श्रीसमर्थ रामदास स्वामी विरचित ‘मनोबोधा’च्या ९४व्या श्लोकात श्रीशिवपार्वती हे विश्वाचं आदिबीजही कसं नाममय आहे, हे सांगितलं. आता ९५व्या श्लोकात विषयवासनेत अडकलेल्या जीवांचाही नामानं कसा उद्धार झाला, हे सांगत आहेत. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण आणि एक गणिका यांचे दोन दाखले या श्लोकात आहेत.

थोडक्यात ज्ञान, विद्वत्ता आणि संस्कारांची परंपरा लाभलेला एक जीव आणि देहविक्रय हाच उपजीविकेचा आधार असलेला एक जीव, यांचे हे दाखले आहेत. टोकाची पाश्र्वभूमी असूनही पतित असलेल्या जीवांचा नामानं कसा उद्धार होतो, हे या उदाहरणांवरून समर्थ सांगत आहेत. ‘उद्धार’ शब्दातील ‘उद’ म्हणजे वर, उच्च, श्रेष्ठ.. अर्थात उच्च अशा धाराप्रवाहात नाम हे जीवाला कसं स्थिर करतं, हे यात सांगितलं आहे. हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
video does not show female actress kangana ranauts bjp worker being groped by party members
भाजपाच्या रॅलीत अभिनेत्री कंगना रनौतशी असभ्य वर्तन? व्हायरल होणारा Video नेमका कुठला? वाचा सत्य
novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू

अजामेळ पापी वदें पुत्रकामें।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे।

शुकाकारणें कुंटणी रामवाणी।

मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं।। ९५ ।।

प्रचलित अर्थ : अजामिळ नावाचा मूळचा सदाचारी, पण विषयांध झाल्याने पापाचारी बनलेला ब्राह्मण हा एका दासीत आसक्त झाला. तिला याच्यापासून दहा पुत्र झाले. त्यातील नारायण या सर्वात लहान मुलावर त्याचं जिवापाड प्रेम होतं. मृत्यूसमयी त्या पुत्राचा आर्त नामोच्चार घडल्याने अजामिळ पापमुक्त होऊन उत्तम गतीला गेला. तसेच एका गणिकेनं पिंजरातल्या पोपटाचं नाव ‘राम’ ठेवलं होतं. ती सतत त्याचा नामोच्चार करीत असल्यानं तीदेखील उद्धरून गेल्याची पुराणातली कथा प्रसिद्ध आहे.

आता मननार्थाकडे वळू. अजामिळाची कथा बहुतेकांना एवढीच माहीत आहे की, त्याने मृत्यूसमयी नारायण अशा हाका आपल्या मुलाला मारल्या आणि तेवढय़ानं तो मुक्त झाला! आता ही कथा अनेकांना हास्यास्पद वाटते आणि अनेक तत्त्वचिंतकही ही कथा केवळ नामाचं माहात्म्य मांडण्यापुरती पाहावी, तिला अतिशयोक्त महत्त्व देऊ नये, असंच मत व्यक्त करतात. याचं कारण या कथेचं ‘श्रीमद्भगवता’त जे विवरण केलं आहे त्याचा सूक्ष्म तत्त्वार्थ जाणून घेत नाहीत. काही जण तर मुलाला अजामिळानं ‘नारायण’ हे नाव ठेवलं, त्या अर्थी त्याच्यातले संस्कार जागे होते, असंही मानतात. आता मुलांना देवतांची नावं ठेवण्याची सहज प्रथा अगदी पन्नास-साठ वर्षांपूर्वीही होतीच की. त्यामुळे मुलाचं नाव ‘नारायण’ ठेवण्यामागे आपल्याला विष्णूचं सतत स्मरण राहावं, असा काही उदात्त विचार अजामिळाचा होता, असं मानता येत नाही. तेव्हा या कथेच्या माध्यमातून जी तत्त्वचर्चा ‘श्रीमद्भगवता’ने केली आहे तिचाही मागोवा आपण घेणार आहोत, कारण या कथेमागचं तत्त्व लक्षात घेतलं नाही तर या कथेचं खरं तात्पर्य लक्षात येणार नाही. या कथेच्या निमित्तानं फार महत्त्वाचे प्रश्न ‘श्रीमद्भगवता’ने उपस्थित केले आहेत. हे सर्व प्रश्न पापाशी संबंधित आहेत! माणूस पाप का करतो, तो पापकर्म टाळू शकतो का, पापाचं प्रायश्चित्त नेमकं कोणतं, ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर पाप खरंच नष्ट होतं का, जर तसं असलं तरी प्रायश्चित्त घेतल्यावरही माणूस पुन्हा पापकर्माकडे वळत नाही का, मग तो जर वारंवार पापकर्मच करीत असेल तर कायमचं प्रायश्चित्त कसं शक्य आहे, नुसत्या नामानं पापं नष्ट होतात का, ते नाम भगवंताचं म्हणून न घेता मुलाचं वा पाळीव प्राण्याचं म्हणून घेतलं गेलं तरी पाप नष्ट होणं कसं शक्य आहे? अजामिळाच्या कथेच्या निमित्तानं झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेकडे आपण आता वळणार आहोत.