काही महिन्यांनंतर तनुजाची परिस्थिती सुधारली. आणि तिचं रुटिनही पूर्ववत झालं. रिसर्च आणि अभ्यास तर होताच. आता तिने स्वत:ला पूर्णपणे कामात झोकून दिलं. डॉक्टरांची आठवण यायची. पण तिनं ते सगळं खूप पॉझिटिव्हली स्वीकारलं. ती कामात पार बुडून गेली…नवीन डिग्र्या, कोर्सेस, अभ्यास दौरे, देशीविदेशी कॉन्फरंसेस आणि प्रमोशन्स…पंधरा-सोळा वर्षं यातच अश्शीच उडून गेली. रिसर्च आणि आणखी रिसर्च.. हेच तनुजाने आपल्यापुढे ध्येय ठरवलं होतं. वडील-मावशीही गेल्यानंतर तर तिला कुठलाच बंध उरला नाही. तिची इन्स्टिट्यूट हेच दुसरं घर झालं होतं. अगदी नाईलाज असल्यासारखी ती रात्री झोपून सकाळी आवरून येण्यापुरती इन्स्टिट्यूट्नेच दिलेल्या क्वार्टरमधे जाई.
……………………
चैतन्यच्या प्रश्नांमुळे तनुजाच्या नजरेसमोरुन असा फ्लॅशबॅक तरळून गेला.
मग तिने नीटच पाहिलं त्याच्याकडे!
उंचापुरा, लख्ख गोरा, रीमलेस चष्म्याआडून दिसणाऱ्या मोठ्या-मोठ्या डोळ्यांचा, धारदार नाकाचा, पातळ जिवणी आणि दोन्ही गालांसकट हनुवटीवर खळ्या पाडत गोडच गोड हसणारा चैतन्य… देखणाच आहे की हा जीव… तनुजाला तिच्याही नकळत हसू आलं. हसू अशासाठी की त्याच्या लाघवी बोलण्याकडे किंवा आर्जवी सूराकडे जरी तिने दुर्लक्ष केलं असलं तरी तिच्या मेंदूने चैतन्यच्या अस्तित्त्वाची पुरेशी दखल घेतली होती….आणि हे मात्र तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. तिला स्वत:चंच फार आश्चर्य वाटलं. प्रेम-नातं-नवे बंध… हा अध्याय तिने बंद केला त्यालाही कितीतरी वर्षं उलटलीत.. मग आता काय हे. आणि कशावरून चैतन्य फ्लर्ट करत नसेल? त्याच्यासारखे कितीतरी ज्युनिअर्स आले आणि गेले… आपण ते हसून सोडूनच दिलं ना? मग आताच का काळीज अशी उडी घेतंय… की एकुटवाणेपणाचा कंटाळा आलाय आपल्याला? हे काय होतंय आपल्याला.. पुन्हा प्रेम??? नाही… एकदा आधीच्या अनुभवात पोळून निघालोय…आता या वयात कोण आपल्या प्रेमात पडणार?
छे छे… चैतन्य राजाध्यक्ष, तुम्ही सर्वार्थाने ज्युनिअर आहात…इथे रिसर्चसाठी आला आहात. ते काम पूर्ण करा आणि करिअर नेईल तिकडे जा… माझ्यामागे वेळ वाया घालवण्याचं आणि मला असा त्रास देण्याचं काही एक कारण नाहीये… तिनं मनातल्या मनात ही उजळणी केली.
इन्स्टिट्यूट्मधे गेल्यावर मात्र हे सगळं त्याला सुनवायची तिला हिंमत झाली नाही. सोयीस्कर मार्ग म्हणून तिनं त्याच्याशी भेटणं-बोलणं थांबवलं. अगदी कामापुरतं बोलणं… हसणं, अवांतर चर्चा अजिबात बंद करुन टाकलं. तो दिवस संपवून ती क्वार्टरवर परत आली…उसना उत्साह आणून.
‘जमतंय की…असेच आणखी काही दिवस गेले की संपेल हे सगळं’ तिने स्वत:ला आश्वस्त केलं.
पण चैतन्यने निश्चित काही ठरवलं होतं. तो न बोलता तिच्या आसपास राहू लागला. तिची कामं तिनं सांगायच्या आत पूर्ण करू लागला. मग अधूनमधून तो तिला घरी सोडायला म्हणून जाऊ लागला. नंतरनंतर रविवारीसुद्धा तिच्या घरी जाऊ लागला. तनुजाने स्वत:हून त्याला कधी उत्तेजन दिलं नाही. पण तोच अबोल सोबत करू लागला. हळूहळू तनुजालाही त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला. ती पुन्हा पहिल्यासारखी हसू-बोलू लागली. आणि एका रविवारी सकाळी चैतन्य आलाच नाही. तनुजाला वाटलं गेला असेल कुठेतरी.. येईल दुपारी… दुपारचे चार वाजून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. मग मात्र तनुजा अस्वस्थ झाली. तिने त्याला मोबाईलवर फोन केला.. स्विच्ड ऑफ… इन्स्टिट्यूट्मधे फोन केला तर तिथेही नव्हताच तो… इतकं झाल्यावर मात्र ती हवालदिल झाली. त्याच्या घरी जाऊन पाहून यावं, म्हणून ती चटकन तयार झाली. पायात सॅन्डल्स अडकवून ती निघणार.. एवढ्यात दारावरची बेल वाजली. उत्सुकतेनं तिने दार उघडलं तर कुरिअर कंपनीचा माणूस हातात ताज्या गुलाबांचा बुके घेऊन उभा होता. तिने गोंधळून पाहिलं..बुके तिच्याचसाठी होता. आणि सोबत एक चिठ्ठी…
“ प्रिय डॉ. तनुजा जोशी,
गार्डनसमोरच्या कॅफेमधे कॉफी आणि मी वाट पाहतोय…
येच तू आता.. प्रत्यक्ष आणि प्रकट!!!
तुझा,
चैतन्य राजाध्यक्ष”
अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने तनुजा रिक्षा स्टॉपवर पोहोचली. घाईघाईने ड्रायव्हरला पत्ता सांगून ती आत बसली. बरोब्बर अर्ध्या तासात रिक्षा कॅफेसमोर थांबली. पैसे द्यायचे म्हणून तनुजाने पर्स घ्यावी म्हणून हात बाजूला सरकवला…पाहते तर काय…पर्स नव्हतीच तिथे. हातात मोबाईल फोन आणि चैतन्यने पाठवलेला बुके…त्याची चिठ्ठी वाचताक्षणी ती तिथून निघाली होती… तिला स्वत:चं हसू आलं आणि रडूही. आत्ता ह्याक्षणी चैतन्य हवा असं तिला अगदी पोटातून वाटलं…आणि जसं काही ते समजल्यासारखा चैतन्य शेजारी येऊन उभा राहिला होता. रिक्षा गेली. आणि तनुजानं चैतन्यकडे पाहिलं…
दोन्ही गालांसकट हनुवटीवर खळ्या पाडत तो मंद मंद हसत होता.
दोघंही आत जाऊन बसले.
“का बोलावलंस?”
“अजूनही सांगायला हवंय…?”
“हो…”
हसत चैतन्य म्हणाला…, “बरं..मग विचार हवं ते..”
एरवी तनुजा चिडली असती… पण स्वत:शी काहीतरी ठरवल्यासारखं ती म्हणाली…
“का हे सगळं…? का सोबत असतोस, कौतुक करतोस, धीर देतोस, स्वप्नं दाखवतोयंस? मला… नाही जमणारे हे सगळं आता… ठाऊक नाही का तुला? का त्रास देतोयस आणि करून घेतोयस?” एवढं बोलेपर्यंतच तनुजाला भरून आलं. तिला बोलवेना पुढे काही…
पाण्यानी भरलेला ग्लास तिच्या हातात देत तो म्हणाला, “का नाही?”
………………….
Love Diaries : ना उम्र की सीमा हो…(पूर्वार्ध)
“वेडा आहेस का तू चैतन्य? अरे तुझ्यापुढे करिअर आहे सगळं अजून. डॉक्टरेट, रिसर्च, प्रमोशन, लग्न करून सेटल होशील…नको त्या नादाला का लागतोयस?”
“कोण म्हणालं नको तो नाद… मी तर मला हवं तेच करतोय. डॉक्टरेट, रिसर्च, प्रमोशन, लग्न आणि सेटल वगैरे व्ह्यायचं आहेच मला…तुझ्यासोबत! तुला आता स्पष्ट्च सांगतो तनुजा, तू भेटलीस आणि मला आयुष्यात काहीतरी अर्थ आहे, दिशा आहे असं वाटलंय. तू आणि फक्त तूच माझ्या आयुष्याला आकार देऊ शकतेस… दुसरं कोणीही नाही… मी प्रेमात पडलोय गं तुझ्या… हे नुसतं आकर्षण नाही. आय लव्ह यू अॅण्ड आय मीन इट…मला आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. तुला गुणगुणताना ऐकायचंय… एखाद्या फाईंडिंगमागे डोकं घालून रात्ररात्र जागवत काम करायचंय…जग फिरायचंय तुझ्यासोबत…तनुजा, ऐक माझं…!”
“अरे पण, लहान आहेस तू माझ्यापेक्षा कितीतरी…जग काय म्हणेल?”
हसत हसत चैतन्य म्हणाला, “जग काय म्हणेल??? ऐक मग….”
कॅफेमधल्या म्युझिक सिस्टिमवर जगजीतची गजल सुरू झाली होती…
“ना उम्र की सीमा हो… ना जन्म का हो बंधन… जब प्यार करें कोई, तो देखे केवल मन… नयी रीत चलाकर तुम… ये रीत अमर कर दो…”
तनुजानं पाहिलं, चैतन्यच्या डोळ्यांत खूप प्रेम, आत्मविश्वास आणि चमक होती. ती हसली.
चैतन्यने तिचा हात स्वत:च्या हातात घेत तिला विचारलं…
“लग्न करशील माझ्याशी तनु?”
“मला जरा वेळ हवाय..विचार करु दे. मला नक्की काय हवंय, ते माझं मला कळू दे नीट. मग सांगते!”
“एवढंच ना.. ठीक्के… दिले चल दोन महिने… परवा मी अमेरिकेला जाणार. मी येईपर्यंत तुला विचार करायला वेळच वेळ आहे. ओक्के…?”
हे ऐकल्यावर तनुजाला बाकी जगाचं भान आलं. समोर आलेला कॉफीचा मग उचलून त्याच्या वाफेवर हात निववत ती विचार करू लागली…
दोन महिने, सहा आठवडे, साठ दिवस… हा भेटणार नाही रोजच्या रोज… हा विचार मनात आल्याक्षणी ती चमकली. अर्रे…आपण मनोमन हे सगळं अॅक्सेप्ट करुन टाकलंसुद्धा?
…………………
दोन महिने कुठे आणि कसे गेले हे ना तनुजाला समजलं… ना चैतन्यला!
झिम्माड पावसात त्याला आणायला, एकाच वेळी हुरहूर आणि उत्सुकता मनात घेऊन ती एअरपोर्टकडे निघाली होती!!!
(उत्तरार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम