News Flash

२६१. चिंतासक्त

जर मनात काही कामना उरलीच असेल, तर ती अधिकाधिक नामच घेण्याची राहू दे.

जर मनात काही कामना उरलीच असेल, तर ती अधिकाधिक नामच घेण्याची राहू दे. नाहीतर ज्या अध्यात्मानं आपल्याला आनंद मिळाल्याचं वाटतं, तो इतरांमध्ये वाटण्याची उबळ येईल आणि परहित साधण्याच्या धडपडीत स्वत:चं अहित होत आहे, हे लोकस्तुतीच्या आवडीमुळे उमगणार नाही. तेव्हा समर्थही म्हणतात की जर कामनाच असेल तर ती रामाची असू द्या.. कारण हीच कामना समस्त कामनांचा निरास करील.. ‘करी काम नि:काम या राघवाचें!” आद्य शंकराचार्यही म्हणतात, ‘‘ सत्सङ्गत्वे नि:सङ्गत्वम। नि:सङ्गत्वे निश्चलचित्तम। निश्चल चित्ते जीवन्मुक्ति:!’’ राघवाच्या, सदगुरूंच्या खऱ्या संगानं खरी निष्कामता येईल, निस्संगता येईल. त्यानंच चित्त निश्चल होईल.. आणि कोणत्याही परिस्थितीत चित्त निश्चल राहणं, याशिवाय जीवनमुक्ति दुसरी कोणती? जगत असतानाचा मुक्तीचा अनुभव कुठला? खरं मुक्त जगणं दुसरं कुठलं? अशी मुक्ती कुणाला हवी आहे? ज्याला ती हवी आहे त्यानं सदगुरूंचाच आधार घेतला पाहिजे. तो घेताना दृढ विश्वास हवा. जो सदगुरूंच्या सहवासात आहे, पण तरीही देहबुद्धीमुळे ज्याला त्यांचा आधार खऱ्या अर्थानं घेता येत नाही त्याला समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ७८व्या श्लोकात फटकारत आहेत आणि सावध करीत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वाळू. हा श्लोक असा आहे :

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।

तया पामरा बाधिजे सर्व कांहीं।

महाराज तो स्वामि कैवल्यदाता।

वृथा वाहणें देहसंसारचिंता।। ७८ ।।

प्रचलित अर्थ : अहो! ज्या मनुष्याचा रामावर विश्वास नाही त्या पामराला त्याच्या देहबुद्धीमुळे संसाराची सर्व पीडा सोसावी लागते. प्रभु राम कैवल्यदाता असताना, मोक्षाएवढा परमपूर्ण लाभ देण्यास समर्थ असताना त्याच्यावर विश्वास न ठेवता जीव देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहतो, याला काय म्हणावे?

आता मननार्थाकडे वळू. ज्याचा सद्गुरूंवर विश्वास नाही त्याला संसाराच्या सर्व पीडांना सामोरं जावं लागतं, हे वाक्य प्राथमिक पातळीवर आपल्याला खटकल्यावाचून राहत नाही. ‘मला संसाराची चिंता नको असेल, तर सद्गुरूंवर विश्वास ठेवला पाहिजे,’ ही मानसिक गुलामगिरीच नाही का, असाही प्रश्न कुणाकुणाच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. आणि असा कुणावर नुसता विश्वास ठेवला, एवढय़ानं संसाराच्या चिंता संपतात काय, असंही कुणी विचारेल. काहीजण तर अमक्या देवाचं आम्ही काय काय आणि किती किती केलं, याची यादीही ऐकवतील आणि काही उपयोग झाला नाही.. चिंता कमी झाल्या नाहीत, हे सांगतील! मग राम हा मोक्ष देऊ शकत असताना देहाची आणि संसाराची चिंता वाहणं व्यर्थ आहे, हे ऐकून तर काहीजण म्हणतील, ‘अहो, आधी देहच दु:ख भोगत असताना मोक्षाचं स्वप्नरंजन काय कामाचं? कारण दु:ख अगदी खरेपणानं जाणवत आहे. त्याचे चटके बसत आहेत. मोक्ष, मुक्ती या कल्पनांच्या मलमपट्टय़ांनी ती पीडा काय विसरता येणार आहे? दु:ख खरं आहे, मोक्ष ही कल्पनाच आहे!’

या एका श्लोकाच्या फटक्यानं या सर्व प्रश्नाचं मोहोळ क्षणार्धात उसळतं. याचं कारण सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हेच आपल्याला नेमकेपणानं माहित नसतं. तुमच्या सर्व चिंता तो राघव, तो सद्गुरू दूर करील, अशी कोणतीही हमी या श्लोकात समर्थानी कुठेही दिलेली नाही! या श्लोकातला ‘बाधिजे’ हा शब्द आपणच नीट वाचत नाही, त्यामुळे ही गफलत होते!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:56 am

Web Title: samarth ramdas philosophy 161
Next Stories
1 २६०. निष्काम
2 २५९. छंद
3 २५८. कर्ता : २
Just Now!
X