आत्मज्ञान स्वबळावर मिळत नाहीच, पण ते ज्याच्यायोगे प्राप्त होऊ शकतं तो सद्गुरूही आपल्या बुद्धीच्या ताकदीवर मिळू शकत नाही. याचं कारण आपण आपल्या बुद्धीनं शोध घ्यायचा प्रयत्न करू तर आपल्या बौद्धिक लायकीच्याच गुरूपर्यंत पोहोचू! आपली बुद्धी कुंठित आहे, ती सत, रज किंवा तमोगुणप्रधान आहे, ती संकुचित – स्वार्थप्रेरित आहे. तेव्हा समर्थही म्हणतात की, ‘‘बळें आकळेना मिळेना मिळेना।।’’  आपल्या बौद्धिक बळानं सद्गुरू किंवा खरं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मग हा सद्गुरू प्राप्त कसा होतो? तर, माउली म्हणतात ना? ‘भावबळे आकळे येऱ्हवी ना कळे’ जो सद्गुरू आहे तो केवळ भावबळानंच उमजतो.. पण ज्याच्यायोगे खरं हित साधणार आहे, जगण्यातला संकुचितपणा संपणार आहे, भूतकाळातल्या वेदनांनी कुढणं आणि भविष्याविषयीच्या चिंतेनं पोखरणं थांबणार आहे, निर्भयतेनं कर्तव्यरत राहून कसं जगावं, हे शिकता येणार आहे तो सद्गुरू प्राप्त करून घेण्याची हिताची गोष्ट माणसाला उमजत नाही. जे अहिताचं आहे त्यालाच हिताच मानून आणि कवटाळून तो जगू पाहतो, हे वास्तव आता ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४३व्या श्लोकात समर्थ मांडणार आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. हा श्लोक असा आहे :

अविद्यागुणें मानवा ऊमजेना।

भ्रमें चूकलें हीत ते आकळेना।

परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणे।। १४३।।

प्रचलित अर्थ : खऱ्याखोटय़ाची जाण नसल्याने अडाणी मनुष्याने खोटे नाणेच कडोसरीला बांधावे, त्याप्रमाणे अविद्येने म्हणजे विषयाकार कल्पनेने मन बद्ध असल्याने माणसाला स्वहित उमगत नाही. देहबुद्धीच्या अहंतेने तो स्वहिताला मुकला आहे आणि देहबुद्धीलाच कल्याणकारी आत्मबुद्धी मानत आहे.

आता मननार्थाकडे वळू. १४०व्या श्लोकाच्या विश्लेषणादरम्यान आपण पाहिलं की माणूस हा त्रिगुणांपैकी एका गुणाच्या प्रभावाखाली आहे आणि अन्य दोन गुणांची त्याच्यात सरमिसळ आहे. अर्थात एखादा सत्त्वगुणप्रधान असतो, पण त्या सत्त्वगुणाच्या जोडीनं त्याच्यात रजोगुण आणि तमोगुणही अधेमधे प्रकट होतात. एखादा रजोगुणप्रधान असतो, पण त्याच्यात सत्त्वगुण आणि तमोगुणही कमी प्रमाणात का होईना, असतातच. एखादा तमोगुणप्रधान असतो, पण त्याच्या स्वभावातही सत्त्वगुण आणि रजोगुणाचं मिश्रण असतं. आता या श्लोकात मात्र समर्थ चौथाच गुण सांगतात आणि तो आहे ‘अविद्यागुण’! म्हणजेच सत्त्वगुण आहे खरा, पण तो अविद्येनं माखला आहे. त्याचप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण या दोन्ही गुणांचं प्राबल्य असलं तरी ते गुण अविद्येनं माखले आहेत. सत्वगुण अविद्येनं माखला आहे म्हणजे काय? तर आपल्या मिथ्या कल्पनेनुसार माणसाला दुसऱ्याबद्दल अनुकंपा निर्माण होते आणि गरज नसताना तो त्याच्यासाठी खस्ता खात राहातो. त्यात वेळ, श्रम आणि पैसाही वाया जातो. रजोगुण अविद्येनं माखला आहे म्हणजे गरज नाही त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी शक्ती खर्च होते आणि तमोगुण अविद्येनं माखणं म्हणजे स्वत:विषयी अत्यंत टोकाच्या अहंभावयुक्त कल्पना उत्पन्न होतात आणि त्या अहंकारातून दुसऱ्याचं टोकाचं अनहितही केलं जाऊ शकतं. तेव्हा अविद्येपायी माणसाला काही उमजत नाही आणि भ्रमात रूतल्यामुळे आपलं खरं हित कशात आहे, हेसुद्धा समजेनासं होतं. मग ज्याला तो ज्ञान समजतो, त्या आकलनानुसारच तो वर्तन करू पाहतो. त्या संकुचित देहबुद्धीच्या आकलनानुसार जो त्याला गुरू म्हणून योग्य वाटतो त्यालाच तो गुरू मानतो, त्याचंच तो ऐकू लागतो आणि त्याचंच अनुकरण करू पाहतो.