10 April 2020

News Flash

गैरसमज

‘गैरसमज’ याचा नेमका अर्थ काय? गैरसमज म्हणजे योग्य समज करून घेण्यात आलेले अपयश.

मानवी नातेसंबंधांतील सर्वात भयंकर धोक्यांमध्ये गैरसमज हा म्होरक्या असावा. चटकन् आपला प्रभाव मनामनांत निर्माण करण्याचं कौशल्य त्याला अवगत आहे. प्रसंग व काळ-वेळेची तमा न बाळगणारा आणि मनुष्याच्या मानसिकतेला लगेचच इजा पोचवण्याची क्षमता असणारा असा हा ‘गैरसमज’! तो घराघरांत नांदतोय. मनामनांना दुरावतोय. तरीही तो कायम टिकून आहे. गैरसमज हा काही आभाळातून कोसळलेला नाही, की आपले ज्यावर नियंत्रण नाही. मन आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीतून निर्माण झालेला, काही वेळा गोड, तर नेहमीच गैरवर्तन करणारा आणि करविणारा असा हा घटक!
‘गैरसमज’ याचा नेमका अर्थ काय? गैरसमज म्हणजे योग्य समज करून घेण्यात आलेले अपयश. एखादा तंटा, मतभेद, एखादे बोलणे, वागणे, भूमिका, दृष्टिकोन यांचे योग्य ते अवलोकन करण्यात वा त्यांचा अर्थ लावण्यातली चूक. एखाद्या शब्दाचा, प्रसंगाचा, हेतूचा चुकीचा अर्थ लावून त्यावर दृढ विश्वास ठेवणे, असाही त्याचा अर्थ असू शकतो. या सर्व शाब्दिक अर्थामध्ये अपयश, चूक या शब्दांवरून ही मन:स्थिती नकारात्मक आहे, हे वेगळे सांगायला नकोच.
एक उदाहरण पाहू. प्राचीने राजीवला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली. राजीवने ते ऐकलं- न ऐकलंसं करून ‘let’s see…..’ एवढंच म्हटलं. प्राचीला काही त्याचं हे उत्तर फारसं रुचलं नाही. त्यावर तिचा ‘स्वसंवाद’ (self talk) काहीसा असा : ‘राजीवला ऑफिसची कमिटमेंट सर्वात महत्त्वाची असते, हे काही मला नवं नाही. पण माझी ही छोटीशी विनंती- एक दिवसाची रजासुद्धा या कमिटमेंटआड येईल असं वाटलं नव्हतं. त्याने स्वत: तर आपणहून माझ्या वाढदिवसाचा हा विषय काढलाच नाही, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मीच तो विषय काढला. त्यावरही त्याचं हे असं तटस्थ उत्तर असेल तर कमालच म्हणायची!
लहानपणचे दिवस किती छान होते! आईच्या हातच्या सुग्रास पदार्थाची यादी वाढदिवसाच्या आठवडाभर आधीपासूनच सुरू. आपण फक्त ऑर्डरी सोडायच्या आणि केकचा फ्लेवर कोणता, हे फक्त सांगायचं. बाबांकडे गिफ्ट्सची यादी आधीच देऊन ठेवायची. आणि आईबरोबर स्पेशल वाढदिवसाचा ड्रेस घ्यायला जायची तारीख ठरली, की वाऽऽऽ! काय मजेत जायचा तो आठवडा! माझा वाढदिवस आई-बाबा राष्ट्रीय सण असल्याच्या थाटातच साजरा करायचे!’
‘गेले, ते दिन गेले’ या आविर्भावात प्राची वाढदिवसाकडे ‘just another day’ म्हणून बघायचं ठरवते. पण दररोज हलकेसे टोमणे मारणं, राजीवच्या त्या बोलण्याने दुखावली गेलेली असूनही प्राचीची आपल्याला त्यानं काहीच फरक न पडल्याचं सतत उद्धृत करण्याची धडपड आणि ‘बिचारी मी!’ हा भावनिक Mode आठवडाभर सुरूच राहिला. अखेर तो दिवस उजाडला. नऊ वाजले तरी राजीव ऑफिसला जायला निघत नाही म्हटल्यावर प्राची जरा गोंधळली. तेवढय़ात राजीवने ऑनलाइन मागवलेला फुलांचा गुच्छ दारात हजर! प्राचीला अगदी भरून आलं. तिने राजीवकडे पाहिलं. तोही हसला. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘तयार हो’ म्हणाला. प्राचीच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवण आणि मग सिनेमा असा बेत त्याने आखला होता. प्राचीला मागील आठवडय़ातला तिचा ‘स्वसंवाद’ आठवला. राजीवचा हेतू, कृती, विचार व भावनांबद्दल आपण दाखवलेली साशंकता प्रकर्षांने आठवली. पण स्वत:शीच हसून ती चटकन् तयारीला लागली!
या प्रसंगाकडे बारकाईने पाहिलं तर काही गोष्टी सहज लक्षात येतील. गैरसमजाच्या भावनेला द्वार खुले करण्यासाठी आपण अनवधानाने केलेले वर्तन आणि विचार!
राजीवचे उत्तर त्याने ठरवलेल्या या ‘सरप्राइज आऊटिंग’मुळे दिले होते. परंतु संवाद अधांतरी ठेवल्यामुळे प्राचीच्या स्वसंवादाची दिशा भरकटायला लागली. तिचा तो आठवडा राजीवच्या हेतूवर, प्रेमावर, प्राधान्यक्रमांवर आक्षेप घेण्यात सरला. शेवट गोड झाला म्हणून कदाचित हा आठवडा विस्मरणात जाईल. परंतु आपल्याला नेहमीच ‘All ended well…’’..’ ही संधी चालून येईलच असे नाही. यावरून आपल्या लक्षात आलंच असेल, की संवाद (शाब्दिक आणि देहबोलीचा) याकामी नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतो.
गैरसमजाला थारा द्यायला मदत करणारे घटक कोणते, ते पाहू या.
दोन व्यक्तींतील चर्चेची भाषा भिन्न असल्याने एकाला दुसऱ्याची भाषा न समजल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात. या अडचणीपलीकडे मुळातच संवाद नसणे वा अपूर्ण स्वरूपाचा असणे, किंवा अयोग्य संवादशैलीचा वापर यानेही गैरसमज होऊ शकतात. गैरसमज बऱ्याचदा आपल्या अंगवळणी पडलेला असतो. एखादा शब्द, वाक्य, भूमिका, दृष्टिकोन, घटना वा व्यक्तीबाबत चटकन् काहीएक ‘समज’ करून घेऊन त्याचे गैरसमजात रूपांतर होत असावे. वारंवार ही प्रक्रिया घडल्यास मग गैरसमज हीच स्वाभाविक प्रतिक्रिया- response of convenience and compulsion ठरत असावी.
गैरसमज जसा सुलभ तसाच सर्वव्यापी आहे. गैरसमजामुळे व्यक्तीची मानसिकता, ‘स्व’त्वाच्या कल्पना, करीअर व परस्परसंबंधांतील सौख्य, सबुरी, विश्वास, आत्मीयता, आशा, इच्छा यांना ठेच पोहोचते. त्यांच्यात अंतराय निर्माण होतो. भांडणे होतात. त्याने प्रगती खुंटते.
आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गैरसमजांना ठाम नकार देणे गरजेचे आहे. खरं तर प्रथम त्याची निर्मितीच होऊ देऊ नये. अनवधानाने वा दुर्लक्षामुळे किंवा अज्ञानामुळे तो झालाच, तर दीर्घकाळ त्यास थारा देऊ नये. यासाठी योग्य ती पावले वेळीच उचलणे फायद्याचे ठरेल. गैरसमज दूर ठेवण्यासाठी प्रथम आपल्या वैचारिक चुका (बऱ्याचदा अनवधानाने वा त्याच्या असण्याबद्दलच्या अज्ञानामुळे होणाऱ्या) टाळायला हव्यात. अ‍ॅरोन बेक, अल्बर्ट एलीस यांच्यासारख्या दिग्गज मानसोपचारतज्ज्ञांच्या वर्षांनुवर्षांच्या संशोधनातून सिद्ध झालेले हे ज्ञान (वैचारिक चुकांबद्दलचे) समजून घेऊ या.
वैचारिक चुका या काही विशिष्ट व अयोग्य विचार, भावना व वर्तनशैलीतून घडतात आणि गैरसमजास निमंत्रण देतात. यास्तव आपल्या हातून चूक तर होत नाहीए ना, हे आधी पडताळून पाहावे. केवळ दोन टोकांचा विचार करणे, त्यामुळे सुवर्णमध्य न साधता येणे, हे किंवा ‘ते’ च.. अधेमधे काहीच नाही, त्यामुळे सर्व बाबींच्या विचारांकडे दुर्लक्ष, आपल्या सोयीनुसार प्रसंग किंवा समोरच्याच्या हेतूचा/ शब्दांचा अर्थ लावणे, शंका घेणे, समोरच्या व्यक्तीच्या हेतू वा भूमिकेवर थोडक्या किंवा अज्ञात माहितीच्या आधारे त्वरित निष्कर्षांप्रत येणे, आपण दुसऱ्याचे मन सहज आणि योग्यच वाचू शकतो असा भ्रम वा ग्रह करून घेण, छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा बागुलबुवा करणे, सत्य पडताळून न पाहता सहज उपलब्ध माहितीवर (योग्य-अयोग्यतेची छाननी न करता) विसंबून इतरांशी वागणे व बोलणे बदलणे, इतर व्यक्तींप्रति पूर्वग्रहदूषित विचार व वर्तन.. या व इतर वैचारिक साशंकतेमुळे आपल्याला बऱ्याचदा सुस्पष्ट दृष्टी ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ग्रह करून घेऊन, तो योग्य की अयोग्य पडताळून न पाहणे; किंबहुना मी केलेला विचार योग्यच आहे, या अहंभावातून निर्माण झालेल्या विचाराला छेद देणे आपण टाळतो. या कारणांमुळेच गैरसमज झालेल्या घटनेशी किंवा व्यक्तीशी आपले आपुलकीचे वा आत्मीय संबंध नसतात/ राहत नाहीत.
गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं. मेहनत घेऊन सत्य शोधावं लागतं. काही वेळा पडती बाजू घ्यावी लागते. या सगळ्यासाठी आपली मानसिक तयारी कमी पडते. म्हणूनच आपण गैरसमजात राहून, दुसऱ्याला नावे ठेवून, स्वत:कडे ‘बिचारे’पण घेणे सोयीचे, सवयीचे समजतो. आणि गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाया जातोय असा वाटणारा (खरं तर उपयुक्त प्रक्रियेत गुंतवलेला) वेळ व शक्ती वाचवतो. गैरसमज दूर न करणे म्हणजे बरेच धागे सैल व सुटे ठेवण्यासारखेच आहे. असे किती धागे या स्थितीत ठेवणे आपल्याला परवडण्यासारखे आहे याचा आपणच विचार करावा. गैरसमजाचा हा धागा सुटा असल्याने (स्वैर विचारांच्या आणि दूषित पूर्वग्रहांच्या) नियंत्रणरहित होऊ द्यायचा, की त्याला योग्य व सुज्ञ ‘समजा’च्या कुलपात अडकवून जीवन जटील व गुंतागुंतीचे न करता नातेसंबंधांचा आस्वाद घ्यायचा आणि प्रगतिशील राहायचे, हे आपल्यालाच ठरवायला हवे.
आता ही वीण घट्ट बांधायची कशी? प्रथम समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे आणि संवेदनशीलतेने ऐकूया. समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याला आपल्या चष्म्यातून पाहून लेबल लावण्याऐवजी ते ऐकून व समजून घेऊ. समजलेले योग्य आहे का, ते पुन्हा पडताळून पाहू. आपले ध्येय योग्य समज होणे हे आहे; समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक मताशी सहमत असणे नाही. समोरच्या व्यक्तीला जे म्हणायचे आहे व आपल्याला जे समजले आहे ते जर सारखेच असेल तर गैरसमजाला थारा मिळणे कठीण. आपली संवादशैली, शब्दांची निवड, देहबोली, आवाजाचा स्वर व बोलण्याचा वेग यावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण आणले व समन्वय साधला तर संवाद आणि होणारा ‘समज’ यांत आणि पर्यायाने नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता येईल आणि ही पारदर्शकता लाभदायक ठरेल यात कोणाचेच दुमत नसावे.
इतरांशी संवाद, त्याचे ठोकताळे आणि पैलू आपण पाहिले. आत्मसंवादही वैचारिक चुकांविरहित असेल तर गैरसमज दूर पिटाळून लावण्यास वेळ लागणार नाही. आत्मसंवाद करताना एखाद्याबद्दल किंवा घटनेबद्दल आलेला अनुभव, त्यामागील विचार व भावना याकडे प्रयत्नपूर्वक तटस्थ भूमिकेने पाहावे. सुरुवातीला कठीण वाटेल, कदाचित अशक्यही; परंतु हे न केल्यास नुकसान ठरलेलेच. हे आपण स्वत:ला वारंवार सांगत राहिलो तर कदाचित आत्मसंवाद दृढ करण्याची प्रक्रिया आपण गांभीर्याने घेऊ. त्यासाठी- माझा झालेला समज हा घडलेल्या प्रसंगाच्या प्रत्येक (दृश्य/ अदृश्य) बाबींचा विचार करून मगच झालेला आहे का? मी पूर्वग्रहदूषित विचार करून मुद्दाम वस्तुस्थिती नाकारत आहे का? मी माझ्या स्वार्थाचा/ सोयीचा विचार फक्त करत नाही ना? संबंधित गैरसमज दूर न केल्याने माझ्या आयुष्याच्या कोणकोणत्या बाबींवर विपरीत परिणाम होणार आहे? माझ्या स्वत:वर, कुटुंबीयांवर, आप्तेष्टांवर, नोकरी-व्यवसायावर, राहणीमानावर आणि समाजावर या गोष्टीचा काय परिणाम होईल?.. हे प्रश्न स्वत:ला विचारावेत.
या प्रक्रियेत प्रसंगी आपला विश्वास असलेल्या व्यक्तीचे साहाय्य घेण्यास हरकत नाही. ती व्यक्ती नि:पक्ष व तटस्थपणे सहकार्य करेल अशीच निवडावी. गरज भासल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्यावी. काही वेळा आपल्याला कळतही नाही, की आपण गैरसमजांनी ग्रासलेले आहोत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, आप्तेष्टांच्या बदलत्या भूमिका व दृष्टिकोनांकडे, सहकाऱ्यांच्या सूचक वागण्याकडे आपण डोळसपणे पाहिले, सजगतेने ते अनुभवले आणि विनम्रतेने मान्य केले, तरच बदल हा परिस्थितीत नसून, स्वत:च्या दृष्टिकोनात, विचार व वर्तनप्रक्रियेत हवा आहे, हे आपल्याला जाणवेल आणि ही जाणीवच आपल्याला गैरसमज समूळ नष्ट करण्याची प्रेरणा देईल.
n ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 1:01 am

Web Title: misunderstanding 2
Next Stories
1 विनम्र स्पष्टवक्तेपणा
2 ‘क’ स्पेशालिस्ट
3 जावई नं. १
Just Now!
X