21 November 2017

News Flash

४२९. उडणं-बुडणं : २

अंतरंगातील मनोवासना आणि देहाशी जखडण्याची भावना कायम राहते.

चैतन्य प्रेम | Updated: September 12, 2017 2:26 AM

पक्षी आकाशात कशा मुक्त भराऱ्या मारतात. त्यांना पाहून माणसाला पूर्वापार वाटायचं की आपल्यालाही आकाशात उडता यावं. कितीही का वाटेना, माणसाचा देह काही उडू शकत नाही.. पण ‘आपण उडावं,’ ही इच्छा ज्या मनात उद्भवली त्या मनानं मात्र ही कसर भरून काढली. हे मन दशदिशांना उडतं. अनंत इच्छा, अनंत कल्पना, अनंत विचार आणि अनंत वासना आपल्या पंखात भरून हे मन उडत असतं. हे मन व्यापक असलं तर हे ‘उडणं’ सार्थकी तरी लागतं. अशांच्या इच्छा या सत्यसंकल्पस्वरूप असतात. त्यांच्यामुळे समूहालाही जीवनध्येय मिळतं.. जगण्याची दिशा गवसते. अशा व्यापक मनातल्या कल्पनांमुळे आणि विचारांमुळे तरल काव्य, आशयघन साहित्य लाभतं. कलांचा विकास होतो. वैचारिक उन्नयनाला चालना मिळते. व्यापक मनातील वासना या सद्वासनाच असतात आणि त्यातून समूहहिताची करय उभी राहतात.

संकुचित मनाच्या इच्छा, कल्पना, विचार आणि वासना या मात्र केवळ ‘मी’ आणि ‘माझे’पणाला जखडल्या असतात आणि त्या स्वार्थ, भ्रम आणि मोहच जोपासत असतात.. पण या संकुचित आणि व्यापक मनापलीकडे प्रथम ‘नमन’ मग ‘सुमन’ आणि अखेरीस ‘अमन’ होणारं अध्यात्मलीन असं मनही असतं.. त्या परम भावतन्मय विराट मनाचे संस्कार अनंत पिढय़ांपर्यंत प्रवाहित होत राहतात. मग ते मन धारण केलेला देह कधी तुकारामांचा असेल.. ज्ञानेश्वरांचा असेल.. एकनाथांचा असेल.. येशूचा असेल.. आपणही देहच तर शेवटी पाहतो! आणि त्यातूनच जितक्या देहांची संख्यात्मक गर्दी ज्या धर्मात, ज्या पंथात जास्त तो धर्म वा तो पंथ श्रेष्ठ असं मानतो ना! असो. तरी ना आपला हा देह अनंत काळ टिकतो; ना आपलं मन टिकतं.. पण अंतरंगातील मनोवासना आणि देहाशी जखडण्याची भावना कायम राहते. अनंत अतृप्त वासनांचा हा गोळाच त्या अपूर्त इच्छांच्या पूर्तीसाठी जन्ममृत्यूच्या चक्रात आपल्याला गोवून टाकतो. ‘आत्मारामा’त समर्थ रामदास म्हणतात, ‘‘प्राणी देह सोडून जातीं। परी वासनात्मक शरिरें उरति। तेणें पुनरावृत्ती भोगिती। वासना उरलिया?’’ ( ब्रह्मनिरूपण- ओवी २५). शारदामाता म्हणत की, ‘बर्फीचा अर्धा तुकडा खायची इच्छा अपूर्ण राहिली तरी पुन्हा जन्म घेणं आहे!’ म्हणजे किती कठीण परिस्थिती आहे बघा.. ‘बर्फीचा अर्धा तुकडा’ हे परिमाण लावून एकदा आपल्या मनात डोकावून पाहिलं तर अनंत अतृप्त इच्छांचा कालाच आढळेल! हे चित्र पालटायचं तर देहाला जखडलेली भावना उडवावी लागेल आणि वासनाडोहात गटांगळ्या खात खोल बुडत असलेल्या मनाला ‘रामरूपा’त बुडवावं लागेल. देहभावना उडवायची म्हणजे काय? जसं शेताचं.. धान्याचं रक्षण करण्यासाठी पाखरं उडवावी लागतात ना? कबीरसाहेबांचा एक दोहा आहे.. ‘‘आछे दिन पाछे गये, गुरू से किया न हेत। अब पछतावा क्या करै, जब चिडिम्या चुग गयी खेत॥’’ जेव्हा देह धडधाकट होता तेव्हाच सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा अभ्यास केला नाही.. आता पश्चात्ताप करून काय उपयोग? इच्छारूपी, वासनारूपी अगणित चिमण्यांनी पूर्ण शेतच फस्त करून टाकलं आहे! अर्थात देहाच्या सर्व क्षमता, देहाची उमेद लयास गेली आहे. देहभावात जखडून मनोवासनांच्या पूर्तीसाठी या सर्व क्षमतांचा वापर झाला आहे.. देहाची नाहक फरपट झाली आहे. ती थोपविण्यासाठी, शेत फस्त करणारी पाखरं जशी उडवतात तशी संकुचित इच्छांच्या पूर्तीसाठी देहाला अडकवू पाहणारी आणि देहाला जखडू पाहणारी देहभावना उडवून लावली पाहिजे. ती कशानं, कशाच्या आधारावर उडवायची आहे? तर तो आधार आहे रामबोधाचा म्हणजेच सद्गुरू बोधाचा!

First Published on September 12, 2017 2:26 am

Web Title: samarth ramdas philosophy 297