‘‘मित्रांनो, खरेच काही करायचे असेल तर केवळ ‘लाइक’ करीत बसू नका. आपण काही तरी ठोस कृती करू या’’, युक्रेनिअन पत्रकार मुस्तफा नायेमच्या या फेसबुक पोस्टवर त्यानंतरच्या एका तासामध्ये सुमारे ६०० हून अधिक प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आणि त्यानंतर तीन महिन्यांमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विक्तोर यानुकोव्हिच यांच्यावर गच्छंतीची वेळ आली. या गच्छंतीच्या मुळाशी होती मुस्तफाची पोस्ट. अरबस्तानातील वसंतामध्येही फेसबुकसारख्या सोशल मीडियानेच क्रांतीसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले होते. त्यानंतर सोशल मीडिया हा किती क्रांतिकारी आहे, यावर पानेच्या पाने भरून लिखाण करण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे.

सोशल मीडिया लोकशाहीसाठी घातक आहे का, अशी चर्चा  आता सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प निवडून यावेत यासाठी रशियाने सोशल मीडियाचा खुबीने वापर केला हे आता फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूब आदी सर्वच समाजमाध्यमांनी जाहीररीत्या मान्य केले आहे.  ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी क्लिंटन यांना विजयापासून दूर नेण्यासाठी प्रचारकी वाटणार नाही अशा प्रकारचा मजकूर, व्हिडीओ आणि फोटो यांचा वापर समाजमाध्यमांमध्ये लक्ष्य निश्चित करून करण्यात आला. त्याची आकडेवारीच आता प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकेतील १४ कोटी ५० लाख नागरिकांनी त्या फेसबुक पोस्ट वाचून ‘शेअर’ केल्या.  ३६ हजार ७४६ अमेरिकनांनी ट्वीट्स पूर्ण वाचून ‘रिट्वीट’ केले. तर यूटय़मूबचे १,४१६ व्हिडीओजही मोठय़ा संख्येने अमेरिकनांनी ‘लाइक’ करून दोस्तांनाही पाहण्यासाठी सुचवले. हे सारे व्हिडीओ, मजकूर त्याच्यासोबत असलेले फोटो हे सारे असत्य बाबींवर आधारलेले होते. त्याचा झालेला परिणामही आपण पाहिला. सुरुवातीस अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेल्या हिलरींवर ट्रम्प यांनी सहज मात केली. यामध्ये सोशल मीडियाचा आधार घेऊन केलेली घुसखोरी मतपरिवर्तनासाठी खूप महत्त्वाची ठरली, हे आता पुरेसे सिद्ध झाले आहे.

सोशल मीडियाचा हा व्यवसाय नेमका चालतो कसा हे आपण जाणून घेण्याची वेळ आली आहे. आपण सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवणे हे कंपन्यांसाठी आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे असते. आपले लक्ष वेधण्यात (अटेन्शन स्पॅन वाढविण्यात) त्यांना यश आले की, जाहिरातीचे पैसे मिळवून देणारे त्यांचे चक्र वेगात फिरू लागते. मग ते अधिक वेगात फिरविण्यासाठी आपले म्हणजे माणसाचे वर्तन समजावून घेऊन त्यातून गणिती समीकरणे या कंपन्यांकडून बांधली जातात, त्यावर हा व्यवसाय चालतो. या व्यवसायाच्या अर्थशास्त्राचे हे गमक आहे. तुम्ही काय खाता, पिता इथपासून ते तुमच्या आवडीनिवडींपर्यंत सारे काही यामध्ये गणितात बांधले जाते. मग तुमच्या आवडीच्या असलेल्या विचारधारेच्या पोस्ट तुम्हाला अधिक दिसू लागतात. परिणाम असा असतो की, त्यातून तुमचे कदाचित कुंपणावरचे असलेले विचारही उडी मारून त्यातील एकच एक बाजू उचलून धरतात किंवा अधिक पक्के अथवा घट्ट होत जातात.

हे सारे होत असताना तुमच्या खासगी आयुष्यात या माध्यमांचा शिरकाव खूप मोठय़ा प्रमाणावर झाला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. एक अमेरिकन व्यक्ती दिवसातून तब्बल दोन हजार ६०० वेळा आपल्या मोबाइल फोनच्या स्क्रीनला स्पर्श करते. आपल्याकडे तर सुरुवातीस केवळ नवीन पिढीच मोबाइलमय झालेली आहे, अशी तक्रार होती. पण आता बेटा तो बेटा.. माँ- बाप भी अशीच अवस्था आहे. त्यामुळे एकाच घरात एकाच खोलीत असलेली कुटुंबातील मंडळी तासन्तास त्याच खोलीत असली तरी मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोळे घालून असतात आणि संवादाचा एकही शब्द त्या खोलीत बाहेर पडत नाही, हा अनुभव आता सार्वत्रिक होतो आहे.

एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत किंवा वैयक्तिक स्तरावर ते होते त्या वेळेस त्याचा फटका त्या व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यादित असतो. पण जेव्हा ते समाजाच्या स्तरावर काही विशिष्ट गोष्टींना लक्ष्य करून केले जाते तेव्हा ते घातक ठरू शकते.  समाजासाठी आणि लोकशाहीसाठीही. अलीकडे कोणतीही घटना घडली की, सर्वप्रथम पोलिसांचा संदेश सोशल मीडियावर फिरू लागतो, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांकडे खातरजमा करा. कारण सोशल मीडियावरच्या अफवा प्रचंड वेगात पसरतात. ईशान्य भारतातील नागरिकांवरील झालेल्या हल्ल्याच्या वेळेसही अशीच खोटी व्हिडीओफीत व्हायरल झाली होती. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये  घुसखोरी करून दोन समाजांमधली दुही वाढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी एखाद्याने त्याचा गैरवापर केला तर सामान्यजनांना ते कळणे तसे कठीण असते. म्हणूनच थोडा सावधानतेने त्याचा वापर व्हायला हवा. आजवर स्वत:च्या भावना मोकळेपणाने मांडू न शकलेल्या समाजाला सोशलमीडिया हे वरदान वाटते आहे, त्यांच्यासाठी ते तसे प्रत्यक्षात आहेदेखील. आता आम्ही बोलू लागलो तर लगेचच यांना त्यावरही र्निबध यावेत असे वाटते, असे युक्तिवादाचे दुसरे टोकही काही जणांकडून गाठले जाते. अशी भूमिका घेण्याची गरज नाही. फक्त त्याचा वापर करताना तो निर्बुद्धपणे वापर तर होत नाही ना, याची खातरजमा करणे आवश्यक आहे हेच आजवरच्या अनेक घटनांनंतर लक्षात आले आहे.

हा सोशल मीडियाचा वापर हा केवळ अमेरिका- युरोप किंवा मध्य आशियातील देशांमध्येच अशा प्रकारे झाला, असे म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.  २०१४च्या निवडणुकांमध्येही भारताने त्याचा प्रत्यय घेतला. जल्पकांच्या फौजा तयारच आहेत, त्यांना कीबोर्ड आर्मीज म्हटले जाते. एखाद्याला लक्ष्य करून, त्याचा सोशल मीडियावर पाठलाग करून, त्यावर सातत्याने चिखलफेक करत बदनामी करणे हेच त्यांचे मूळ काम आहे. त्या तंत्रावर आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर आता पुस्तकेही निघाली. त्या त्या विचारधारा असलेली मंडळी आता मोर्चेबांधणी आणि त्यांच्या व्यूहरचनेसाठी त्याचा वापर करत आहेत. हे सामान्य माणसाने वेळीच ध्यानात घेतले पाहिजे, अन्यथा सोशल काय आणि अँटिसोशल काय याचे भान सुटून जाईल.

सोशल मीडिया कंपन्यांच्या या वर्तनअर्थरचनेस ‘लक्षवेधी अर्थकारण’ असे म्हटले जाते. प्रत्येकाचे लक्ष किती काळासाठी वेधण्यात यश येते यावर त्यांचे अर्थकारण अवलंबून असते. ट्रम्प येणार की क्लिंटन याने त्यांना म्हणजेच कंपन्यांना फारसा फरक पडत नाही. कारण कुणीही आले आणि लक्ष वेधणारी व्यूहरचना वापरली तरी कंपन्यांची पोतडी भरणारच असते. त्यांची व्यावसायिक सेवा दोघांनाही उपलब्ध असते. त्यात, दोघांना समान संधी किंवा कुणाहीविरुद्ध आकस नाही, असे भासवले जाते. पण यात अर्थकारणालाच सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांच्या अर्थकारणासाठी आपण का लढायचे, हा प्रश्न आहे.

समाजातील गांजलेल्या अशा घटकासाठी सोशल मीडिया तारणहार ठरू शकतो हे खरे असले तरी त्याचा नकारात्मक परिणाम हा खूप मोठा आहे आणि त्यात असत्याला अधिक वाव असेल तर तो समाजासाठी अधिक घातक असणार आहे. अलीकडेच भीमा कोरेगावसंदर्भातील बंदच्या वेळेस हातात दगड घेऊन चालणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओचा वापर दोन्ही बाजूंनी आपापल्या परीने केला. त्या व्हिडीओतील किती गोष्टींची कल्पना त्या लहान मुलाला होती? आणि व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांनाही होती?  भावनिक गोष्टी प्रचंड वेगात व्हायरल होतात. यापुढे निकोप लोकशाही हवी असेल तर लाइक करताना किमान क्षणभर थांबा, विचार करा आणि मगच गोष्टी शेअर करा. आपल्या विचारधारेचा प्रचार करताना राज्यघटनेने इतरांनाही दिलेल्या विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर आपण घाला नाही ना घालत याचा विचार व्हायला हवा.

निकोप लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवे ते कधीच मिळत नसते पण प्रत्येकाला आपल्याला हवे ते आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य मात्र नक्कीच मिळते, पण आता यातील निकोपतेवरच सोशल मीडियामुळे घाला पडतो की काय अशी शंका यावी अशी स्थिती आहे. समाजातील दुही सांधली जाण्यापेक्षा ती आधिक्याने वाढतेच आहे, असा अनुभव आहे. कारण कुणी तरी आपण हे सारे विकासासाठी घडवतो आहोत हेच सातत्याने उगाळत राहते तर कुणी एखाद्याला पप्पू करण्यासाठी टपलेले असते. प्रत्येकाचे लक्ष्य ठरलेले आहे. त्यामुळे त्यात आपला पप्पू होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab