गौतम बुद्धांचा अवतार हा विष्णूचा नववा अवतार मानायला काही तत्त्वचिंतक तयार नाहीत. याचं एकमेव कारण हे की, गौतम बुद्धांनी वेदच नाकारले होते, आत्मा-परमात्माही नाकारला होता!  हे नाकारण्यातच तर गौतम बुद्धांच्या अवताराचं मोठं रहस्य दडलं आहे! आजचं जे विवरण आहे ते काहीसं विषयांतर करणारं वाटेल, पण तरी ते जाणून घेणं आवश्यक आहे. गौतम बुद्ध अवतरित झाले तेव्हा धर्माची स्थिती काय होती? तर धर्माचा स्तर जगण्यात खालावला होता. वेद आणि उपनिषदांमध्येही प्रक्षिप्त भाग बराच घुसडला गेला होता. त्या सर्वाचं शुद्धीकरण अनिवार्य होतं, पण हे कार्य करायला जो आवाका लागतो आणि सर्वमान्यता लागते ती कुणाकडेही नव्हती. ज्याच्याकडे आवाका होता त्याला धर्ममरतड, राजसत्ता आणि लोकांचं पाठबळ नव्हतं. ज्याच्याकडे हे सारं असू शकत होतं त्याच्याकडे आवाका नव्हता! माणुसकी लयाला जात असतानाच्या या काळात गौतम बुद्ध आले आणि त्यांनी पहिला घाव या सनातन धर्माच्या मुख्य आधारस्तंभावरच घातला तो म्हणजे वेद! ईश्वर नाही, आत्मा-परमात्मा नाही, या त्यांच्या पवित्र्यानं मोठी खळबळ उडाली. कितीही झालं तरी गौतम बुद्ध हे राजघराण्यातले होते आणि त्यामुळे त्यांचा थेट सामना कसा करावा, हे धर्मधुरिणांना उमगत नव्हतं. त्याच वेळी करुणा, दया, प्रेम, अहिंसा या सनातन धर्मातही एकेकाळी असलेल्या पण प्रत्यक्ष जगण्यातून हद्दपार झालेल्या भावनांची नव्यानं मांडणी करीत बुद्धांनी हिरिरीनं प्रचारित केलं. तब्बल हजार वर्षे सनातन धर्मासमोर बुद्ध तत्त्वज्ञानाचं हे आव्हान कायम होतं. त्यानंतर आद्य शंकराचार्य अवतरले आणि त्यांनी अद्वैत वेदान्त मांडून बुद्ध मताचा प्रतिवाद सुरू केला. आदी शंकराचार्य यांच्याकडे कठोर वैराग्य, तपोबल, आवाका आणि लोकांना भिडणारी मांडणी हे सारं काही होतं. आणि त्यामुळेच बुद्ध धर्माचा प्रतिवाद सुरू झाला. आपलं मत मांडण्यात कमी पडत असलेल्या सनातन्यांना शंकराचार्याच्या रूपात मोठा आधार गवसला आणि त्या जोरावर शंकराचार्यानी प्रथम काय केलं असेल तर ते म्हणजे वेदांसकट सर्वच धर्मग्रंथांची शुद्धी सुरू केली. जो घुसडलेला भाग होता तो काढून टाकला. भगवान गौतम बुद्ध यांनी सनातन धर्माच्या जीर्ण झालेल्या ज्या इमारतीवर घाव घालून तिचे खांब हादरवले होते त्या इमारतीचीच ही पुनर्बाधणी होती. जर बुद्ध येऊन गेले नसते तर शंकराचार्याना हे काम करताच आलं नसतं आणि हीच भगवान गौतम बुद्ध या अवताराची सनातन धर्मावर कृपा आहे. त्या बुद्ध अनुयायांची निष्ठाही इतकी कठोर की त्यांनी शंकराचार्य यांच्याशी प्राणाची बाजी लावत तत्त्वार्थ केला. प्राणांची बाजी अशासाठी म्हणायचं कारण उभय बाजूंनी असं ठरलं होतं की तत्त्वार्थात जो पराभूत होईल त्यानं एकतर जिंकलेल्या पक्षाचं मत स्वीकारायचं आणि आपल्या धर्माचा त्याग करायचा किंवा अग्निकुंडात उडी घ्यायची! वादात हरल्यावर बौद्ध पंडितांनी सनातन धर्माऐवजी अग्निप्रवेश स्वीकारला! तर अशा प्रकारे सनातन धर्मात तत्त्वशुद्धीला वाव देण्यासाठी कलियुगात गौतम बुद्ध या रूपात विष्णूनं अवतार घेतला होता, हे जाणवतं. आता यामागे काही पूर्वनियोजन होतं का? बुद्धांनंतर शंकराचार्य यांचं येणं पूर्वनियोजित होतं का? ‘मिलिंद पन्ह’ (मिलिंद प्रश्न) नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यात बुद्धांबरोबर वावरलेल्या एका भिक्खूशी राजा मिलिंद यांनी साधलेला संवाद ग्रथित आहे. त्यात राजानं एक प्रश्न केला आहे की, ‘‘माझा धर्म पाचशे वर्षे अग्रेसर राहील, असं विधान बुद्धांनी केलं होतं का?’’ त्यावर भिक्खू म्हणतो, ‘‘पाचशे नव्हे हजार वर्षे राहील, असं ते म्हणत!’’ आणि योग असा की, बुद्धांनंतर  शंकराचार्य हजार वर्षांनी अवतरले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशातील बुद्ध धर्माला नवसंजीवनी मिळाली आहे, हे वास्तव आहे!