विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
दोनच आठवडय़ांपूर्वी राहुल गांधी यांची बहीण, माजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नात प्रियंका गांधी वढेरा यांनी पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस म्हणून सक्रिय राजकारणात उतरण्याचे निश्चित केले. त्याचा गवगवा व्हायचा तो झाला, पण तो गवगवा करणे काँग्रेसने टाळले हे महत्त्वाचे. त्यांच्या प्रसिद्धीपत्रकाच्या तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांच्या नियुक्तीचा उल्लेख करण्यात आला होता. अर्थात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमधला हा डावपेच होता. आणि अर्थातच तो तेवढाच महत्त्वाचाही होता. म्हणूनच त्याची दखल घेणे भाग आहे. काँग्रेसलाही याची पूर्ण कल्पना होती की, उल्लेख तिसऱ्या परिच्छेदात असला तरी दुसऱ्या दिवशी देशभरातील सर्वच वर्तमानपत्रांचा हा मथळा असणार आहे. असो, युद्धनीतीमध्ये डावपेच हा डावपेचच असतो. हे कार्य काँग्रेसने अतिशय संयततेने पार पाडले. त्या संदर्भात नेमकी कोणती टीका होणार, याचीही कल्पना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना होतीच. त्याप्रमाणे टीका झालीदेखील. भाजपाच्या प्रवक्त्यांनी घराणेशाहीच्या संदर्भात टीकेची झोड उठवली. अर्थात २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसला ‘जिंकू किंवा मरू’ या तत्त्वावरच लढावी लागणार आहे. त्यांची अनेक बाजूंनी कोंडी झाली आहे. त्याला अलीकडेच झालेले मायावतींच्या बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे गठबंधन हेही कारणीभूत आहेच. त्यामुळे प्रियंका गांधींच्या सक्रिय राजकारणप्रवेशाला असे अनेक कोन आहेत, ते समजून घ्यायला हवेत.

गेली अनेक वर्षे येणार, येणार अशी चर्चा प्रियंकाच्या बाबतीत सुरू होती. अखेरीस त्या आल्या, त्यादेखील तशा मोक्याच्या क्षणी. प्रियंकाच्या बाबतीत गांधी घराण्यावर घराणेशाहीच्या अंगाने कितीही टीका झाली तरी या आगमनासंदर्भातील नेमका मुहूर्त आणि त्यामागचे गणित लक्षात घ्यावेच लागेल. २०१४ म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीत तसे मागे राहणे आवश्यक होते, कारण त्या वेळेस पती रॉबर्ट वढेरा यांना भाजपाने लक्ष्य केले होते. त्यामुळे त्या वेळेस सर्व धुरा राहुल गांधी यांनीच वाहिली होती. त्यातील अपयशाचे धनीही त्यांना व्हावे लागले होते. त्यानंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आणि बदल झालेले राहुल गांधी देशाने पाहिलेदेखील. प्रथम गुजरात, नंतर इतर राज्ये, अलीकडे तर भाजपाच्या हातातील त्यांचे बलस्थान असलेली तीनही राज्ये काँग्रेसने हिसकावली. मात्र उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि सपाने त्यांना म्हणजे काँग्रेसला गठबंधनपासून दूर ठेवले. या अशा ऐन मोक्याच्या वेळेस उत्तर प्रदेश बुलंद करण्यासाठी प्रियंकाने आखाडय़ात उतरणे आवश्यक होते. त्यामुळे राहुलवरचा भार कमी होईल आणि देशातील सर्वाधिक महत्त्वाचे असलेले राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश याकडे व्यवस्थित लक्षही देता येईल, अशी मोर्चेबांधणी यामागे आहे. सपा-बसपा गठबंधनाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला उत्तर प्रदेशात मुसंडी मारण्यासाठी एक नाटय़ात्म घडामोड आवश्यक होती. प्रियंका गांधींच्या सक्रिय राजकारणातील उडीने ते साध्य होईल. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस म्हणून त्या कार्यरत असतील.

पूर्व उत्तर प्रदेश हा फक्त काँग्रेससाठीच नव्हे तर सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांसाठी अतिमहत्त्वाचा असा राजकीय प्रदेश आहे. लोकसभेच्या ८० पैकी ४० जागा या भागातून येतात, शिवाय हा भाग ठाकूर, ब्राह्मणबहुल असा आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात महत्त्वाची ठरते. त्यामुळे हा भाग त्या दृष्टीनेच पाहिला जातो. इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही येतो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही. त्यामुळे प्रियंका तिथे ठाण मांडून असतील.

गांधी घराणे हे आजवर नेहमीच काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे राहिले आहे. या घराण्याकडे काँग्रेसला एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून अनेकदा गांधी घराण्याच्या छबीकडेच कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात. प्रियंकाचे सक्रिय राजकारणातील आगमन हा भाजपाबरोबरच सपा-बसपा गठबंधनला दिलेला इशाराही आहे. यापूर्वी प्रियंका रायबरेली आणि अमेठी या गांधी घराण्याच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी फिरलेल्या आहेत. आजवर त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी लोटली आहे. अनेकांना आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची तुलना करण्याचा मोह आवरलेला नाही. किंबहुना त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाच्या वृत्तानंतरही वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनाही हा तुलनेचा मोह आवरला नाही. चेहरा, नाक, व्यक्तिमत्त्वाची जादू अशी तुलना अगदी आठवडाभर सुरूच होती. नेहरू-गांधी घराण्याची प्रतिमा आणि परंपरा मागे असलेल्या प्रियंका आता आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या आगमनामागे आई सोनियांच्या वाढलेल्या अनारोग्याच्या तक्रारी हेही महत्त्वाचे कारण आहेच. आजही स्वातंत्र्योत्तर दीर्घकाळानंतर काँग्रेसचा तंबू गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तींवरच अवलंबून असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे, त्याचे भांडवल तर भाजपा करणारच. पण त्याच वेळेस राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण बदलही भाजपाने लक्षात घ्यायला हवा. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस असलेले राहुल गांधी आणि आताचे राहुल यात फरक आहे, तसाच फरक काँग्रेसमध्येही आहे. राहुल गांधींनी स्वतला किंवा काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही. अर्थात तसे करण्यात त्यांनी फार मोठा डावपेच दाखवलेला नाही तर त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना आहे, हे मात्र यातून लक्षात येते. अगदी अलीकडे राहुल गांधी यांनी बरीच राजकीय परिपक्वता दाखविली आहे. कर्नाटकची निवडणूक असो किंवा मग अलीकडे ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेली भाजपाविरोधी महासभा असो. त्यांनी खूप जपून पावले टाकलेली दिसतात. गठबंधनपासून दूर ठेवल्यानंतरही त्यांनी अतिशय संयमानेच सारे काही घेतले आणि त्या महासभेला आपले दोन प्रतिनिधी निश्चितरूपाने उपस्थित असतील हेही जातीने पाहिले. त्यांच्या प्रतिक्रियादेखील संयमी असतात आणि त्यात पूर्वीपेक्षा खूपच अधिक परिपक्वता पाहायला मिळते. या बदललेल्या प्रतिमेचा फायदा काँग्रेसला निश्चितरूपाने होईल. अर्थात हा फायदा मतांमध्ये किती परिवर्तित होईल हे माहीत नाही. असे असले तर प्रतिमाबदल निश्चित झालेला आहे व तो काँग्रेस व राहुल या दोघांसाठीही सकारात्मक असा आहे. मात्र हे भाजपाला लक्षात येत नसेल किंवा हा फरक ते गांभीर्याने घेणार नसतील तर त्याचे परिणाम भोगण्याची पाळी त्यांच्यावर निश्चितच येईल.

उत्तर प्रदेश या राज्याला देशाच्या राजकारणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच प्रियंकाचे उत्तर प्रदेशातील सक्रिय राजकारणातील पाऊल अतिशय महत्त्वाचे ठरते, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत प्रियंकाला उतरवून आपण नक्कीच लढणार आणि त्यात कुठेही कमी पडणार नाही, असा संकेत काँग्रेसने दिला आहे. म्हणून तर देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंकाच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. काँग्रेसमध्ये जोश भरण्याचे महत्त्वाचे काम प्रियंकाच्या आगमनाने साध्य होईल. लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे सर्वाधिक महत्त्वाचे असते, याची कल्पना तर सर्वच राजकीय पक्षांना आहे. अर्थात या दाखविलेल्या हिमतीला दोन बाजू असणार.

पहिली बाजू म्हणजे विजयश्री मिळाली तर त्याचे श्रेय आणि तरीही पराभव झाला तर अपयशाचे धनीही व्हावे लागेल. प्रियंका गांधींच्या प्रवेशाला काँग्रेसचा एक स्वतचा कोन आहे, विरोधक असलेल्या भाजपाचा दुसरा विरोधाचा कोन आहे. तिसरा कोनही तेवढाच महत्त्वाचा आहे, तो मतदारांचा आहे. प्रियंका गांधी यांना आता हे  लक्षात ठेवावे लागेल की, आता त्यांच्याकडे स्वतंत्र राजकीय नेता म्हणून पाहिले जाणार आहे. घराणेशाही, नेहरू-गांधी परंपरा, याच बरोबर पती असलेल्या वढेरा यांच्या गैरव्यवहारांचीही परंपरा सोबत आहे, याचेही भान बाळगावे लागेल. प्रसंगी त्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरेही जाहीररीत्या द्यावी लागतील. यापुढे प्रत्येक गोष्टीसाठी उत्तरदायी असावे लागेल. भविष्यात घराण्याचे नाव फार उपयुक्त नसेल, कारण आता भारतातील मतदार राजाही बदलला आहे. आता केवळ घराण्याच्या नावावर मते मिळण्याचे दिवस तसे संपुष्टात आले आहेत. मतदार सुज्ञ झाला आहे, हे गेल्या चार वर्षांतील निवडणुकांनी सिद्ध केले आहे. कोणताही राजकीय पक्ष या सुज्ञ नवमतदाराला गृहीत धरण्याची चूक करू शकत नाही. कारण आपण गृहीत धरले जातोय हे लक्षात आले की हा नवमतदार राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवतो. अलीकडे झालेल्या भाजपाच्या तीन राज्यांमधील पराभवामागेही हेच कारण आहे आणि गुजरातमधील संख्याबळात कमी पडण्यामागेही तेच. याला काँग्रेस किंवा प्रियंका गांधीही अपवाद असणार नाहीत, हा तिसरा आणि महत्त्वाचा कोन लक्षात ठेवायला हवा.