Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

संगतीचा फार सूक्ष्म प्रभाव असतो आणि विचित्र गोष्ट अशी की चांगल्याचा संग लाभला तरी चांगुलपणा अंगात भिनायला फार वेळ लागतो, पण वाईटाची संगत लाभताच अंतरंगातला वाईटपणा मात्र झपाटय़ानं वाढू लागतो! कारण आपण वाईटाच्या बाजूनंच असतो ना! पैशाचा संग माणसाला असा मोहात पाडणारा असतो. कारण पैशाच्या जोरावर हव्या त्या वस्तू घेता येतात आणि त्यायोगे ‘सुख’ मिळवता येतं, असा आपला अनुभव असतो. त्यामुळे प्रार्थनेच्या आधारापेक्षा पैशाचा आधार साधकालाही मोठा वाटत असतो. किंबहुना प्राथमिक टप्प्यावर भौतिकाचा स्तर अर्थात पैशाचा स्तर टिकावा हाच प्रार्थनेचा प्रधान हेतू असतो! भौतिक स्थितीत काही चढउतार झाले की साधकाचा जीव बेचैन होतो. मग साधनेतही लक्ष लागत नाही. आता इथं पैशाला कमी लेखण्याचा हेतू नाही. पैसा जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि साधकानं त्याच्या चरितार्थासाठी आणि सुखसोयीसाठी आवश्यक तेवढा पैसा स्वकष्टानं मिळवला आणि साठवलाही पाहिजे, यातही दुमत नाही. भौतिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि अगदी श्रीमंतीसाठीही प्रयत्न करण्यात काही गैर नाही. फक्त या पैशाचा आधार वाटण्याची सवय सुटत गेली पाहिजे. कारण पैसा आज आहे उद्या नसेलही, भौतिक आज उत्तम असेल उद्या घटेलही, थोडक्यात हे सारं बदलणारं अर्थात अस्थिर असल्यानं त्याच्या आधारानं मनाला खरी स्थिरता लाभणार नाही. त्याचबरोबर भौतिक विकास होत गेला की पैशाच्या जोरावर समाजात जो मान वाटय़ाला येतो त्यानंही अहंतेचं अस्तर मनाला कायमचं चिकटू शकतं. त्यामुळे पैशात, भौतिक विकासात काही वाईट नाही, मात्र त्यानं अहंतेनं मन झाकोळून जाऊ नये, ही काळजी साधकानं घेतली पाहिजे. कारण या अहंतेनं मती आणखी कुंठीत होते आणि ऐहिक भरभराटीत गैर ते काय, असा प्रश्न मनात उमटू लागतो. त्यामुळे शाश्वताच्या प्राप्तीसाठी धडपडणारं मन हळूहळू अशाश्वतातच गुंतू लागतं आणि अखेर तर हेच शाश्वत आहे, इथपर्यंत मन स्वत:ची समजूत घालू लागते! त्यामुळे साधकानं प्रारंभिक वाटचालीत साधकानं अतिशय सावधपणे स्वत:च्या मनोधारणेचं, मनोवृत्तीचं निरीक्षण परीक्षण करीत गेलं पाहिजे. आपल्या मनाला अशाश्वताची ओढ किती आहे, कुठे आहे, मन कशात गुंतत आहे, कशाचा प्रभाव मनावर पडत आहे, कशामागे मन वाहावत जात आहे, कशाचा आधार मनाला भासत आहे; या सगळ्या गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपल्या संगतीबद्दल सावध झालं पाहिजे. सद्गुरूबोध ग्रहण करण्यात ज्या संगतीचा आंतरिक अडथळा निर्माण होत असेल ती संगत मनानं सोडून दिली पाहिजे. म्हणजेच मनात त्या संगतीची आस उरता कामा नये. मनोबोधाच्या ४५व्या श्लोकाचा हाच रोख आहे. विपरीत अशी बाह्य़ संगत मनानं सुटणं जितकं महत्त्वाचं आहे तितकाच अंतरंगात कोणत्या विचाराचा संग सुरू आहे, याकडेही बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. मनोबोधाच्या ४६व्या श्लोकात समर्थ हीच गोष्ट सांगत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे:

मना जे घडीं राघवेंवीण गेली।

जनीं आपुली ते तुवां हानि केली।

रघूनायकावीण तो सीण आहे।

जनीं दक्ष तो लक्ष्य लाऊनि पाहे।। ४६।।

प्रचलित अर्थ : हे मना, रामचिंतनावाचून जी घटिका गेली ती तू व्यर्थ दवडून आपलीच हानी केली आहेस, हे लक्षात घे. रामावाचूनचं जगणं हाच शीण आहे. म्हणून जो सावध आहे त्याचं अखंड अनुसंधान रामचरणांकडेच असते आणि त्यायोगे तो अखंड सुख भोगत असतो.

आता या श्लोकाच्या मननार्थाकडे वळू.

चैतन्य प्रेम