

डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.) (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2016 1:01 am

Web Title: experience and memories
Next Stories
1 शहाणपण देगा देवा
2 लोक.. असेही आणि तसेही!
3 प्रेम
Just Now!
X