दिवाळी आणि मे महिना या दोन सुट्टय़ांचे वेध तमाम बालजगताला खूप आधीपासून लागलेले असतात. म्हणूनच तर त्याआधी येणाऱ्या अनुक्रमे सहामाही किंवा वार्षिक परीक्षा या सुसह्य़ होतात. या सुट्टय़ांमध्ये काय करायचे याचे प्लान्सही खूप आधी ठरलेले असतात. कधी आई- बाबांबरोबर तर कधी मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक असलेल्या समवयस्कांसोबत. पूर्वी या सुट्टीतील गमतींमध्ये वाचनाला हमखास जागा असायची. मात्र आता पाहण्यात वाढ झाली असून संगणक, मोबाइल यांनी वाचनावर कुरघोडी केल्याची चर्चा अधिक आहे. काही अंशी ते खरेही आहे. काळानुसार माध्यमेदेखील बदलणारच. पण मुद्दा असा की, बालकथा त्याच आणि तशाच लिहिल्या जात असतील तर लहान मुलांनी त्या का वाचायच्या? म्हणूनच गेली सहा वर्षे ‘लोकप्रभा’ आधुनिक बालकथा असलेला सुट्टी विशेषांक प्रकाशित करत आहे.

यंदाच्या अंकाचेही हेच वैशिष्टय़ आहे. रंग-रूप यात काही वैगुण्य असेल तर त्या गोष्टीचा सर्वसाधारणपणे तिरस्कार केला जातो. बालपणापासून आपण जे पाहतो तेच संस्कार घेऊन माणूस मोठा होतो. तोवर संस्काराचे वय निघून गेलेले असते. मग सवयींच्या सुधारणेसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे क्लासेस लावण्याची वेळ येते. ते टाळण्यासाठी ‘लोकप्रभा’ खास प्रयत्नशील आहे. गेल्याही वर्षी आम्ही बालदिव्यांग कथा प्रकाशित केली होती. यंदाही अंगावरील डाग, कोड यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावणारी सोनाली नवांगुळ यांची ‘माझ्या रंगद्रव्याची गोष्ट’ आम्ही प्रकाशित करत आहोत. अशीच आगळीवेगळी गोष्ट आहे ती तृतीयपंथीयही याच समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत हे अधोरेखित करणारी शर्मिष्ठा भोसले यांची. मराठी बालकथांच्या दुनियेत हा नवा आधुनिक भान असलेला ट्रेण्ड आम्ही आणतोय, याचा ‘लोकप्रभा’ला अभिमान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात सहिष्णुतेवर खूप चर्चा सुरू आहे. त्याचे संस्कारही बालवयातच व्हावे लागतात. ‘नाही’ हे पचविण्याची ताकद आपल्यात आणतानाच त्याच्याकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी प्राची पाठक यांनी लिहिलेली कथा निश्चितच देईल. पल्लवी सावंत यांनी लिहिलेली ‘काजू आणि चिऊ’ खाण्यापिण्याचे भान देते. याशिवाय ‘कार्टून्सचे पत्र’ आणि शिवाय बरेच काही या अंकात आहे. सध्याच्या जमान्यातही वाचनाची ओढ कायम राखणाऱ्या काही बालदोस्तांचे लेखही यात आहेतच.

नाही पुस्तक, नाही शाळा

हवे तेवढे खुशाल वाचा, खेळा!

सो, एन्जॉय!

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com