अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- महादेव शिवराम गोळे!

मागील दोन लेखांत आपण वि. का. राजवाडे आणि वि. गो. विजापूरकर या दोन समकालिनांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. राजवाडे यांचे ‘भाषांतर’ आणि विजापूरकर यांचे ‘ग्रंथमाला’ ही दोन मासिके १८९४ मध्ये सुरू झाली. पुढच्याच वर्षी, म्हणजे १८९५ साली महादेव शिवराम गोळे यांचे ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात गोळे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक ऱ्हासास तत्कालीन शिक्षणपद्धती कशी कारणीभूत ठरत आहे याचे विवेचन केले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत गोळे यांनी लिहिले आहे-

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
amravati, politics, sanjay khodke, navneet rana, ncp, bjp, lok sabha election 2024
अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

‘‘हे पुस्तक दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाच्या आधारे लिहिलेले नाही. यात जे दुसऱ्यांचे अनुभव, अभिप्राय किंवा सिद्धांत सांगितलेले आहेत, ते या पुस्तकाच्या तयारीकरिता तूर्तातूर्त गोळा केलेले नाहीत, तर व्यासंगानुरूप वाचनात आलेले व गेल्या कित्येक वर्षांच्या अवलोकनाने अनुभवासही उतरलेले असे ते आहेत.’’

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून १८८१ साली संस्कृत व तत्त्वज्ञान विषयांत बी.ए. झालेले गोळे १८८२ पासून न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत अध्यापन करू लागले. ते करताना त्यांनी स्वत: ‘संस्कृत कोर्स’, ‘अमरसार’, ‘इंग्रजी कवितेचें पुस्तक’ ही क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाय १८८४ साली विज्ञान विषयात एम.ए. करून ते फग्र्युसन कॉलेजमध्ये पदार्थविज्ञान हा विषय शिकवू लागले. दरम्यान १८९१ साली त्यांचा ‘हवा’ या विषयावरील व्याख्यानांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. आणि शेवटी आगरकरांच्या अकाली निधनानंतर, १८९५ साली फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्यपदही त्यांच्याकडे आले. त्याच वर्षी त्यांनी ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ हे पुस्तक लिहिले. सुमारे एक तपाच्या अध्यापन कारकीर्दीमुळे तयार झालेली त्यांची स्वतंत्र दृष्टी यात दिसून येते. विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि आरोग्य यांच्या घडणीत शिक्षणपद्धतीचे स्थान कळीचे आहे, यावर गोळे यांचा विश्वास होता. तीच मांडणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी या पुस्तकाला ‘प्रस्तुतच्या शिक्षणातील काही दोष व ते सुधारण्याची दिशा’ असे शीर्षक सुचविले होते. परंतु गोळे यांनी ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ हेच शीर्षक ठेवले. त्याविषयी गोळे लिहितात-

‘‘कदाचित कोणी येथे असा प्रश्न करील की, पुस्तक वाचताना ब्राह्मण म्हणजे कोण समजावे व अन्यजातीय कोण समजावे. या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. तथापि साधारणपणे ब्राह्मण हा शब्द सर्व पांढरपेशे लोकांचा थोडक्यात उल्लेख व्हावा म्हणून योजिला आहे. देशस्थ, कोंकणस्थ, कऱ्हाडे आणि सारस्वत ब्राह्मण, कायस्थ आणि पाठारे परभू व ज्या दुसऱ्या शुद्ध विद्याव्यासंगी जाती असतील, त्या सर्वाचा ब्राह्मण या शब्दात समाहार केलेला आहे असे समजून पुस्तक वाचावे.. ब्राह्मण म्हणून, शिक्षक म्हणून, पालक म्हणून, जे जे माझ्या अनुभवास आले व त्यापैकी जे जे विशेष सांगण्यासारखे वाटले, ते ते खऱ्या कळवळ्याने व शुद्ध सात्त्विक भावाने आपल्या ब्राह्मण व अन्य जातीय सर्व बांधवास येथे सादर केलेले आहे. त्याचा सर्वानीच स्वीकार करावा. कदाचित् ब्राह्मण बांधवांपेक्षा अन्यजातीय बांधवांस ही सेवा लवकर मान्य होईल; व जर त्यास ती पूर्ण हितावह झाली तर मला सारखाच संतोष होईल..’’

या पुस्तकाची रचना तीन भागांत केली आहे. पहिल्या भागात तत्कालीन शिक्षणपद्धती व विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मानसिक ऱ्हासाचे वर्णन आले आहे. दुसरा भाग ब्राह्मण समाजाच्या तत्कालीन स्थितीचे विवेचन करणारा आहे, तर तिसऱ्या भागात गोळे यांनी शिक्षणपद्धती कशी असावी याचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्या भागातील हा उतारा पाहा –

‘‘.. परीक्षा हे विद्वत्ता व बुद्धिमत्ता यांचे एक बाह्य़ द्योतक आहे. विद्वत्तेची व बुद्धिमत्तेची अखेरची परीक्षा पुढील आयुष्यक्रमात व कर्तबगारीत दिसून येते. या दृष्टीने पूर्वीच्या व अलीकडच्या ब्राह्मणजातीय विद्वानात काही अंतर पडले आहे काय हे पाहू. युनिव्हर्सिटीतून शोध व विचारपूर्वक विवक्षित विषयांवर निबंध लिहिणारांस सुमारे दहा बक्षिसे आहेत. या बक्षिसांकरिता ब्राह्मणविद्वानांकडून अलीकडे पुष्कळ वर्षांत महत्त्वाचे निबंध गेल्याचे दिसून येत नाही. हायकोर्टात गेले असता जुने व नवे एल्एल्.बी. कोणते हे बहुधा केवळ आकारावरून लक्षात येते. तसेच नवीन वकील, मुन्सफ, मामलेदार, शिक्षक व इतर नोकर केवळ आकाराने अलीकडील असे ओळखिता येतात. अशा लोकांची परीक्षा ‘आकारसदृशी प्रज्ञा’ या न्यायाने करणे रास्त नाही; सबब त्यांचे आचरण कसे असते हे पाहिले पाहिजे. धिम्मा, विचारी व आपल्या विद्वत्तेस अनुरूप अशा व्यासंगातच वेळ घालविणारा, – अशा जातीचे विद्वान् किती व कृतकृत्यपणे निव्वळ गप्पा ठोकीत बसणारे, किंवा लोकांची चेष्टा, निंदा व खोडय़ा करणारे, किंवा व्यसनात, आळसात व झोपेत दिवस काढणारे किती, त्यांचे प्रमाण पाहिल्यास विचार करणारास हल्ली मोठी खेदकारक स्थिती दिसून येते.’’

या पुस्तकाचा शेवट करताना गोळे लिहितात –

‘‘तरूण व म्हातारे, नवे आणि जुने, सुधारक आणि असुधारक, सरकार आणि हक्केच्छू, या अशा विरुद्ध पक्षामध्ये हल्ली जो तंटा आहे त्याचे यथार्थ कारण काय ते शोधू जाता असे दिसते की, तरणे नवे लोक, सुधारक व हक्केच्छू या सर्वाच्या मनाची प्रवृत्ती, आपआपल्या विषयात, एकाच प्रकारची असते व मध्यम वयातील जुन्या चालीचे लोक, असुधारक आणि सरकार या सर्वाच्या मनाची त्या त्या विषयात भिन्न प्रवृत्ती असते. वारंवार एकड मनुष्य एका विषयात एक प्रवृत्तिमार्ग व दुसऱ्यात दुसरा अंगिकारतो. अगदी मुळाशी पाहता आशा व अनुभव यांच्या कमी अधिक प्राबल्यामुळे हा भेद उत्पन्न होतो व म्हणूनच एकाच व्यक्तीच्या भिन्न विषयात जसा बुद्धिचा व्यासंग असेल आणि तिची बाल्यादी अवस्था जी कोणती असेल त्याप्रमाणे भिन्न विषयात एक नाही तर दुसरी प्रवृत्ती त्याच्या मनास लागते. त्यामुळे कोणी हक्केच्छू असुधारक असतात, कोणी सुधारक हक्केच्छू नसतात, इत्यादी. आशा व अनुभव यासंबंधांचा हा भेद विशेष विस्ताराने सांगितल्याखेरीज तो कदाचित् ध्यानात येणार नाही म्हणून तो थोडा स्पष्ट करतो. साधारणपणे असे समजावे की, जो नवीन फेरफार सुचविलेला असतो त्यापासून पुष्कळ हित होईल व त्याचा पुष्कळ लोक सदुपयोग करतील असे आशावंतास वाटत असते; उलट त्या फेरफाराने हितापेक्षा अहित अधिक होईल व पुष्कळ लोक त्याचा दुरुपयोग करतील किंवा निदान त्यापासून कोणाचेही हित होणार नाही; किंवा त्याचा कोणास उपयोग होणार नाही, अशी अनुभविक माणसाची समजूत असते. हा भेद प्रत्येकाने दुसऱ्याचा थोडा तरी गुण घेतल्याखेरीज नाहीसा व्हावयाचा नाही; व असे करण्याचा उभयतांचा निश्चय झाल्यास जे फेरफार हल्ली जितक्या प्रकारे व्हावेसे वाटत आहेत, ते तितक्या प्रकारे नको आहेत, फार सौम्य प्रमाणाने पाहिजे आहेत, असे उभयतांच्या विचारे ठरून त्यांचे एक दिल होईल. याकरिता समंजस, आशावंत व अनुभविक माणसांनी सर्व प्रश्नांचा पुनरपि नव्या दृष्टीने विचार केला पाहिजे.’’

हे पुस्तक त्या वेळी चर्चेत आले होते. लो. टिळकांनी ‘केसरी’तून त्यावर सात लेख लिहिले. ‘विविधज्ञानविस्तार’मध्येही त्यावर दीर्घ परीक्षण आले. या पुस्तकानंतर, १८९८ मध्ये गोळे यांचे ‘हिंदुधर्म आणि सुधारणा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे –

‘‘उत्कृष्ट विद्वान सुधारक आपलीं मतें कशीं मंडन करितात, तें अनेक पुस्तकांच्या आणि वर्तमानपत्रांच्या द्वारें सर्वास नित्य कळत आहेच. परंतु जुन्या चालीच्या धर्मसंरक्षक मंडळींस काय वाटतें, ते धर्माभिमान कां बाळगतात, त्यांची श्रद्धा या इंग्रजी विद्येच्या काळांतदेखील कोणत्या कारणांनीं कायम रहाते, त्यांमध्यें कोणत्या उत्कृष्ट प्रेरणा व मनोवृत्ति आहेत, त्यास सुधारणेची भीति कां वाटते, व सुधारणेपासून कोणतें नुकसान, कोणतें दुष्परिणाम घडतील असें वाटतें- या सर्व गोष्टींचा शांतपणें विचार केलेला फार थोडय़ा ठिकाणीं दृष्टीस पडतो.. स्वधर्माच्या संरक्षणाची महत्त्वाकांक्षा ज्यांमध्यें आहे, त्यांस हा ग्रंथ मनोरंजकच नव्हे तर उत्कृष्ट उपदेशपर होईल..’’

हे पुस्तक गोळे यांनी ‘विद्याधर’ या कल्पित व्यक्तीचे आत्मपर निवेदन म्हणून लिहिले आहे. यात आधी सुधारक दाखविलेला विद्याधर पुढे विचाराने हिंदू धर्माचा कट्टर पुरस्कर्ता बनतो. बालविवाह, विधवा विवाह प्रतिबंध, जातिभेद अशा रूढींचे तो समर्थन करतो. सुधारणांविषयी सावधपणा राखण्याचा इशारा देतो. पुस्तकातील हा उतारा पाहा-

‘‘सौंदर्याचें महत्त्व पूर्वी माझ्या कधींच ध्यानांत आलेलें नव्हतें. मीं त्याचा विचारच केलेला नव्हता. मी शुद्ध बुद्धीचा भक्त होतों. सृष्टीचें सौंदर्य पाहून माझ्या मनाचा ओघ तत्त्वज्ञानाकडे वाहूं लागे, व मग मला आनंद होई. गायन, वादन, चित्रकला वगैरे ललित कलांमध्यें मला फारसें गम्य नव्हतें. कवितेंतही अर्थाशीं तात्पर्य, सह्रदयता नव्हती. हा माझ्या शिक्षणांत मोठा ढोबळ दोष राहिला असें आतां मला वाटूं लागलें. मनोवृत्ति जागृत होऊन आनंद होण्यास काव्य आणि कला यांची अभिरुचि अवश्य आहे; ती नसल्यामुळें, मीं स्वत:च्या कपडय़ालत्त्यांचा फारसा विचार केला नाहीं, दुसऱ्यांच्या पोशाखाकडे लक्ष दिलें नाहीं, घरांत व्यवस्था आहे कीं अव्यवस्था आहे हा विचार मनांत बहुधा येत नसे; व घर सुंदर, शोभिवंत करण्याचें माझ्या डोक्यांत मुळींच येण्यासारखें नव्हतें.. सौंदर्यात काय आहे? बुद्धि पाहिजे- विचार पाहिजेत, अशी माझी समजूत होती. तीमुळें मला अंधत्व आलें, व त्यानें केवढा हा अनर्थ झाला? विद्यादानांत असल्या मोठय़ा उणीवी राहिल्यानें विचार एकपक्षीय होतात यांत बिलकुल शंका नाहीं. दु:खाच्या मोठमोठय़ा राशि समोर असून त्या मुळींच दिसत नाहींत; तशाच पण सुखाच्याही राशि समजण्यांत येत नाहींत व आपण शुद्ध बुद्धीचे भक्त असतां, लोकांस कां तसें दिसत नाहीं असें मनांत येऊन आश्चर्य मात्र वाटतें. बुद्धिशिक्षण हें एकपक्षीय शिक्षण होय, ही गोष्ट आतां माझ्या मनांत पक्की भरली व सर्व बाजूंनीं मनास पूर्णता कशी आणावी या विचारांत मी पडलों’’

गोळे यांच्या या दोन्ही पुस्तकांत संकुचित व एकांगी मांडणी हा दोष आहेच; शिवाय आता ती कालबाह्य़ही वाटू शकतात. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातील एका घटकाची सामाजिक स्पंदने त्यात प्रतिबिंबित झाली आहेत, त्या दृष्टीने या लेखनाचे महत्त्व उरतेच. गोळे यांच्या विचारांचे मूल्यमापन करणारा लेख अभ्यासक डॉ. व. कृ. क्षीरे यांनी लिहिला आहे. त्यात ते लिहितात : ‘ब्राह्मण आणि जातीची उन्नती हा मर्यादित उद्देशच समोर ठेवल्याने गोळे यांचे मुक्त चिंतनाच्या स्वरूपात असलेले विचार संकुचित व एकांगी झालेले आहेत. जात, वर्ण व वर्ग यात गल्लत झाल्याने त्यांत विस्कळीतपणा आला आहे. उत्क्रांतीवर विश्वास ठेवल्याने ते सुधारणाविरोधी झालेले आहेत. त्यातल्या त्यात ब्राह्मणांच्या परिस्थितीवर त्यांनी विदारक प्रकाश टाकल्याने व ब्राह्मणांना सल्ला दिल्याने त्यांच्या विचाराला महत्त्व आले आहे.’

डॉ. व. कृ. क्षीरे यांचा हा लेख ‘महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार’ या यशवंत सुमंत व द. दि. पुंडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकात समाविष्ट आहे. हे पुस्तक आपण आवर्जून वाचावे.

संकलन प्रसाद हावळे nprasad.havale@expressindia.com