21 November 2017

News Flash

४२६. ज्ञान-ग्रहण

श्रीसद्गुरू बोधात तल्लीनता कधी येईल?

चैतन्य प्रेम | Updated: September 7, 2017 3:35 AM

श्रीसद्गुरू बोधात तल्लीनता कधी येईल? जेव्हा त्यांचा विचार आणि माझा विचार, त्यांचं ध्येय आणि माझं ध्येय, त्यांची भावना आणि माझी भावना, त्यांची इच्छा आणि माझी इच्छा एक होईल. आज यात तफावत आहे. आज ते परमात्म विचारात एकरूप आहेत, तर भौतिक विचाराच्या रिंगणात माझं मन भिरभिरत आहे. माझं आत्मकल्याण, हेच त्यांचं ध्येय आहे, तर भौतिकाच्या कल्याणातच माझं मन अडकून आहे. ते परमात्म भावनेत स्थिर आहेत, तर मी संकुचित अशा ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या भावनेत रुतून अस्थिर आहे. माझं परमहित साधावं, हीच त्यांची इच्छा आहे, तर जे अखेर अहितकारीच होणार आहे, त्याचीच प्राप्ती व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जसजशी ही तफावत दूर होईल तसतशी विचार, ध्येय, भावना आणि इच्छा या बाबतीत त्यांच्या-माझ्यात एकवाक्यता निर्माण होईल. तेव्हाच त्यांचा बोध मी कानांनी आधी नीट ग्रहण करू लागेन.

जेव्हा तो मनानंही ग्रहण होऊ  लागेल तेव्हाच त्या बोधात तल्लीनता येईल. ‘कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला,’ ही ती स्थिती आहे. त्या तल्लीनतेत कधी त्या वेळापुरतं का होईना प्रापंचिक दु:खाचं विस्मरण होईल, कधी देहदु:खाचं विस्मरण होईल, कधी मानसिक दु:खाचा प्रभाव विसरला जाईल. आणि काही क्षणापुरतं का होईना, दु:खाच्या स्मरणातून सुटणं म्हणजे ओझ्यातून सुटकाच आहे. दु:खं प्रापंचिक असो की देहाचं असो; त्याचं मानसिक दु:खात होणारं रूपांतर हे मोठंच असतं. त्यामुळे बोधाशी मन काही क्षण जरी एकरूप झालं तरी जी तल्लीनता येते तिचं सुख वर्णनातीत असतं.

पूर्वी बोध ऐकताना अविश्वासाच्या जाणिवेची माशी कानांशी भुणभुणत असे. ती हाकलत हाकलत ऐकला जाणारा बोध अव्यवहार्यही वाटत असे. आता  बोध ऐकताना अविश्वासाची भावना लोपली असली आणि तो बोध अव्यवहार्यही वाटत नसला, तरी तो व्यवहारात उतरत नसल्याची खंत वाटत असते. जगताना त्या बोधाचं स्मरण सुटलं की आपण बोलू नये ते बोलतो आणि वागू नये तसं वागतो, ही जाणीवही होत असते. साधना पथावरची ही घुसळण, हा आंतरिक संघर्ष फार आवश्यक असतो. ताक घुसळल्याशिवाय लोणी हाती येत नाही. आणि एकदा लोणी हाती आलं की घुसळणं थांबलं! लोणी म्हणजे सगळ्या बोधाचं सार! वेद अनंत बोलिला.. ज्ञान तर अनंत आहे. मला दिवा लावायचा आहे, तर दिव्याचं बटण कुठलं आहे, हे कळणं एवढंच ज्ञान पुरेसं आहे.

मुळात विजेचा शोध कधी लागला, कसा लागला, कुणी लावला, वीजनिर्मिती कशी होते, ती वीज घराघरांत कशी प्रवाहित केली जाते; हे सगळं जाणून मग दिव्याचं बटण सुरू करणं म्हणजे अंधारातच जास्त काळ राहाणं नाही का? ते सगळं ज्ञान खरंच आहे आणि आपल्या घरापर्यंत आलेली वीजही त्याच ज्ञानाच्या आधाराशिवाय आलेली नाही, हेही खरंच, पण आता हाती दिव्याचं बटण आलं असताना ते कसं सुरू करावं, एवढंच ज्ञान पुरेसं आहे ना? अगदी त्याचप्रमाणे ज्ञान अनंत आहे, पण ते ज्याच्या मुखातून प्रकट होत आहे, ज्याच्या कृतीतून स्पष्ट होत आहे त्याचा आधार घेतला पाहिजे आणि तो सांगत आहे त्याप्रमाणे जगण्याचा अभ्यास केला पाहिजे, एवढंच ज्ञान सर्वार्थानं खरं लाभदायक नाही का?

माउलीही म्हणतात, ‘‘मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया वेर्थ कथा सांडी मार्गु!’’ ताक मंथुन लोण्याचा गोळा हाती यावा तसा अनंत वेदांचं अर्थात ज्ञानाचं सारतत्त्व असा सद्गुरू हाती लागला आहे! तर त्याच्या सांगण्याव्यतिरिक्त जे जे श्रवणमार्गानं ऐकू आलं आहे ते ते सांडून टाक! हे साधलं तरच तो जे सांगत आहे ते समजू लागेल आणि आवडू लागेल.

 

First Published on September 7, 2017 3:35 am

Web Title: samarth ramdas philosophy 294