मागील लेखात जरी हिंदी चित्रपट पाहण्याच्या भक्तीचं समर्थन केलं असलं, तरी ते पाहणं म्हणजे नुसतं आंधळं प्रेम नव्हतं. हिंदी चित्रपट आम्हाला ज्ञान प्रदान करायचे. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांबाबत हिंदी चित्रपटांची एक विशिष्ट भूमिका असायची. काही वेळा आजही असते. अगदी साधी घटना घ्या. बऱ्याच चित्रपटांत आपल्याला पाहायला मिळेल : नायकाच्या घरी अठराविशे दारिद्रय़. बहुतांश चित्रपटांत नायकाला वडील नाहीत. बहुदा ते आपला मुलगा असा निघेल याचा धसका घेऊन निवर्तलेले असतात. आई रिकामा झालेला कणकेचा किंवा तांदळाचा डबा खडखड आवाज करत आज घरात अन्नाचा कण नाही म्हणून काळजीपूर्वक कोरलेल्या भुवयांच्या खालच्या महिरपी डोळ्यांतून अश्रुपात करत असते. प्रसंग अगदी बाकाच. परंतु जी बाई रोज स्वयंपाक करते तिला आदल्या दिवशी कळत नाही, की उद्या आपल्याला रिकाम्या डब्याचा आवाज करायला लागणार आहे? वस्त्राच्या बाबतीत म्हणाल तर ज्या घरात अन्न नाही त्या घरातला नायक उत्तम कपडे घालून कसा वावरेल? पडद्यावर गाणे सादर होताना कडव्यागणिक वेगवेगळे कपडे कसे असू शकतील? हे प्रश्न हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कसे काय पडत नाहीत? त्या बिचाऱ्या उत्तम कपडे घालणाऱ्या नायकाच्या आईला आजार होतो तोसुद्धा टीबीच! त्यासाठी उपाय एकच : हवापालट. आणि तोही सिमला, मनाली वा तत्सम थंड हवेचे ठिकाण.

एका चित्रपटात नायकाच्या आईला असाच असाध्य आजार झालेला. नायक आपल्याच वयाच्या प्राध्यापकाच्या घरी बेरात्री मोकाट धावत जातो. प्राध्यापक झोपायच्या तयारीत. शिक्षकांना पगार मिळत नाही म्हणून आजही कधी कधी त्यांना मोर्चेबिर्चे काढावे लागतात. परंतु चित्रपटातल्या शिक्षकांना तुडुंब पगार असतो. बंगलाबिंगला बांधून ते राहतात. तर त्या चित्रपटात नायक प्राध्यापकाकडे पाच हजार रुपयांची मागणी करतो. प्राध्यापक तत्काळ खिशातून पैसे काढून देतो. म्हणजे काय, तो अंगावर रोज इतके पैसे बाळगून झोपतो? बरं, असेलही. तर ते पैसे घेऊन नायक आईला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातो. गेल्याबरोबर तिला एखाद्या सेनिटोरियममध्ये अक्षरश: फेकून देतो. त्याच क्षणी एखादा टीबी झालेल्या मायचा पूत आपल्याला भेटेल याची वाट बघत एक तरुण नायिका उभीच असते. मग सुमारे बाराएक रिळं त्याला आईचा विसर पडतो. दरम्यान, तो प्रेमात पडतो. त्यात भांडतो. पुन्हा प्रेमात पडतो. नायिकेच्या श्रीमंत वडिलांना माणुसकी आणि प्रेम याचे चार धडे देतो. सिगारेट ओढतो म्हणून केवळ जो खलनायक आहे अशा माणसाच्या कारस्थानाचा पाडाव करतो.. आणि चित्रपट संपतो. आईवर उपचार होतात की नाही, तिला खायला-प्यायला मिळतंय की नाही, तिची औषधे आणि पथ्यपाणी याची चौकशी करावी याचा त्याला पूर्णपणे विसर पडलेला असतो. हे असं सगळं चित्रपटांत असायचं.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

हिंदी चित्रपटांत पूर्वी डॉक्टर असायचे. त्यांच्याकडे एक बॅग असायची. परंतु एकाही चित्रपटात डॉक्टर ती स्वत: आणताना दिसायचा नाही. तो हृदयाचे ठोके मोजायचा आणि औषध देऊन, ‘‘मैने दवा दी है! बाकी अब उपरवाले के हाथ में है!’’ हे वाक्य न चुकता म्हणायचा. अरे, मग याला कशाला आणलाय? उपरवाल्याच्या हातात आहे ना सगळं? मग पुजारीच बोलवायचा ना!

‘दिल एक मंदिर’ नावाच्या सिनेमात एका माणसाला कॅन्सर होतो. त्याची बायको नायक असलेल्या डॉक्टरची माजी प्रेयसी. त्या माणसाचा आजार बरा करण्यासाठी नायक खूप खूप अभ्यास करतो. म्हणजे काय, तर दिवे लावून वाचत बसलेला दिसतो. सगळं वाचन झाल्यावर एक शस्त्रक्रिया करून त्याला वाचवतो. मात्र, यादरम्यान अभ्यास करता करता त्याला इतके श्रम होतात, की तो मृत्युमुखी पडतो. याचा अर्थ अभ्यास करून तुम्हाला मृत्यू येतो असा घ्यायचा का? त्यात राजकुमार आणि राजेंद्रकुमार हे अभिनेते होते. खरं तर एकजण मरता मरता वाचला काय आणि दुसरा वाचून वाचून मेला काय; काय फरक पडतो? परंतु सात-आठ सुंदर गाणी होती चित्रपटात. त्यासाठी उरलेला अत्याचार सहन केला होता!

पांढऱ्या साडय़ा नेसून गाणं म्हणणाऱ्या स्त्रियांचे काही चित्रपट त्या काळात खूप गाजले. नेहमी वाटायचं पांढराच रंग का? आणि गाणंच का? आजही पांढरी साडी नेसून रात्री कोणी फिरताना दिसलं की भीती वाटते. नायकही तिच्या मागे मागे फिरत राहायचा. म्हणजे नुसताच मागे मागे जात असायचा. एकदाही एकाही नायकाने त्या स्त्रीला गाण्याच्या दरम्यान हटकून विचारलं नाही, ‘‘बाई, का गाताय तुम्ही? काय समस्या आहे तुमची?’’ परंतु गाणं थांबवायचं नाही- हा हिंदी चित्रपटांचा अलिखित नियम! काही काही गाण्यांत नायक नायिकेला छेडत कडवी म्हणत असतो आणि ती पुढे पुढे लोचटासारखी चालत असते. खरं तर तिने मधेच थांबून नायकाला थोतरवून जाब विचारायला पाहिजे, की हा काय चावटपणा आहे? नाही का? परंतु शेवटच्या कडव्यात त्यांचे मनोमीलन होते. मग तीन-चार मिनिटांच्या रागाचं कारणच काय?

‘बस्तीवाले’ नावाचे काही चित्रपटांत असायचे. बहुदा नायिकेच्या बापाची जमीन त्यांनी बळकावलेली असायची व त्यावर बस्ती बांधलेली असायची. मग चित्रपट सुरू झाल्यावर अचानक ती जागा रिकामी करायची हुक्की त्या बापाला यायची. पण तिथे तर नायक राहत असतो. तो अत्यंत नेटाने विरोध करून ते संकट टाळतो. बस्तीवाले आनंदाने नाचून गाऊ  लागतात. हे उर्मट बस्तीवाले आधी चित्रपटांत होते. हल्लीचे झोपडवासी त्यांच्यासारखे उर्मट वागतात की त्याच्या उलट, हे सांगता येणार नाही. अशा चित्रपटांत बहुतेक वेळा नायिकेच्या बापाचा बंगला हा आलिशान  असून, त्याला ( ) अशा आकाराचे दोन जिने असायचे. त्याचा उपयोग मुख्यत: नायिकेच्या बापाला हृदयविकाराचा धक्का आल्यावर वरून गडगडत खाली येण्यासाठी व्हायचा, किंवा नायिकेचा प्रेमभंग झाल्यावर तिला त्याच जिन्यावरून तरातरा चढून सुसाट धावत धाडकन् आपल्या खोलीतल्या पलंगावर देह लोटायला तरी व्हायचा. क्वचित प्रसंगी त्याच जिन्यावरून नायक चित्रपटाच्या शेवटी खलनायकाला  मारत मारत खालच्या पायरीपर्यंत आणून टाकायचा. बस्स्!

चौथा उपयोग हिंदी चित्रपटसृष्टीला अजून सुचलेला नाही.

‘खानाबदोश’ का काहीतरी नावाचीही रयत काही चित्रपटांत असायची. (नेमका काय उच्चार आहे त्याचा, देव जाणे!) काही चित्रपटांत त्याचं बारसं ‘कबिलेवाले’ या नावाने व्हायचं. त्यांची राहणी, कपडेलत्ते, रीतिरिवाज सगळंच विचित्र असायचं. त्यांची एक अक्राळविक्राळ अशी स्वत:ची देवी असायची. तिची एक ‘पूरनमासी की रात’ असायची. त्यानिमित्त पडद्यावर आशा भोसलेंच्या आवाजात एक गाणं सादर व्हायचं. जेव्हा आपल्याला ते पडद्यावर पहिल्यांदा दिसायचे तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी एक उगाच सुरे फेकत बसलेला दिसायचा. दुसरा एखादा तोंडातून आगीचे लोळ फेकत असायचा आणि त्या कबिल्याचा सरदार (एका चित्रपटात चक्क ओमप्रकाश होता! हे म्हणजे आमच्या सुधीर गाडगीळने वेस्ट इंडिजच्या संघातून गोलंदाजी टाकल्यासारखं!) हुक्का चोखत असायचा. या सरदाराची मुलगी उपनायिका असायची. आपल्या स्वत:च्या चाकूला धार काढणे हा तिचा मुख्य व्यवसाय असायचा आणि फावल्या वेळात ती या कबिल्याच्या नादाला लागलेल्या नायकावर प्रेम करायची. आणि अंतिम क्षणाला नायकासाठी फेकलेला सुरा आपल्या छातीवर झेलून बलिदान द्यायची. शिवाय जर्मनीत जसे नाझी होते तसे हिंदी चित्रपटांत ‘मांझी’ असायचे. खरं तर लोकांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर नेणे एवढेच त्यांचे काम. परंतु ते सगळे गाणी म्हणायचे. न गाणारा मांझी ही जमात हिंदी चित्रपटवाल्यांना माहीतच नाही. कष्टकरी माणूस गातो.. निदान गुणगुणतो तरी. परंतु ते स्वत:च्या कष्टांकडे दुर्लक्ष करता यावं म्हणून. तो त्याचा स्वत:ला रमवण्याचा एक उपाय असतो, उद्योग असतो. मात्र, या मांझींना त्यांच्या नावेत बसणाऱ्या माणसांच्या मनोव्यापाराचा कसा कुणास ठाऊक, पण तंतोतंत सुगावा लागलेला असतो. बहुतेक वेळेला हिंदी चित्रपटांत नावेत बसणारे लोक दु:खात न्हाऊन निघालेले असतात. त्यामुळे तो मांझी अत्यंत योग्य अशी शब्दरचना करून विलापिका सादर करतो. बिमल रॉय यांच्यासारख्या मोठय़ा दिग्दर्शकाला हे करून बघावंसं वाटलं, तर इतरांचा काय पाड?

अशा असंख्य गोष्टी आपल्याला दिसतील. आजही. तुम्ही जरूर शोधा. प्रत्येकाने चित्रपट नीट पाहायला मात्र हवा. प्रसिद्ध गायक मन्ना डे म्हणाले होते, ‘‘हिंदी चित्रपट म्हणजे काय? तर मन्ना डे पं. भीमसेन जोशींना गाण्यात हरवतो आणि किशोरकुमारकडून हरतो!’’

तरीही आपण चित्रपट बघतो, कारण समोरच्या अंधारात आपली अगतिकता विसरवून टाकण्याचं सामर्थ्य त्या पडद्यात आहे.

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com