अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या राजीनामा देण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत सुमारे १५,००० कर्मचाऱ्यांनी बँकेतील आपली नोकरी सोडली आहे. बँकेच्या नव्या व्यवस्थापकीय धोरणांमुळे मध्य आणि शाखा स्तरीय कर्मचाऱ्यांवर दबाव वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बँकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत असल्याचे बँकेच्या सुत्रांकडून कळते.

बँकेत वरिष्ठ स्तरावरही काही जणांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, सर्वाधिक प्रमाण हे शाखा स्तरावर आहे. ग्राहकांना सेवा देण्यात बँकेच्या शाखांची भुमिका सर्वात महत्वाची असते. त्यामुळे या राजीनाम्यांमुळे बँकेच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, यावर उपाय म्हणून नव्या कर्मचाऱ्यांची वेगाने भरती केली जाणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या एका एक्झिक्युटीव्हने सांगितले की, “बँकेच्या कामकाजात मोठा बदल झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या भुमिकेबाबत संभ्रम आहे. कामकाजाच्या बदलामुळे अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.”

दरम्यान, अ‍ॅक्सिस बँकेनेही हे मान्य केलं आहे की, गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. बँकेने सांगितले की, या आर्थिक वर्षात २८,००० लोकांची भरती करण्यात आली होती. अंतिम तिमाहीत आणखी ४,००० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. बँकेने पुढील दोन वर्षात ३०,००० लोकांची भरती करण्याची योजना आखली आहे. या आर्थिक वर्षात अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर नोकरी सोडणाऱ्यांचे सरासरी प्रमाण १५ टक्के आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांनी बँकेच्या कामकाजात मोठा बदल घडवून आणण्याचे धोरण आखले आहे. बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचा कार्यकाळ वाढविण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. त्यामुळे चौधरी हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले होते. यापूर्वी ते एचडीएफसी लाइफमध्ये याच पदावर कार्यरत होते. चौधरी यांनी अ‍ॅक्सिस बँकेत पदभार स्विकारल्यानंतर कमी जोखमीचे धोरण अवलंबले आहे.