आपल्याला रुचेल ते सांगणाराच आपल्याला अधिक भावतो. आपण चिखलात रुतून असतो आणि चिखलात रूतून राहाणं सवयीनं आपल्याला आवडत असतं.  म्हणूनच चिखलात रुतून राहणं हीच मनुष्य जन्माची खरी इतिकर्तव्यता आहे, हे सांगणारा आपल्याला आवडतो.  तो जे सांगतो तेच खरं ज्ञान मानून आपण ते कवटाळतो. जसं नाणं खरं की खोटं, हे उमगलं नसताना ते कडोसरीला बांधून रहावं, तसं. पण जेव्हा खरा प्रसंग उद्भवतो तेव्हा आपण आजवर जे जे मानलं ते खरं होतं की खोटं, याची परीक्षा होतेच. कोणत्याही कारणानं का असेना, आपण या मार्गावर आलो असू तर जीवनात खरं नेमकं आहे तरी काय, कशाला नेमका अर्थ आहे, हे शोधण्याच्या इच्छेची ठिणगी एक ना एक दिवस, कोणत्या ना कोणत्या क्षणी उत्पन्न होतेच. कधी कधी ती पुन्हा मायाभ्रमाच्या मातीखाली दबून जाते, तर कधी मात्र अचानक फुलू लागते आणि पाहाता पाहाता अंतरंगातल्या भ्रममोहाला जाळून टाकू लागते.. पण त्यासाठी या जगात नेमकं खरं काही आहे का, काय आहे आणि तिथपर्यंत कसं पोहोचावं, हा विचार तरी मनात चमकला पाहिजे. जेव्हा हा विचार येतो तेव्हा त्या उत्तराच्या शोधासाठी मनाची तगमग सुरू होते. अशा मनाला समर्थ जे काही सांगत आहेत ते ‘मनोबोधा’ च्या पुढील म्हणजे १४४व्या श्लोकात नमूद आहे. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

जगीं पाहतां साच तें काय आहे।

अतीआदरें सत्य शोधूनि पाहें।

पुढें पाहतां पाहतां देव जोडे।

भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ।। १४४।।

प्रचलित अर्थ : या जगात सत्य काय आहे ते अती आदरपूर्वक शोधीत पाहात जा. असेच पाहता पाहता असत्य अशा मायेचे टरफल आपोआप उडून जाईल आणि सत्य म्हणजे शाश्वत देव जोडेल. तो जोडताच भ्रम भ्रांती अज्ञानाचा सारा अंधार कोठल्या कोठे लोपून जाईल.

आता मननार्थाकडे वळू. या जगात सत्य म्हणून काही आहे का, हा प्रश्न मनात येतो तेव्हा समर्थ सांगतात की बाबा रे, अतिशय आदरानं हा प्रश्न मनात जपून ठेव. त्याची हेळसांड करू नकोस. तो प्रश्न विस्मरणात जाऊ देऊ नकोस. कारण मनात प्रश्न उद्भवला तरी तो मनानंच झिडकारला जाण्याची शक्यता असते.  जीवनात नेमकं सत्य आहे तरी काय, हा प्रश्न मनात आला तरी मनच सांगतं, सत्य काय ते आपल्याला कधी कळेल तरी का? आपली का ती कुवत आहे? तेव्हा समर्थ सांगतात, या प्रश्नाचा अत्यंत आदरानं स्वीकार करा आणि अत्यंत आदरानं उत्तराचाही शोध घ्या! कारण जोवर ‘कोऽहं’ म्हणजे ‘मी खरा कोण आहे,’ हा प्रश्न मन कुरतडत नाही, तोवर ‘सोऽहं’म्हणजे ‘मी तोच आहे,’ इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं पहिलं पाऊलही उचललं जात नाही. एखाद्याला वाटतं की भले मी सत्य काय आहे, ईश्वर आहे का, याचा शोध सुरू केला तरी मला का देवाचं दर्शन होणार आहे? त्यावर समर्थ सांगतात, माणसानं निराश न होता प्रत्येक पाऊल पुढेच पडेल, हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक पाऊल पुढे पडणं म्हणजे काय? तर आपली प्रत्येक कृती ही सत्याच्या दिशेने जाणारी असली पाहिजे. आधीच्या कृतीपेक्षा ती अधिक पक्व असली पाहिजे. सुरुवात भले नुसती देवाच्या तसबिरीला नमस्कार करण्यापासून झाली असेल, पण नुसता नमस्कार, नुसती पूजाअर्चा, नुसतं स्तोत्रपठणं, अशा  कोणत्याही गोष्टीच्या सवयीत अडकायचं नाही. नमस्कार कुणाला करीत आहे, पूजा कुणाची करीत आहे, स्तोत्र कुणासाठी म्हणत आहे, याचाही विचार करून मनानं अधिक पक्व झालं पाहिजे. म्हणजेच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे.