11 December 2017

News Flash

सर्वमंगल मांगल्ये!

धर्म-देवता याबाबत संशोधन करून हाती काय लागणार, असा प्रश्न विचारला जातो.

विनायक परब | Updated: September 15, 2017 1:09 AM

कोणतीही देवता अथवा धर्म असं म्हटलं की, एक तर या गोष्टींना नाकं मुरडण्याचा, स्वत:ला पुरोगामी म्हणविण्याचा किंवा मग अगदी दुसऱ्या बाजूस टोकाची कट्टर धार्मिकता असा प्रकार समाजामध्ये दिसून येतो; पण याही पलीकडे जाऊन या सर्वाकडे पाहण्याची एक वेगळी निकोप आणि संशोधकांची दृष्टी असू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धर्म-देवता याबाबत संशोधन करून हाती काय लागणार, असा प्रश्न विचारला जातो. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की, सत्यापर्यंत पोहोचणं हेच उद्दिष्ट असेल आणि संशोधकाची नजर निष्पक्ष असेल तर अनेक चांगल्या गोष्टी हाती लागतात. मुळात माणूस समजून घेण्यासाठी या साऱ्याचा वापर करता येऊ  शकतो. मानवाच्या आयुष्यात झालेल्या उत्क्रांतीनंतरच्या अनेक बदलांनंतरही त्याच्या मानसिकतेतील मूलभूत गोष्टी जशाच्या तशाच राहणार असतील तर भविष्यातील मानवी वाटचालीसाठी त्याची ही धार्मिक आणि श्रद्धेच्या संदर्भातील वाटचाल महत्त्वाची ठरते. कारण ज्या ज्या वेळेस माणसाची श्रद्धास्थानं बदलतात किंवा त्यांना धक्का बसतो त्या वेळेस माणूस किंवा समाज कशा प्रकारे त्यावर प्रतिक्रिया देतो हे या अभ्यासातून, संशोधनातून लक्षात येते. म्हणून त्यांचा अभ्यास आवश्यक ठरतो.

भारताच्या बाबतीत बोलायचे तर शैव, वैष्णव आणि शाक्त पंथ इथे जन्माला आले आणि प्रसार पावले. कधी यातील एक पंथ अधिक प्रभावी होता, तर कधी दोघांच्या किंवा तिघांच्या संमीलनातून एक नवा प्रवाह पुढे आलेला दिसतो. मग यातील कोणाची विचारधारा किती प्रभावी ठरणार हे कसे ठरते, या साऱ्यांची उत्तरे या अभ्यासातूनच मिळतात. या अभ्यासामध्येच मग आपल्याला याचेही उत्तर मिळते की, कुलदेव कोणता असे विचारल्यानंतरही उत्तर देताना अनेक जण कुलदेवतेचेच नाव का सांगतात? कुलदेवता ही आपल्या सर्वाच्या मानसिकतेमध्ये एवढी ठाण मांडून का बसली आहे याचे कारण अश्मयुगापासूनच्या आपल्या मानसिकतेमध्ये दडलेले आहे. यासाठी कुलदेवतेच्या संकल्पनेचा शोध घेणारा ज्येष्ठ पुराविद प्रा. अ. प्र. जामखेडकर यांचा संशोधन निबंध या विशेषांकामध्ये समाविष्ट केला आहे.

भारतातील घराघरांत देवीपूजा होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेतल्यानंतर लक्षात येते की, शाक्त संप्रदाय परमोच्च बिंदूवर असताना महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीन रूपांच्या निमित्ताने या तिघी विश्वाची निर्मिती, चालन आणि प्रलय यांच्याशी जोडलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांशी जोडल्या गेल्या. देवीचा हा संप्रदाय केवळ भारतातच नव्हे तर तिबेट, श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनेशिया आदी आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये प्रसार पावला आहे. या विशेषांकाच्या निमित्ताने वाचकांना या संस्कृतीच्या मुळाशी जाता यावे यासाठीच हा खटाटोप.

सर्व मंगल मांगल्ये, नवरात्रीच्या शुभेच्छा!
विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com

First Published on September 15, 2017 1:09 am

Web Title: navratri utsav 2017