अंत:करणात जोवर शुद्ध भाव जागा होत नाही, तोवर खरं अंत:स्थ समाधान जे आहे ते काही लाभत नाही. जीवनात थोडं थोडं करत सुख मिळवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो, पण चिमटीतल्या वाळूप्रमाणे ते सुख वेगानं ओसरतंही. त्यामुळे कितीही सुख मिळालं, तरी माणसाची काही तृप्ती होत नाही. भगवंताची भक्ती केल्यानं तरी निदान ही तृप्ती मिळेल, या काहीशा कल्पनेनं माणूस या मार्गाकडे वळतो. मग तो कळतील तशी, सुचतील तशी आणि कुणी सांगेल त्यातलं साधेल तशी पावलं टाकू लागतो. म्हणजे काय? तर, पारायण करू लागतो, उपास-तापास धरू लागतो, तीर्थयात्रांच्या भ्रमंतीत रमू लागतो. सगळं करू लागतो खरं, पण तरी समाधानी काही होत नाही! याचं कारण भौतिक जीवनातले अनुकूल बदल, हेच त्याचं मोजमाप असतं. म्हणजे मी इतके उपास केले, तर भौतिकातलं माझं अमकं काम व्हायलाच हवं, हे त्याचं मोजमाप असतं! मग ‘भगवंताची भक्ती’ म्हणून तो जे जे काही करतो ती खरं तर आपल्या भौतिक जीवनाचीच भक्ती असते! या ‘भक्ती’नं भगवंताविषयी नव्हे, आध्यात्मिक वाटचालीविषयी नव्हे, तर भौतिक जीवनाविषयीच तळमळ, ओढ आणि प्रेम वाटू लागते. या मार्गाचं यथायोग्य आकलन होण्यासाठी आणि खरी वाटचाल साधण्यासाठी खऱ्या सद्गुरूचीच अनिवार्यतेनं गरज असते. मात्र तो खराच असला पाहिजे! ज्याला रस्ताच नीट माहीत नाही किंवा चुकीचा रस्ताच माहीत आहे तो मुक्कामाला नेऊच शकणार नाही. तो सद्गुरू लाभेपर्यंत संतसज्जनांच्या बोधानुसार आचरण करण्याचा अभ्यास अत्यावश्यक आहे. आता जे सज्जनांच्या बोधानुसार आचरणाचा अभ्यास करीत नाहीत किंवा असा खरा सत्संग लाभूनही भौतिकातील सर्व प्रकारची प्रतिकूलता संपणं, हेच ज्यांच्या ‘भक्ती’चं मोजमाप राहातं, त्यांना ‘पुढे पाहता सर्वही कोंदलेसे,’ हा अनुभव येऊ  लागतो! मी इतका जप करतो, मी इतक्यांदा अमकं स्तोत्र वाचतो, मी इतक्यांदा पारायणं करतो, मी इतक्यांदा उपास करतो; तरीही माझ्या मनाप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत, हा भाव मन पोखरू लागतो. हे जे ‘मी करतो,’ आहे ना तेच तर आड येत असतं! ‘मी’ करतो ते ‘माझे’साठीच असेल, तर ‘मी’ पूर्णपणे ‘त्याचा’.. त्या एका परमात्म्याचा कधीच होऊ  शकणार नाही. जो दुनिया के लिए खुला है, वो खुदा का बंदा हो ही नहीं सकता! ज्याचं सर्व चिंतन, मनन, विचार, कल्पना या ‘मी’ केंद्रस्थानी असलेल्या जगाशीच जखडून आहेत, तो भगवंताची भक्ती करूच शकणार नाही.. स्वत:ला त्याच्याशी जोडूच शकणार नाही. ज्याच्यावर अशाश्वताचाच प्रभाव आहे, तो शाश्वतात स्थिरावू शकत नाही. जो संकुचित परिघात अडकून आहे, तो व्यापक होऊच शकत नाही. त्यामुळेच ज्याला इतकं चालूनही काहीच लाभ झाला नाही, असं वाटतं त्याला या मार्गानं पुढे जाऊन तरी काही लाभ आहे का, हे वाटल्याशिवाय राहात नाही. त्याचीच अवस्था दोलायमान असते. परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी, नोकरी मिळवून देण्यासाठी, लग्न जुळवून देण्यासाठी, पगारवाढ किंवा बढती मिळवून देण्यासाठी भगवंत नाही! हे सारं होवो की न होवो, कोणत्याही परिस्थितीत माणसाचा आत्मनिश्र्च्य टिकवण्यासाठी भगवंत आहे. हे न उमजणं हाच अभागीपणा आणि शुद्ध भावाचा अभाव! त्या अभागी माणसाची गत कशी होते? तर, ‘अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे.’ त्याच्या अंतरंगातील शुद्ध भावाच्या अभावानं काय होतं? तर, ‘अभावें कदा पुण्य गांठीं पडेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना।।’ या अभावामुळे, ज्याची खरं तर गणनाच करता येत नाही, असं पुण्य प्राप्त होत नाही आणि ‘मी’पणामुळे जी ‘जुनी ठेव’ आहे, जे आत्मसुख आहे, ते आकळत नाही. ते आत्मसुख म्हणजे काय आणि ते अंतरंगातच कसं गवसतं, हे कळतच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotion to god
First published on: 07-11-2017 at 01:01 IST