६० वर्षांमध्ये प्रथमच १२ महिला कर्मचाऱ्यांची पथकात निवड

मुंबई : गंभीर गुन्हा असो की सुरक्षेसाठीचे प्रतिबंधक उपाय, भविष्यात प्रशिक्षित श्वानांना हाताळणी महिला पोलीस करताना आढळल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात पहिल्यांदाच महिला शिपायांची निवड करण्यात आली. २६ जानवोरीच्या संचनलनानंतर या महिला श्वानांसोबत प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलात पाच बेल्जीयम शेफर्ड जातीचे श्वान दाखल झाले. त्यांचे प्रशिक्षक म्हणून पाच महिला शिपाई करतील.

१९५९मध्ये मुंबई पोलीस दलात श्वान पथकाची निर्मिती झाली. सध्या या पथकासह बॉम्ब शोधक व नाशक पथक, गुन्हे शाखेकडे प्रशिक्षित श्वान आहेत.

१९९३ बॉम्बस्फोट मालिका, २६/११ हल्लयांसह अनेक गंभीर गुन्हयांमध्ये, राजकीय दौरे, क्रिकेट सामने, सभा-समारंभांआधी झाडाझडतीत या पथकांधमील प्रशिक्षित श्वानांनी मोलाची कामगिरी बजावली. सहा दशकांमध्ये या पथकातील श्वानांची जबाबदारी पुरूषांकडेच होती. त्यांची देखभाल, हाताळणी, महत्वाच्या प्रसंगांमध्ये त्यांच्यासोबतचा मूक संवाद, खाणा-खुणा आदी सर्व पुरूष अधिकारी, कर्मचारी पाहात होते.

मुंबई सातत्याने दहशतवाद्यांच्या निशाण्यावरले शहर. लोकसंख्येनुसार घडणारे गुन्हे, विशेष पाहुण्यांचे दौरे, निवडणूक काळातील राजयकीय व्यक्तींच्या प्रचाार सभा आणि बेवारस वस्तू, बॉम्ब ठेवल्याच्या अफवांमुळे पोलीस दलातील श्वानांची आणि त्यांचे हॅण्डलर सातत व्यस्त असतात. उपकरणांपेक्षा प्रशिक्षित श्वानांचा अंदाज अचूक ठरतो, हे जागतिक प्रमाण आहे.

त्यामुळे मुंबई पोलीस दलात श्वानांची संख्या वाढवण्यावर भर आहे. श्वानांची संख्या वाढल्यास प्रत्येकी दोन हॅण्डलर वाढणार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी दलातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतल्यास सोयीस्कर ठरेल, असा विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडला. त्यानुसार दलातील १२ महिलांची निवड केली गेली.

प्राण्यांची आवड होती. पण प्रशिक्षित श्वानांना हाताळणे, बाका प्रसंग आल्यास त्यांची सोबत करणे, त्यांनी दिलेले संकेत ओळखणे आणि जिव्हाळा वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत राहाणे ही जबाबदारी आव्हानात्मक आहे. त्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या निवडीबाबत आनंदी आहे.

नवी जबाबदारी हाताळण्यासाठी उत्सूक आहे, अशी प्रतिक्रिया महिला पोलीस शिपाई लक्ष्मी तेटके यांनी ‘लोकसत्ता मुंबई’कडे व्यक्त केली.

जास्त काळ सेवा देण्याची क्षमता

बेल्जियम शेफर्ड जातीचे श्वान आक्रमक आहेत. तसेच एकाचवेळी स्फोटके, अंमलीपदार्थ आणि आरोपींचा माग काढण्यात पटाईत आहेत. विशेष म्हणजे अन्य जातींच्या श्वानांच्या तुलनेत जास्त काळ सेवा देण्याची क्षमता राखतात, अशी माहिती श्वान पथकातून देण्यात आली. तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी बहुआयामी असावा यासाठी प्रयत्न केले. कागदपत्रे तयार करण्यासाठी अन्वेषण, संगणक हाताळणी, वाहन चालवणे ही कामे प्रत्येकाला अवगत असावीत, यावीत यासाठी उपक्रम राबवण्यात आला. त्याच माध्यमातून दलातील महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. श्वान पथकातील महिलांची निवड याच उपक्रमाचा भाग आहे.