08 July 2020

News Flash

लग्नाची बैठक..

‘जगात बहुतेक लोक लग्न करतात’ असं विधान करायला हरकत नाही.

‘जगात बहुतेक लोक लग्न करतात’ असं विधान करायला हरकत नाही. किंबहुना, वाढती लोकसंख्या तेच सांगते. खरं तर लोकसंख्यावाढीसाठी लग्नच करावं लागतं असं नाही; पण रूढ आणि सर्वमान्य संकेत सध्या तरी तोच आहे. लग्नाची प्रत्येक जातीधर्माची आपापली प्रथा आणि रीतिरिवाज असतात. मात्र, लग्न ठरवून असो वा प्रेमविवाह असो (याहून अधिक प्रकार माहीत असल्यास ते आपल्याजवळच ठेवावेत. सध्या मला त्याचा काहीच उपयोग नाही.); एकदा ते ठरलं की मग वधू-वराच्या पालकांनी भेटणं, लग्नाची जागा, दिवस, मानपान (या मानपानाच्या चर्चेतच भावी अपमानाची बीजं रोवली जातात.) याबाबतीत चर्चा करणं, मग साखरपुडा, लग्नसमारंभाचे कपडे कुठून शिवायचे, लग्नाचा मेनू काय ठेवायचा, हे सगळं ठरवणं या पुढच्या सगळ्या पायऱ्या सारख्याच असतात. नावं, आडनावं वेगळी असतील; पण बोलण्याचा थाट, ढंग तोच असतो. वराची बाजू म्हणजे त्यातल्या त्यात सक्षम बाजू हा समज थोडय़ाफार प्रमाणात आजही शिल्लक आहे. अगदी बंडखोर स्त्री-लेखकांची लग्नंही (त्यांनी कुणाशी किंवा त्यांच्याशी कुणी केलं तरच..) साधारण याच मळलेल्या रस्त्यावर वाटचाल करून ठरतात. लग्नाचा वाढता खर्च ‘महागाई वाढली! महागाई वाढली!’ म्हणून ओरड करणाऱ्या प्रत्येक कुटुंबातही- ‘काय करणार? रीतभात आहे म्हणून करावा लागतो!’ अशी कुरकुर करत का होईना, निमुटपणे केला जातो. पंगतीत अन्न वाया जातं म्हणून बुफे पद्धत आली. त्यात अधिकच अन्न वाया जातं, तरी पुन्हा जुन्याकडे जाता येत नाही. कारण लोक काय म्हणतील, ही चिंता असते.

समजा- असंच  एक लग्न जमलंय आणि दोन्ही पक्षांची तीन-चार मातब्बर मंडळी पुढची बोलणी करायला बैठकीला जमलेली आहेत. या अशा बैठकीत कोणी नायक नाही, कोणी खलनायक-नायिका नाहीत. सुष्ट आणि दुष्टही नाहीत. फक्त वेळ आणि परिस्थिती माणसांना तसं वागायला भाग पाडते. पुढील संवादात पहिला बोलणारा मुलाकडचा असतो एवढं लक्षात ठेवा.. पुढचं आपोआप कळत जाईल.

‘‘सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. बोलणी समजुतीने व्हायला पाहिजेत. मागच्या वेळी बैठकीत वाद झाले. प्रकरण मारामारीपर्यंत गेलं. त्यात माझ्या मामाची कवळी त्यांच्या घरीच राहिली. पुढे कोर्टात केस टाकून ती परत मिळवावी लागली.’’

‘‘तुमचं म्हणणं काय ते तर बोला! आम्हाला पटलं तर ‘हो’ म्हणून पुढे जाऊ .’’

‘‘ठीक. सनई पाहिजे. अगदी बिस्मिल्ला नको; पण लाइव्ह पाहिजे.. आमच्या भाच्याच्या लग्नात सी. डी. लावली होती. पहिली पाच मिनिटं सनई वाजली आणि पुढे घरातल्या काकाकुव्याला बोलायला शिकवत होते ते रेकॉर्ड  झालं होतं. शेवटपर्यंत ‘पिऊ ऽऽऽ पिऊ ऽऽ’ एवढंच ऐकू येत होतं.’’

‘‘सनई वाजेल! खरीखुरी! बरं, जावईबापूंचे पाय धुवायला पाणी साधं पाहिजे की मिनरल?’’

एखादा त्यातल्या त्यात बरा असतो तो ‘पाय धुवायची गरज नाही. कशाला उगाच?’ असं म्हणायचा क्षीण प्रयत्न करतो, पण त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्याची बायको गरजते-

‘‘हे बघा! सगळं रीतीप्रमाणे काय ते होऊ  दे. नंतर लोक नावं ठेवतात. त्या जामखेडकरांच्या लग्नात नाही का? आपण लग्नाला गेलो होतो- नगरला. भर उन्हाळ्यात. काय तो उकाडा! तिथे भर मांडवात तुमच्या नाकाचा घोळणा फुटला. तुम्ही हे असे निपचित पडून राहिलात. सगळीकडे ही धावाधाव! कोणी पाणी आणतंय. कोणी कांदा फोडतोय. कोणी बर्फाची लादी चोळतोय. हा कालवा सगळीकडे! नाही का हो?’’

यावर तो भला माणूस चिडतो.

‘‘अगं ए! मी त्या मांडवात शहीद झालो.. मग मला ११ तोफांची सलामी दिली. पुढे माझ्या नावाने तिथे बगीचा झाला. आता पाणपोई सुरू होणारे.. झालं समाधान? आता मुद्दय़ावर ये.’’

‘‘येतच होते मी.’’

‘‘पटकन् या! त्याआधी माझ्या अब्रूची भजी कशाला तळत बसल्येस?’’

‘‘मला वाटतं, स्वत: रचलेली मंगलाष्टकं नसतील तर बरं!’’

‘‘असं कसं? आम्हाला हौस आहे. आमचे हे फार सुंदर कविता करतात. ऑफिसात कोणीही वारलं तर ह्य़ांच्या काव्याशिवाय जाणाऱ्या आत्म्याला शांती मिळत नाही. अहो! तुमचे ते नाना पवारसाहेब गेले तेव्हा काय सुंदर कविता केलीत ना तुम्ही! ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आला नुसता. नंतर ऑफिसातले इतर सहकारी म्हणालेही- ‘अजून एक कडवं म्हटलं असतं तर पवार जिवंतच झाले असते.’ म्हणून यांनी थांबवलं. काय हो ती कविता? आहे! माझ्याजवळ आहे. आता आमच्या ऑफिसात कोणी गेलं तर नाना पवारऐवजी त्या माणसाचं नाव घालून म्हणायची असं मी ठरवूनच टाकलंय. म्हणून ठेवल्येय जपून. पण कोणी मरतच नाही हो आमच्याकडे. तरी आरोग्य कल्याण खातं आहे आमचं. सापडली. ऐका हां!

‘मिटल्या ज्योती विझले तारे

दिव्याखाली अंधार

गेले हो गेले, गेले अमुचे नाना पवार

संभ्रम पडला कणाकणाला

विभ्रम झाला क्षणाक्षणाला

नुरला आता ऑफिसला आधार

गेले हो गेले.. गेलेगेले गेलेगेले..

गेले नाना पवार..’’

त्या लग्नाच्या बैठकीच्या मंगल प्रसंगी श्रद्धांजलीच्या कविता ऐकवल्या जातात. विषय भरकटत जातो.

याच बैठकीत कोणाला साडय़ा द्यायच्या, कोणाला खण देऊन फुटवायचं, त्याच्याही याद्या काढल्या जातात. लग्नाचा मुहूर्त कुठला धरायचा? सकाळचा की दुपारचा? ते ठरवायला पंचांग समोर ठेवलं जातं.

‘‘अरे बापरे! टिळक पंचांग का तुमचं? धन्य आहे.’’

‘‘का? काय झालं?’’

‘‘केसरी आणि राजकारण सोडून पंचांग काढायची काय गरज होती त्यांना? उगाच आपल्यात वाद! ‘गीतारहस्य’ लिहिलं- लिहा. काही म्हणणं नाही आमचं. भगवान कृष्णाने सांगितलेली गीता. त्यावर तुम्ही लिहिलंत! खुशाल लिहा. भगवंत आणि तुमची ती वैयक्तिक बाब आहे. पण आमच्या मधे यांना पडायचा हक्क कोणी दिला? हे पंचांग नव्हतं तेव्हा काय लग्नं लागत नव्हती?’’

‘‘बरं! तुमच्या पंचांगावरून काढा मुहूर्त.’’

‘‘असू दे आता! पण अगदी सकाळचा नको बरं का!’’

‘‘लवकरचा असला तर बरं. सगळे चार अक्षता टाकून पटापटा आपल्या कामाधंद्यावर जायला मोकळे!

‘‘नको! आमचे भाऊ जी लवकर उठत नाहीत.’’

खरं तर ‘एक दिवस झालं काय लवकर उठायला?’ असं समोरच्या पक्षाला म्हणायचं असतं; पण कशाला उगाच दुखवा? म्हणून ‘बरं नसतं का मामांना?’ असा प्रश्न तान्ह्य मुलाच्या तोंडातून दूध ओघळून बाहेर येतं तसा वधूपक्षाकडून कोणाच्या तरी तोंडून ओघळतो.

‘‘हो! निद्रानाश आहे त्यांना! रात्री चारशिवाय डोळा लागत नाही त्यांचा.’’

या मामांना रात्री हेलपाटत यायची सवय आहे आणि सकाळी त्यांची लवकर ‘उतरत’नाही, हे लग्नानंतर कळतं. पण त्यामुळे मुहूर्त दुपारचा धरायचा हे ठरतं. त्याचबरोबर सकाळचा पोहे- उप्पीटचा खर्च अनायासे वाचला हे लक्षात येऊन त्या प्रसंगी प्रकट नसलेल्या भाऊजींचे अप्रकट आभार मानले जातात.

‘आहेर नसावा’ या मुद्दय़ावर पटकन् एकमत होतं. म्हणजे उघड उघड नसावा. पण लग्नाच्या दिवशी सकाळी वधू आणि वर असं लिहिलेल्या दोन्ही खोल्यांमधून एखादा कट रचल्यासारखा नातेवाईकांचा थवा जमून तो उरकून घेतला जातो.

वरात अलीकडे बऱ्याच वेळा नसते. गाडीतूनच सगळे जातात. त्यामुळे ती कशी सजवायची यावर चर्चा सुरू होते.

‘‘सरळ साधे दहा-बारा हार आणून घालू या. चांगले घसघशीत!’’

‘‘नको. ते बैलाला झूल घातल्यासारखं दिसेल.’’

‘‘त्यापेक्षा गुलाब चिकटवू शंभर-सव्वाशे चिकटपट्टी लावून.’’

‘‘नको! नंतर ते काढताना चिकटपट्टीला गाडीचा रंग लागतो. काळी गाडी असेल तर दाल्मेशियन कुत्र्यासारखी दिसेल.’’

‘‘मी काय म्हणतो! ते डेकोरेशन करणारे अख्खी गाडी झाकून टाकेल अशी फुलं लावतात बघा मस्त! तसं करू.’’

‘‘छे! छे! अहो, आमच्या शेजारच्यांनी केलं होतं तसं. घरी गेल्यावर ती फुलं अशी काय अडकली. शेवटी डिक्कीतून मागचा पत्रा कापून चार तासांनी आमच्या बिल्डिंगचा गुरखा मागच्या सीटवर आला आणि काचा फोडून नवरा-बायको बाहेर पडले. पुढे त्या गुरख्याचं शौर्य बघून ती नवरी मुलगी गेली ना त्याच्याबरोबर पळून सहा महिन्यांत. आता गाडीही गेली, बायकोही गेली आणि दुसरा गुरखा शोधायला लागला अशी अवस्था झाल्ये त्यांची.’’

अशा तऱ्हेने ही बैठक चालत राहते. शेवटी कंटाळून काही अटी न ऐकताच मान्य केल्या जातात. आणि नंतरच्या पायरीवर येतो तो केटरर.

पण ते पुढच्या भागात..

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2018 2:59 am

Web Title: actor sanjay mone articles in marathi on unforgettable experience in his life part 6
Next Stories
1 ट्रिप-पुराण
2 ..तरी होईल का तो इक्षुदंड?
3 आपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा..
Just Now!
X