मुंबई : मुंबईत करोनाच्या १३०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या ९१ हजाराच्या पुढे गेली आहे.  ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५२४१ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत  ६९ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शनिवारी मुंबईत आणखी १३०८ रुग्णांची नोंद झाली. तर १४९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ९३१ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसातील एका दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.

मुंबईतील रुग्णवाढ आता आटोक्यात येऊ लागली असून मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ५० दिवसांवर गेला आहे. २२ मार्च रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३ दिवस होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता ही रुग्णवाढ आटोक्यात आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. तर सरासरी रुग्णवाढ १.३९ टक्कय़ांवर आली आहे.

अंधेरीतील रुग्णसंख्या ६,००० च्या पुढे

अंधेरी पूर्वमधील एकूण रुग्णसंख्या ६०५१ झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या १६११ इतकी आहे. तर सर्वात कमी सक्रीय रुग्णसंख्या गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी विभागात १८९ इतकी आहे.

सहाय्यक पालिका आयुक्ताचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एच(पूर्व) विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा करोना विषाणू संसर्गाने शनिवारी मृत्यू झाला. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वी खैरनार यांना करोना संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यांना संसर्ग असल्याचा अहवाल आल्यानंतर गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर  रक्तद्रव उपचार पद्धतीचाही वापर करण्यात आला होता. मात्र शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

वांद्रे पूर्व भागातील करोनाचा फैलाव रोखण्यात खैरनार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळे या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १३४ दिवसांवर गेला आहे. बेहरामपाडा, भारत नगर अशा दाटीवाटीच्या भागात रुग्ण वाढू लागल्यानंतर खैरनार यांनी पोलिसांच्या मदतीने ड्रोनच्या सहाय्याने येथील गर्दीवर नियंत्रण मिळवले. या भागात त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांमुळे रुग्णवाढ सर्वात आधी आटोक्यात आली होती. येथील रुग्णवाढीचा सरासरी दर  ०.५ टक्के असा मुंबईतच  नाही तर कदाचित देशातही सर्वाधिक नियंत्रित आहे. या कामगिरीत खैरनार यांचा मोठा वाटा होता.

खैरनार धुळे जिल्ह्य़ातील मोहाडीचे मूळ रहिवासी होते. त्यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका मिळवल्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी आणि ‘आयआयटी, पवई’ संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. खैरनार फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महापालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते.

राज्यातील मृतांचा आकडा  १० हजार पार

राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त झाली. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण नोंदले गेले. टाळेबंदीसारखे कठोर उपाय  योजूनही राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात दिवसभरात २२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

१००हून अधिक कर्मचाऱ्यांचा बळी

पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोना संसर्ग होत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक कर्मचारी, अभियंते करोना संसर्गाने दगावले आहेत. पाणीपुरवठा विभागातील उपायुक्त शिरीष दीक्षित यांच्यानंतर मोठय़ा पदावरील अधिकारी असलेल्या खैरनार यांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.