12 December 2017

News Flash

उपमन्यु-वास्तव

 अश्वत्थात्म्याला त्याची माता व द्रोणाचार्य मुनींची पत्नी कृपी ही दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून

चैतन्य प्रेम | Updated: August 1, 2017 4:00 AM

आपल्या मूळ विषयाला सुरुवात करण्याआधी उपमन्युच्या कथेच्या सत्यतेविषयी एका वाचकाने घेतलेल्या शंकेचं निराकरण करू. वाचकांच्या शंकांवर वा प्रतिक्रियेवर मी सहसा प्रतिसाद देत नाही. याचं कारण मूळ विषयाच्या विवेचनाच्या प्रवाहात खंड पाडू द्यायचा नसतो आणि काही शंकांची उत्तरं विवेचनाच्या ओघात पुढे येतच असतात. पण या मुद्दय़ावर स्पष्टीकरण केलं नाही तर प्रतिपादनाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित होत असल्यानं ते केवळ अपवाद म्हणून करीत आहे. तसंच त्यामुळे आजच्या भागाला अनुक्रमांक टाकलेला नाही, याची नियमित वाचकांनी नोंद घ्यावी.

अश्वत्थात्म्याला त्याची माता व द्रोणाचार्य मुनींची पत्नी कृपी ही दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून देत असे, हे तर सर्वपरिचित आहे. पण त्या दुधासाठी द्रोणाचार्य मुनींनी तप केले नाही. ज्यांच्याकडे गायी होत्या अशांना व नंतर राजा द्रुपदाला त्यांनी विनवून पाहिले. उपहास झाल्याने द्रुपदाला धडा शिकविण्यासाठी ते कौरव व पांडवांचे शस्त्रविद्यागुरू झाले. आता मूळ शंकेबद्दल. उपमन्यु हा व्याघ्रपाद ऋषींचा पुत्र असल्याचा उल्लेख काही पुराणकथांमध्ये आहे. उपमन्युच्या रूपानं व्याघ्रपाद ऋषींना भक्तीचाच लाभ झाल्याचाही गौरव काही पुराणकथांत आहे. शिवमहापुराणात मात्र तो उग्रदन्त ऋषींचा पुत्र म्हणून वर्णिला आहे. त्यात ही कथा समग्र आहे. त्यानुसार पाण्यात पीठ मिसळून दूध म्हणून त्याची आई त्याला ते देई आणि एकदा खऱ्या दुधाची चव चाखल्यावर त्यानं मातेकडे खऱ्या दुधासाठी आग्रह धरला. तेव्हा शिवाची भक्ती न केल्यानं आपण या दारिद्रय़ात पडल्याचं तिनं सांगितलं. तेव्हा हिमालयात जाऊन उपमन्यु तप करू लागला. अनेक वर्षांच्या त्याच्या उग्र तपानं प्रसन्न होऊन शिवानं क्षीरसमुद्रच त्याला देऊ  केला. मात्र आता भौतिकातलं काहीही नको, तुम्हीच आजन्म माझ्यासोबत राहा, अशी प्रार्थना उपमन्युनं केली. त्यावर क्षीरलिंगेश्वर या रूपात शिव त्याला प्राप्त झाल्याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीही दहाव्या अध्यायात म्हटलं आहे की, ‘मागां दूध दे म्हणतलियासाठीं। आघविया क्षीराब्धीची करुनि वाटी। उपमन्यूपुढें धूर्जटी। ठेविली जैसी।।’ (ओवी १७) म्हणजे दुधासाठी तप करणाऱ्या उपमन्यूला शिवानं दुग्धसागराचीच वाटी जशी दिली तसा गीतेचा सागर माझ्या सदगुरूंनी मला दिला आहे, असा उल्लेख आहे. समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी ‘मनोबोध’ या ग्रंथात उपमन्युची जी कथा दिली आहे तीच मी आधारभूत मानत नमूद केली असून त्यात तो धौम्य ऋषींचा वडील बंधू असल्याचा उल्लेख आहे. ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात आहे, असा संदर्भ पांगारकर यांनी दिला आहे. पू. बाबा बेलसरे यांनीही हीच कथा ‘सार्थ मनाचे श्लोक’ या ग्रंथात प्रमाण मानली आहे. असो तर आता मूळ विवेचनाकडे वळू. राजा अंबरीश आणि अजामिळ ही दोन वयानं मोठी माणसं आणि उपमन्यु व ध्रुव ही लहान मुलं; यांचा देवानं कसा सांभाळ केला हे समर्थानी सांगितलं. या कथांमागील रूपकांचाही आपण विचार केला. आता कथा आहे ती हत्तींचा राजा गजेंद्राची! या पाच उदाहरणांमध्ये हा एकच पशु आहे आणि त्याची कथा हे एक विराट रूपकच आहे. गजराज गजेंद्र हा आधीच्या जन्मात राजा इंद्रद्युम्न म्हणून विख्यात होता. तो मोठा विरक्त होता. परमात्मप्राप्ती हेच जीवनाचं मूळ ध्येय, या विचारानं सदोदित तपाचरणात निमग्न असे. तो स्वत:ला राजा मानत नसे तर हे राज्य भगवान विष्णूचंच आहे, या भावनेनं राहत असे. त्याची प्रजा अत्यंत सुखी होती. राजा मलयगिरी पर्वतावर तप करीत असतानाच अगस्त्य मुनी तिथे आले, पण राजा ध्यानमग्न असल्याचे त्यांना दिसले. मूळ कथा सांगते की, आपला अवमान झाल्याचं मानून मुनींनी राजाला शाप दिला. प्रत्यक्षात तो शाप नव्हे, वरच कसा होता, हे आता पाहू.

 

First Published on August 1, 2017 4:00 am

Web Title: samarth ramdas philosophy 272