एकूण रुग्णसंख्या ३१,७८९

मुंबईतील एकूण करोनाबळींची संख्या एक हजाराच्याही पुढे गेली आहे. सोमवारी ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण आकडा १०२६वर गेला आहे. तर आणखी १४३० रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ३१,७८९ वर गेली आहे.

टाळेबंदीच्या दोन महिन्यांनंतरही मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढतो आहे. सोमवारी मुंबईत आणखी १४३० रुग्णांची नोंद झाली, तर ८२५ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांमध्ये ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे.

वयोवृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण ८.१ टक्के

मुंबईतील मृतांची संख्या १०००च्या पलीकडे गेली आहे. ६० वर्षांवरील ५७०९ रुग्ण बाधित असून त्यातील ४६३ रुग्ण दगावले आहेत. तर ४० वर्षांखालील १३ हजार रुग्णांमागे हेच प्रमाण ६९ म्हणजेच ०.५ टक्के आहे. एकूण मृत्यूपैकी ६७ टक्के रुग्णांना अन्य आजार होते, असे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे, तर मृतांमध्ये ३७ टक्के महिला आणि ६३ टक्के पुरुष आहेत. मृतांपैकी इतर आजार असलेले रुग्ण – मधुमेह – २६ टक्के, उच्च रक्तदाब – २४ टक्के, मधुमेह व उच्च रक्तदाब – ३२ टक्के, ह्रदयविकार – ८ टक्के, इतर आजार – १० टक्के.

धारावीत १५८३ करोनाबाधित

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे धारावीमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २१ दिवसांवर आला असून आतापर्यंत तब्बल तीन लाख ५७ हजार ३०५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी ४२ धारावीकरांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची एकूण संख्या १५८३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सुमारे ६० धारावीकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, तर ५२५ करोनाबाधित धारावीकर बरे झाले आहेत. धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणांचे धाबे दणाणले होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने तातडीने निरनिराळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. परिणामी, धारावीतील मृत्यू दर ४ टक्क्यांवर रोखण्यात यश आले आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ३९ टक्के इतका आहे. धारावीतील ४२ जणांना सोमवारी करोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत १५८३ जणांना लागण झाली आहे. तर धारावीतील ५२५ करोनाबाधित बरे झाले आहेत हे विशेष. धारावीतील ७५ टक्के रुग्ण २१ ते ६० वयोगटातील असून धारावीकरांना सेवा पुरविणाऱ्या कार्यरत अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे.धारावीलगतचा भाग असलेल्या माहीम आणि दादर परिसरात सोमवारी अनुक्रमे ३४ आणि २० जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या दोन्ही भागातील रुग्णसंख्या अनुक्रमे ३५१ व २३९ वर पोहोचली आहे.

मुंबईत आणखी एका पोलिसाचा मृत्यू

करोना संसर्गाने आणखी एका पोलीसाचा बळी घेतला. वाहतूक पोलीस दलात हवालदार पदी नेमणुकीस असलेल्या जयंत खंडाईल(५७) यांचा सोमवारी पहाटे नायर रुग्णालयात मृत्यू झाला. वरळी येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या खंडाईल यांना दोन दिवसांपुर्वी करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीत करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना रुग्णालयातील विशेष विभागात हलविण्यात आले. मात्र सोमवारी पहाटे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ५५ वर्षांपुढील पोलिसांना घरीच थांबण्याच्या सूचनेनुसार खंडाईलही कामावर येत नव्हते, असे सांगण्यात आले. राज्यात करोनाबाधीत पोलिसांची संख्या १८०९ असून १८ जणांचा मृत्यू झाला.