टाळेबंदी शिथिलीकरणात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के करण्यावरून सरकार आणि अधिकारी यांच्यातील वाद रंगला असतानाच मंत्रालय हे करोनाचा नवे केंद्रबिंदू ठरू लागले आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड करोना बाधित झाले असून अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील ४३ पैकी १५ मंत्री तसेच डझनभर अधिकारी करोना बाधित झाल्याने मंत्रालयात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात विशेषत: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खबरादरीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय प्रवेश बंद करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर मंत्री, सचिव, काही उपसचिव यांच्याशिवाय फारसा कोणाला प्रवेश दिला जात नव्हता. तरीही काही अधिकारी- कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांतर सचिवांचे निवासस्थान असलेल्या शासकीय इमारतींमध्येही करोनाचा मोठय़ाप्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.  राज्यात आतापर्यंत १५ मंत्र्याना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १० मंत्री करोनामुक्त झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झालेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड करोना बाधित झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री बच्चू कडू हेही रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धनमंत्री सुनिल के दार तसेच विश्वजित कदम, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे,प्राजक्त तनपुरे आदी राज्यमंत्र्यांनी करोनावर मात केली आहे.

अशाच प्रकारे दोन अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या, तसेच पाच प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सुमारे एक ते दीड डझन सनदी अधिकाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली.