विनायक परब – @vinayakparab / response.lokprabha@expressindia.com
सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.७ टक्के एवढी तूट, चलनामध्ये थेट १८ टक्क्यांनी घसरलेला पाकिस्तानी रुपया, गेल्या पाच वर्षांच्या काळात तब्बल ७६ टक्क्यांनी वाढलेले विदेशी कर्ज ज्याचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३० टक्क्यांएवढे आहे.. या आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून विख्यात क्रिकेटपटू तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बहुमत  मिळविणाऱ्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ या पक्षाचे प्रभावशाली नेते इम्रान खान शपथ घेणार आहेत.

पाकिस्तानात सरकारने लोकशाही मार्गाने पाच वर्षांची कारकीर्द व्यवस्थित पूर्ण करून कारभार दुसऱ्या नेतृत्वाकडे सोपविण्याची ही गेल्या ७० वर्षांतील केवळ दुसरीच वेळ असणार आहे. इम्रान खान हे पाकिस्तानमध्ये सदैव चर्चेत राहिलेले असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील त्यांच्या गुलछबू व्यक्तिमत्त्वामुळे तेवढेच वादग्रस्त राहिले आहे. गेल्या २२ वर्षांत ते सक्रिय राजकारणात होते. त्यातील १५-१७ वष्रे त्यांना फारसे यश लाभले नाही. गेल्या खेपेस तर त्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. मात्र या खेपेस अगदी सुरुवातीपासून ते यश मिळवतील अशी ‘हवा’ (खास पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये वापरला जाणारा शब्द) अर्थात वातावरण तयार करण्यात आले होते. इम्रान खान यांचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी या खेपेस ‘लाडला’ असा केला होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयचा वरदहस्त लाभलेल्याचा उल्लेख पाकिस्तानी माध्यमांमध्ये अशा प्रकारे ‘लाडला’ असा केला जातो. आपल्याकडे राजकारणात घराणेशाहीची चर्चा असते तशीच चर्चा पाकिस्तानमध्येही असते. गेल्या पाच-सहा वर्षांत इम्रान यांनी या घराणेशाहीच्या विरोधात आग ओकण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष घराणेशाहीचेच वारसदार चालवतात. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे इम्रान यांच्या टीकेचे लक्ष्य होते. या टीकेसंदर्भात मात्र त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. गेल्या सरकारच्या काळात खुद्द पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाच पायउतार व्हावे लागले. एवढेच नव्हे तर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून ते सध्या तुरुंगात १० वर्षांची सजा भोगत आहेत. त्यांची मुलगी मरियम हिलादेखील सात वष्रे सजा झाली आहे.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

इम्रान यांच्या बाबतीत २०१३ पासून परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. इम्रान यांनी त्यांच्या उदारमतवादी इस्लामच्या धोरणात बदल करून कट्टरवादाकडे प्रवास सुरू केला आणि मग पाकिस्तानमध्ये सर्वेसर्वा असलेल्या लष्कराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. या निवडणुकांमध्ये झालेल्या इम्रान यांच्या पक्षाच्या विजयाचे श्रेयदेखील निरीक्षक आणि अभ्यासक लष्करालाच देतात. पाकिस्तानात केवळ आणि केवळ लष्कराला जे हवे तेच घडते हा आजवरचा इतिहास आहे.

पाकिस्तानात चार प्रांतिक सरकारांसाठीदेखील निवडणुका झाल्या. त्यात सिंध प्रांतात बिलावल भुत्तो झरदारी यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री, नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना आघाडी मिळाली. इतरत्र इम्रान यांचा ‘तेहरीक ए इन्साफ’ हा पक्ष वरचढ ठरला. यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रभाव राहिला तो कट्टर धर्मवाद्यांचा. अनेक कट्टर धर्मवादी पक्ष निवडणुकीच्या िरगणात उतरले होते. हे सर्व पक्ष थेट दहशतवादी नेते तरी चालवतात किंवा मग स्थानिक प्रभावी मुल्लामौलवी तरी. आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून भारताने बंदी घालण्याची मागणी केलेला हफीझ सईद याचा पक्षही या निवडणुकीत होताच. सईद विजयी झाला हे भारताचे दुर्दैव. हे सारे भारतासाठी चिंताजनक आहे.

पाकिस्तानात काहीही झाले तरी त्याचा थोडाफार परिणाम हा भारतावर होतोच होतो. त्यामुळे पाकिस्तानातील घडामोडींकडे भारत सरकार लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे दूरध्वनीवरून अभिनंदनही केले. इम्रान यांच्या विजयाबद्दल खुद्द पाकिस्तानात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, हे चांगलेच झाले. भारतात इम्रान यांचे अनेक मित्र असले तरी त्यांच्या येण्यामुळे भारत-पाक संबंध लगेचच सोडा भविष्यातही सुधारतील असे म्हणणे खूपच धाष्टर्य़ाचे ठरेल.

चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्या बदलामुळे पाकिस्तानी लष्कराने आता इम्रान खान यांना पािठबा दर्शविलेला दिसतो तो मूलतत्त्ववादाकडे आणि कट्टर इस्लामच्या दिशेने सुरू झालेला त्यांचा प्रवास हा भारतासाठी अडचणीचाच असणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लष्कराबरोबरच विविध दहशतवादी संघटनांसोबत आणि त्यांच्या नेत्यांसोबत असलेली त्यांची जवळीकही वाढलेली दिसते आहे. प्रेषित मोहम्मद हेच सर्वेसर्वा आणि त्यांची निंदा करणाऱ्यांना कडक शासन करणारा कायदा ही त्यांची धोरणे पाकिस्तानी लष्कराच्या धोरणाला पुढे नेणारी, दहशतवाद्यांना प्रसंगी आवडतील अशीच आहेत. पाकिस्तानात धर्मानुनय करणारे शासन येणे हे भारतासाठी केव्हाही धोकादायक आहे. पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचे तर तिथे लोकशाही खरोखरच अस्तित्वात आली आणि पाकिस्तानचे राजकीय शासन लष्कराच्या नियंत्रणातून मुक्त झाले तर त्यातच त्यांचा खरा फायदा असणार आहे. इम्रान सरकारची सर्व ध्येयधोरणे पाकिस्तानी लष्करच ठरवणार असेल तर भारताने फार आशा ठेवण्यात काहीच हशील नाही, पण म्हणून आपण अपेक्षाच ठेवायच्या नाहीत असे करून चालणार नाही तर आपण आपल्या संवादाच्या बाबतीत खुलेपणा ठेवून पाकिस्तानशी वेळोवेळी चर्चा करत राहणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे

इम्रान खान यांनी निवडणुका जिंकल्यानंतरच्या भाषणामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले. त्यातील पहिला म्हणजे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले तर मी दोन पावले पुढे टाकेन. बोलण्यासाठी हे वाक्य खूप छान आहे. मात्र लष्करी मदतीच्या बळावर निवडून आलेले इम्रान प्रत्यक्षात कृती कशी करतील याविषयी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी व पत्रकार रेहम खान हिलाही शंकाच आहे. भारताशी असलेले संबंध सुधारण्यासाठी व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा ठरू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. ती इम्रानच्या पत्नीने सांगावी आणि नंतर आपल्याला लक्षात यावे, असे नाही.  मात्र त्याच मुद्दय़ावर टीका करताना रेहम खान म्हणाली ते महत्त्वाचे आहे. ती म्हणाली की, यापूर्वी शरीफ सरकारने भारताला व्यापारी संबंधांसाठीचा सर्वाधिक जवळचा देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला त्या वेळेस याच इम्रान यांनी शरीफ यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत त्याविरोधात रान उठवले होते. भारतासोबतच्या व्यापारास तीव्र विरोध केला होता. त्यामुळे लष्कराहातची कठपुतळी असलेल्या इम्रान खान यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

व्यापाराच्या बाबतीत सध्या पाकिस्तानने चीनशी जवळीक साधली आहे. ग्वादार आणि काराकोरम जोडणारा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा समृद्धीचा महामार्ग ठरेल असे पाकिस्तानला वाटत होते. त्याचा बोलबालाही खूप झाला. मात्र प्रत्यक्षात त्यामुळे पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडला आहे. कदाचित इम्रान खान यांना शपथविधीनंतर पहिले काम हे त्या कर्जमुक्तीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे झोळी पसरणे हेच करावे लागेल अशी दाट शक्यता आहे.

वस्तुत व्यापारी मार्गाने भारत-पाक दोन्ही देशांमध्ये समृद्धी नांदू शकते. सध्या आपल्याकडे साखर, कापूस, धान्य, दूध मुबलक आहे. त्याची पाकिस्तानला गरज आहे. खासकरून साखर, कापूस आणि दूध. शेजारचेच राष्ट्र असल्याने व रस्तावाहतूकमाग्रे किंवा जलवाहतुकीच्या मार्गाने ते त्यांना सर्वाधिक स्वस्त पडू शकते. पाकिस्तानशी असलेला अधिकृत व्यापार हा केवळ तीन दशकोटी अमेरिकन डॉलर्स एवढाच आहे. तो अनेक पटींनी वाढण्याची क्षमता त्यामध्ये आहे. अर्थात त्यासाठी दोन्ही देशांनी व्यापारावर ठाम राहायला हवे इतकेच. पाकिस्तानात सुका मेवा, फळे, सिमेंट आणि चामडय़ाच्या वस्तू यांची चलती आहे. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. चीनने पाकिस्तानवर लक्ष केंद्रित करण्याचे एक महत्त्वाचे कारण व्यापारी बाजारपेठ हेदेखील आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. मात्र हे सारे करण्यापूर्वी पाकिस्तानला ‘दहशतवाद्यांची भारतात सुरू असलेली निर्यात’ मात्र थांबवावी लागेल, त्यावर भारत ठाम आहे  आणि ते बरोबरच आहे!

१९९२ साली पाकिस्तानला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारा कप्तान ते आता पंतप्रधान असा इम्रान खान यांचा प्रवास आहे. त्यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर अधिराज्य गाजवले. तिथे एरवी फलंदाज तसंच गोलंदाज प्रभावी असतो. तो राजा असतो, कारण तो सारे घडवून आणत असतो. जिंकणे किंवा हरणे यालाही तोच जबाबदार असतो. मात्र पाकिस्तानी राजकारणाच्या खेळपट्टीवर सर्वाधिक सक्रिय असतात ते तिथले पंच अर्थात पंचांचे काम पाहणारे पाकिस्तानी लष्कर. त्यांना वाटले तर प्रसंगी मोठा असलेला राजकीय फलंदाज बाद ठरू शकतो, किंवा गोलंदाज संघाबाहेर जाऊ शकतो, याची कल्पना इम्रान खान यांना नसेल, असे मुळीच नाही. म्हणूनच लष्कराला भावेल अशीच त्यांची धोरणे आणि खेळी असेल. त्यामुळेच पाकिस्तानातील ही नवी राजवट म्हणजे कठपुतळीचा नवा प्रयोग ठरणारी असेल!