08 December 2019

News Flash

महाकारुणिक अटलजी!

अटलजी हे कविमनाचे हळवे राजकारणी होते, ते मानवतेविषयी बोलायचे.

अटलबिहारी वाजपेयी

मथितार्थ
विनायक परब- @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
काय योगायोग आहे पाहा. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये देशाने केवळ दोनच बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असे पाहिले ज्यांनी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये पाच वेळा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले. यातील दुसरे नरेंद्र मोदी. अलीकडेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मोदी यांनी केलेल्या पाचव्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी, पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जीवनज्योत निमाली. वाजपेयी हे भाजपाचे पहिल्या फळीतील शब्दप्रभू नेते ज्यांनी जनमनावर अक्षरश: अधिराज्य गाजवले. १९८४ साली भाजपाने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला, त्या वेळेस संपूर्ण देशात केवळ दोनच खासदार निवडून आले त्यात अटलजी व अडवाणी यांचा समावेश होता. तरीही त्यांच्या निवडणुकोत्तर सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्क पूर्ण भरलेले होते. एवढी त्यांची जबरदस्त अशी लोकप्रियता होती.

रा. स्व. संघाच्या ज्या मुशीतून अटलजी पुढे आले त्या विचारधारेमध्ये हिंदूत्ववादी कट्टरता अधिक होती. पण त्यामुळे भाजपाला राजकीय पटलावर फारसे महत्त्व मिळत नव्हते. असे असले तरी त्या कालखंडातही अटलजींची लोकप्रियता विरोधकांमध्येही होतीच. सर्वाना सोबत घेऊन जाण्याची सर्वसमावेशक दृष्टी, समन्वयवादी धोरण हे त्यामागचे प्रमुख कारण होते.

अटलजी हे कविमनाचे हळवे राजकारणी होते, ते मानवतेविषयी बोलायचे. अनेकदा कट्टरता मध्ये आली तर त्यांच्यातील कवी जागा व्हायचा आणि विषय टोकाला जाणार नाही, याची काळजी ते शब्दांच्या माध्यमातून घेत असत. म्हणूनच तर अटलजींच्या निधनानंतर काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि विविध संघटनांचे प्रमुखही त्यांच्या भावना व्यक्त करते झाले. काश्मीरभेटीच्या वेळेस पंतप्रधान असताना त्यांनी ‘इन्सानियत’ची हाक दिली होती. हुर्रिअतचा अध्यक्ष मिरवैझ उमर फारूख म्हणाला की, संवादावर विश्वास असलेले हे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांनी फुटीरतावाद्यांनाही पाकिस्तानशी बोलण्याची संधी दिली. काश्मीरची समस्या लष्कराच्या नव्हे तर माणसाच्या नजरेतून पाहिली तरच सुटेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. लाल किल्ल्यावरच्या भाषणांतून म्हणूनच त्यांनी कधी पाकिस्तानला तर कधी काश्मिरी जनतेला साद घातली. राजकारणी म्हणून याबरोबरच लक्षात राहतील ती त्यांची संसदीय भाषणे. अमोघ वक्तृत्व, ओघवती शैली, भाषेवरील प्रभुत्व, हिंदूीची नजाकत असलेला लहेजा हे सारे त्यांच्या वाणीतून बाहेर येताना मंत्रमुग्ध होण्याखेरीज समोरच्याच्या हाती काहीच नसायचे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी सर्वानीच त्यांचे कौतुक केले. त्यांची संसदेतील भाषणे ही तरुण खासदारांसाठी राजकीय शिक्षण असायचे. राजकारणावर पकड आणि समन्वयवादी भूमिका यामुळेच तर २३ राजकीय पक्षांना सोबत घेऊन जाण्याचे अनमोल कसब अटलजी दाखवू शकले. ते इतर कुणा नेत्यांना शक्य नव्हते!

त्यांच्या नेतृत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर कस लागला तो, कारगिल युद्धाच्या वेळेस. कारगिलमध्ये भारतीय लष्कराला हवाई दलाचे छत्र मिळावे किंवा हवाई दलाचा वापर त्या वेळेस केला तर युद्धाचे पारडे आपल्या दिशेने झुकण्यास मदतच होईल, असे लक्षात आले होते. सैनिक तर युद्धासाठीच प्रशिक्षित असतो. अशा वेळेस कोणत्याही परिस्थितीत शत्रूला नामोहरम करणे हेच त्याचे एकमात्र उद्दिष्ट असते, तसाच विचार तो करत असतो. लष्करप्रमुखांनीही तसाच विचार करणे तेवढेच साहजिक असते. पण पंतप्रधानांसमोर देश आणि जग दोन्हींचा विचार असतो. कारगिलच्या वेळेस हवाई दलाच्या मदतीचा निर्णय झाला त्या बैठकीस लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक आणि हवाई दलप्रमुख अनिल टिपणीस दोघेही होते. गरज भासल्यास प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी मागितली होती. अटलजी म्हणाले, काहीही करा, पण एक लक्षात ठेवा नियंत्रण रेषा (एलओसी) कुणीही पार करणार नाही. त्यांनी त्या वेळेस वाहवत न जाण्याची दाखविलेली ती मुत्सद्देगिरी महत्त्वाची होती. अशीच मुत्सद्देगिरी त्यांनी पोखरण दोनच्या अणुचाचणीच्या वेळेसही दाखविली होती. अमेरिकेने त्या वेळेस र्निबधही लादले. मात्र त्यांची पर्वा आपण केली नाही. अमेरिकेचे र्निबध येणार याची पूर्ण कल्पना होती देशभरातील महत्त्वाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या त्या जवळिकीमुळेच नंतर देशात प्रथमच राजकारणाशी काडीमात्र संबंध नसलेला एक वैज्ञानिक आपल्याला डॉ. अब्दुल कलामांच्या निमित्ताने राष्ट्रपतिपदावर आरूढ झालेला पाहायला मिळाला. आजवरचे ते सर्वाधिक लोकप्रिय असे राष्ट्रपती होते. त्याचे श्रेयदेखील अटलजींच्या निर्णयाला जाते.

खरे तर ते देशाचे पंतप्रधान होते. कुणालाही थेट फोन करून अथवा बोलावून घेऊन त्यांचे मत सांगणे किंवा आदेश देणे त्यांना सहज शक्य होते. संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सांगतात की, त्यांनी अधिकाऱ्यांचा शिष्टाचारही पाळला. त्यांनी लष्कर, नौदल किंवा हवाई दलप्रमुखांना थेट पाचारण करून कधीच निर्णय घेतला किंवा सांगितला नाही. सारे काही राष्ट्रीय सल्लागार ब्रिजेश मिश्र यांच्या मार्फत होईल, याची काटेकोर काळजी घेतली. मिश्र यांच्या निवडीचा निर्णय भाजपामध्ये अनेकांना मान्य नव्हता. तरीही वाजपेयी यांनी पक्षाचे न ऐकता त्यांनाच त्या महत्त्वाच्या पदावर राहू दिले. याचा देशाला या क्षेत्रात बराच फायदा झाला. ब्रिजेश मिश्र यांनी स्वत: अनेकदा सांगितले होते की, केवळ आणि केवळ वाजपेयी होते म्हणूनच मी त्या पदावर राहू शकलो, अन्यथा केवळ अशक्यच होते.

अटलजींच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ दिली ती त्यांच्या कवितेने. ते म्हणायचे की, राजकारणातून संन्यास घेतला तर लोक मला एक्स-पीएम म्हणजे माजी पंतप्रधान म्हणून ओळखतील, पण कवी असेन तर मला कवीच म्हणतील, माजी कवी असे कधी कोणी म्हणणार नाही. तोच माझा खरा परिचय. त्यांच्यातील कवी आणि राजकारणी याबाबत लोकांमध्ये मतमतांतरे होती. काहींना वाटायचे की, त्यांच्यातील कवी श्रेष्ठ आहे तर काहींना वाटायचे की त्यांच्यातील राजकारण्याने कवीवर मात केली आहे. तीन-चार वेळा मुलाखतीचा योग आला, त्या वेळेस याबाबत विचारता ते म्हणाले होते, माझ्या दोन प्रतिमा या लोकमनातील प्रतिमा आहे. प्रत्यक्षातील मी एकच आहे. कवीही तोच आणि राजकारणीही तोच. महत्त्वाचे म्हणजे मला असे वाटते की, कवी किंवा साहित्यिक यांना राजकारणाची चांगली जाण असेल तर ते अधिक चांगले राजकारण करू शकतात. मग आर्य चाणक्याचा दाखलाही त्यांनी दिला. ते म्हणाले, चाणक्यने राजाला सांगितले होते की, कुणालाही घाबरले नाही तरी चालेल पण साहित्यिकांपासून सांभाळून. कारण सत्ता उलथवण्याची ताकद त्यांच्या शब्दांमध्ये असते! त्यामुळेच कवी किंवा साहित्यिक चांगले राजकारण करू शकतो.

त्यांच्या कविता संघविचारांशी संबंधित किंवा थेट राष्ट्रप्रेमाच्या व मानवतेला साद घालणाऱ्या अशा होत्या. ते केवळ दु:ख किंवा कणव दाखवून थांबले नाहीत तर त्यामध्ये एक दिशादर्शनही अनुस्यूत असायचे. त्यात अंधारामध्येही आशेचा किरण असायचा, राष्ट्राप्रति असलेली जबाबदारीची जाणीव होती. नंतर ते स्वत:च सत्तास्थानी आले, व्यवस्थाप्रमुख झाले तरी त्याने माज आला नाही कारण जबाबदारीची जाणीव सतत होती. त्यांच्यातील कवीनेच कठीण प्रसंगी त्यांचा मार्ग प्रशस्त करण्याचे व व्यक्त होण्याचे सामथ्र्य त्यांना दिले. त्यांच्यासाठी ते कवितेचे अवकाश महत्त्वाचे होते. धर्माधता, कडवे विचार आणि द्वेषाचे राजकारण यापासून ते दूर राहिले. अपवाद त्यांच्या अयोध्येतील आणि गोव्यात झालेल्या भाषणाचा. गुजरात दंगलीनंतर राजधर्माचे पालन करा असे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगायलाही ते कचरले नाहीत. अंधाऱ्या बाजूंकडे पाहणे त्यांनी कधी टाळले नाही. किंवा अपयशाला प्रश्न विचारू नका असेही कधी म्हटले नाही, प्रश्न टाळले नाहीत ना प्रश्न विचारणाऱ्यालाच मोडीत काढायचा विचार केला अथवा राजकीय विरोधक म्हणून चौकशीचा ससेमिराही मागे लावून दिला, प्रश्नांकडे पाठही केली नाही. खूपच अडचण झाली तर कवितेचा आधार घ्यायचे आणि ते अवकाश वापरायचे! एकदा अस्वस्थ होत म्हणाले होते, कौन कौरव, कौन पाण्डव, टेढा सवाल है। दोनों और शकुनि का फैला कूट जाल है।

त्यांच्यातील हे गुण, गुणग्राहकाच्या नजरेत भरायचे म्हणून पं. नेहरूही म्हणाले की, देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता या तरुणात आहे आणि १९८० साली न्या. एम. के. छागलाही विश्वासाने म्हणाले की, माझ्यासमोर भारताचा भावी पंतप्रधान बसलेला आहे! त्यांची ती छबी लक्षात घेऊनच निवडणूकपूर्व महाअधिवेशन अश्वमेधमध्ये भाजपाने भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.. पण असे असले तरी लक्षात राहील तो त्यांच्यातील राष्ट्रप्रेमी. जो म्हणतो,

यह जमीन का टुकडा नहीं
यह जीता जागता राष्ट्रपुरुष है
यह अर्पण की भूमी है
यह तर्पण की भूमी है
म जिऊंगा तो इसके लिए
म मरूंगा तो इसके लिए

पण या सर्वावर मात करतो तो त्यांच्यातील महाकारुणिक कवी आणि मानवतावादी तत्त्वज्ञ जो एका कवितेत म्हणतो,

मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गरों को गले न लगा सकूँ

आणि जाता जाता मोठे तत्त्वज्ञान साध्या-सोप्या शब्दांत सांगून जातो.

‘छोटे मनसे कोई बडा नहीं होता,
टुटे मनसे कोई खडम नहीं होता.’

अशा या महाकारुणिक नेत्याला ‘लोकप्रभा’ची आदरांजली!

First Published on August 24, 2018 1:08 am

Web Title: atal bihari vajpayee former prime minister of india
Just Now!
X