येत्या सहा वर्षात मेट्रोचे १४ मार्ग उभे राहणार आहेत अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी  यांनी दिली. लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुंबईसह राज्यातली महत्वाची शहरं आणि त्यांचा विकास या विषयावर त्या बोलत होत्या. मुंबईत यायचं असेल तर सध्याच्या घडीला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठीच मेट्रोचं जाळं शहरभर उभारलं जाणार आहे. हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक कसा असेल यावर आम्ही भर दिला आहे असंही सोनिया सेठी यांनी स्पष्ट केलं.

MMRDA ची स्थापनाच सुनियोजित आणि सर्वांगिण विकासासाठी झाली आहे. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी आम्ही बारकाईने काम करतो आहोत. मल्टिमोड्युल कॉरिडोअरही उभारला जाणार आहे. मेट्रो स्टेशनबाहेर रिक्षा, बस, फूटपाथ, पार्किंग या सगळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबईत प्रवास करण्याची सगळी साधनं अपग्रेड करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे असं सोनिया सेठी यांनी म्हटलं होतं.

मेट्रो लाईन १ चं काम पूर्ण झालं आहे. मोनो रेलचा प्रकल्प २ टप्प्यात पूर्ण करण्यात आला. विकासाचं काम करताना ज्या लोकांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे त्या सगळ्यांचं पुनर्वसन केलं जातं आहे. फ्री वेही सुरु करण्यात आला आहे. तसेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेही जोडले जाणार आहेत असंही सोनिया सेठी यांनी सांगितलं आहे. मुंबईसोबत रायगड आणि नवी मुंबईचाही विकास केला जाणार आहे. भिवंडीतल्या राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर रोड हा एलिव्हेटेड मार्गही पुढच्या महिन्यात सुरु केला जाईल. मेट्रोचं एकूण जाळं हे ३३३ किमीचं असणार आहे. हे एकूण १४ मार्ग असतील ज्यामध्ये ठाणे भिवंडी कल्याण हा मार्गही आहे. तसेच तळोजा, डोंबिवली कल्याण असाही मार्ग असणार आहे असंही त्यांनी सांगितलं. २०२६ पर्यंत सगळे मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. दिल्लीमध्ये मेट्रोचं जाळं ३४० किमीचं आहे ते उभारण्यासाठी त्यांना वीस वर्षे लागली मात्र आपल्याला ते काम पूर्ण करायला सहा वर्षे लागतील तसा आमचा मानस आहे असंही सोनिया सेठी यांनी स्पष्ट केलं.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.