पुणे : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत प्राणवायूच्या वाढत्या मागणीमध्ये सध्या वाहतूक करणाऱ्या टँकरचीही कमतरता भासत आहे. त्यामुळे नायट्रोजन किंवा इतर वायू, रसायनांचे टँकर प्राणवायूच्या वाहतुकीसाठी वापरण्यासाठी ते परावर्तित करण्यास वाहतूकदारांनी तयारी दर्शविली असून, त्या दृष्टीने कार्यवाहीही सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुमारे १५ ते १६ हजार अतिरिक्त टँकर उपलब्ध होऊ शकतात.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या बहुतांश रुग्णांना प्राणवायूची गरज भासत आहे. त्यामुळे प्राणवायूचे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत आहेत.  वाहतूक करण्यासाठी टँकरचा तुटवडा आहे. टँकरची कमतरता लक्षात घेता केंद्र आणि राज्य शासनाकडून वाहतूकदारांशी संपर्क करून इतर वायू, रसायनांचे टँकर प्राणवायूच्या वाहतुकीसाठी परावर्तित करण्याचे आवाहन केले होते. वाहतूकदारांनी तत्काळ ही विनंती मान्य करून प्राणवायू वाहतुकीसाठी टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या दृष्टीने संघटनेच्या सर्व सभासदांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, अनेकांकडून त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्राणवायूच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त टँकर उपलब्ध होऊ शकतात.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात प्राणवायूच्या वाहतुकीबाबत केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार इतर वायू, रसायनांचे टँकर प्राणवायूच्या वाहतुकीसाठी परावर्तित करण्यास आमची तयारी असून, त्या दृष्टीने कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. राज्यातून अतिरिक्त १५ ते १६ हजार टँकर उपलब्ध होऊ शकतात. – बाबा शिंदे, कार्यकारी सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस</strong>