मुंबई : बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १४ वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेत २४व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी देण्याची विनंती केली आहे. ही मुलगी केईएम रूग्णालयात केमोथेरेपीसाठी गेली असताना ती गर्भवती राहिल्याचे उघड झाले होते. न्यायालयाने तिचे वय आणि ती २३ आठवडय़ांची गर्भवती असल्याची बाब लक्षात घेऊन तिचा गर्भपात शक्य आहे की नाही याची तातडीने चाचणी करण्याचे आदेश जे. जे. रूग्णालयाला दिले आहेत.

वर्षांच्या सुरूवातीला या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ही मुलगी  गरीब कुटुंबातील असून तिच्या आईवडिलांना ती गर्भवती असल्याचे कळल्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेकडे धाव धेतली होती. त्यानंतर तिला गर्भपात करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी याचिका करण्यात आली.  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर या मुलीच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी तिची तातडीने वैद्यकीय चाचणी करण्यात यावी आणि शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले.