वय वर्ष शंभर तरीही वर्गात पहिला नंबर.. वडाळाच्या साऊथ इंडियन वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमिक शाळेतून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एन.कमलम् यांना अजूनही शाळेची ओढ बांधून ठेवते. दर शनिवारी शंभरी गाठलेल्या मिस कमलम् सावकाश पावले टाकत शाळेत पोहोचतात आणि सर्वात आधी प्राथमिक वर्गात जाऊन बसतात. निरागस मुलांचे चेहरे त्या भारावून जातात. शंभर वर्षांच्या ‘अम्मां’ना पाहून बच्चे कंपनीही आनंदीत होतात असे साऊथ इंडियन वेल्फेअर सोसायटीचे सचिव आणि वयाची शतकपूर्ती बाईंचे विद्यार्थी डॉ. वेंकटेश यांनी सांगितले.
येत्या २३ ऑक्टोबरला मिस कमलम् शंभरी पूर्ण करणार बाईंच्या माजी विद्यार्थानी आणि साऊथ इंडियन वेल्फेअर सोसायटीच्या व्यवस्थापनाने ‘बाईं’चा वाढदिवस नुकताच शाळेत साजरा केला. यावेळी साठी ओलांडलेल्यी अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनीनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘अम्मां’नी १९४५ ते १९७६ अशी ३१ वष्रे वडाळाच्या शाळेत इंग्रजी, वनस्पतीशास्त्र आणि तमिळ हे विषय शिकवले. याशिवाय गरज पडल्यास शरिरशास्त्र आणि संस्कृतचे वर्गही घेतले असे डॉ. राजलक्ष्मी हेबसूर म्हणाल्या. मिस कमलम् विद्यार्थामध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. प्रत्येक विषयांत निपुण होत्या. आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना सगळेच ओळखत व त्यांचा सन्मान करत. त्यांच्या वर्गात बसणे ही विद्यार्थासाठी पर्वणी असायची, असे १९५६ बॅचच्या बाईंच्या शिष्या डॉ. हेबसूर म्हणाल्या.
नारायणी सुब्रम्हण्यन या १९६८ साली मिस कमलम् बाईंच्या वर्गात शिकत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मिस कमलम् बाईंनी आम्हा विद्यार्थाना जीवनमूल्ये शिकवली. त्यामुळे आमच्या आयुष्याची बठक पक्की झाली. त्या काळाची एक आठवण अशी की, कुण्या एका विद्यार्थाने माझ्यावर निष्कारण आळा घेतला, मी हिरमुसले होते, पण बाई माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या.’’ आणि म्हणाल्या, ‘‘ तु वाईट वाटून घेऊ नकोस, तु चुकीचे वागशील असे मला वाटत नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे.’’ बाईंच्या त्या एका वाक्यामुळे मला खूप बळ मिळाले. कमलम् बाईंच्या तालमीत तयार झालेल्या सुब्रम्हण्यन या पुढे ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या.
कमलम् याचा सत्कार सोहळा वडाळाच्या शाळेतच पार पडला. यावेळी ६५ ते ७० वर्षांच्या आसपास असलेले त्यांचे अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी या ह्रद्यसमारंभात आनंदाने सहभागी झाले होते. सगळ्यातर्फे त्यांना चांदीचा दिवा भेट म्हणून देण्यात आला. ‘बाईंनी आम्हा विद्यार्थाच्या मनात ज्ञानाचा दिवा पेटवला त्याचे प्रतीक म्हणून आम्ही भेटवस्तू म्हणून दिवा दिला’ असल्याचे डॉ. हेबसूर यांनी सांगितले. यावर कमलम् बाईंनी मुलीच्या शिक्षणासाठी सही केलेला कोरा चेक स्वत:च्यावत्तीने दिला. हा चेक स्वीकारणार असला तरच मी सत्कार स्वीकारते अशी अट त्यांनी आपल्या विद्यार्थाना घातली. बाईंच्या या अटीवर सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले, असे डॉ. वेंकटेश यांनी सांगितले. शिक्षणाच्या धासापायी अविवाहित राहिलेल्या मिस कमलम् शाळेच्या जवळच राहतात. आजही बाईं आध्यात्मिक पुस्तके वाचतात, सायंकाळी दुरदर्शन पाहतात. बराचकाळ चिंतनात घालवतात आणि शनिवारी न चुकता वर्गात येतात.